Diwali Bank loan : देशातील सर्वात मोठी बँक SBI सोबतच इतर बँकांनीही दिवाळी ऑफर लाँच केल्या आहेत. दिवाळीच्या सणात नवीन घरांच्या नोंदणीपासून ते नवीन गाडीच्या बुकिंगपर्यंत भरपूर खरेदी केली जाते. दिवाळी सणासारख्या प्रसंगी लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात, या काळात लोक बँकेकडून देण्यात येणाऱ्या कर्जाच्या ऑफरची देखील प्रतीक्षा करतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ बडोदा (BoB) आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) यांनी त्यांच्या कार आणि गृह कर्जाच्या ऑफर सादर केल्या आहेत. याअंतर्गत लोकांना किमान 8.4 टक्के वार्षिक व्याजदरानं गृहकर्ज दिले जात आहे. 


SBI ची दिवाळी ऑफर


स्टेट बँक ऑफ इंडियाने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कर्जाची नवीन ऑफर लॉन्च केली आहे. ही ऑफर 31 डिसेंबर 2023 रोजी संपणार आहे. SBI लोकांना त्यांच्या CIBIL स्कोअरनुसार कर्जाच्या व्याजावर चांगलीसुट देणार आहे. व्याजदरातील ही सवलत 0.65 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. उदाहरणार्थ, ज्या ग्राहकांचा CIBIL स्कोअर 700 ते 749 गुण आहेत, त्यांना सणाच्या ऑफरमध्ये 9.35 टक्के ऐवजी 8.7 टक्के व्याजदराने गृहकर्ज मिळेल. त्याचप्रमाणे CIBIL स्कोअर 750 ते 799 असलेल्यांना 9.15 टक्के ऐवजी 8.6 टक्के व्याजाने कर्ज मिळेल. जर ग्राहकांनी रिसेल किंवा रेडी2 मूव्ह होम घेतला तर त्यांना 0.2 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत देखील मिळेल.


पंजाब नॅशनल बँक देणार स्वस्तात कर्ज


PNB ने आपल्या ग्राहकांना 8.75 टक्के व्याजदराने कार खरेदी करण्यासाठी कर्ज देण्याची घोषणा केली आहे. त्याच वेळी, ग्राहकांना प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवजीकरण शुल्कातूनही संपूर्ण सूट मिळेल. तर बँकेचे गृहकर्ज व्याजदर 8.4 टक्क्यांपर्यंत असणार आहे. गृहकर्जावर प्रक्रिया आणि दस्तऐवजीकरण शुल्कातही सूट असणार आहे.


बँक ऑफ बडोदाची 31 डिसेंबरपर्यंत ऑफर


सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा ची उत्सव ऑफर देखील 31 डिसेंबर 2023 पर्यंत चालणार आहे. या बँकेने याला ‘फीलिंग ऑफ फेस्टिव्हल विथ बीओबी’ असे नाव दिले आहे. बँक ऑफ बडोदा 8.4 टक्क्यांपर्यंत व्याज दराने गृह कर्ज आणि 8.7 टक्क्यांपर्यंत व्याजदराने कार कर्ज देते. या कालावधीत ग्राहकांना प्रक्रिया शुल्कातूनही सूट मिळणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


'या' कंपनीच्या मालकाचा दाणशूरपणा, कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून दिल्या कार