Diwali 2023 Investment Tips: सध्या देशभरात दिवाळी (Diwali) सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या दिवाळी सणात नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत. दिवाळीच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळीपासून गुंतवणुकीला सुरुवात केल्यास ती खूप चांगली मानली जाते (Diwali 2023 Investment Tips). बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी आजही लोक पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा एका स्‍कीमबद्दल सांगणार आहोत, की जिच्‍यामध्‍ये गुंतवणूक केल्‍याने तुम्‍हाला निवृत्तीनंतर दरमहा हमखास परतावा मिळू शकतो. 


पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 


पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना असे या योजनेचे नाव आहे. निवृत्तीनंतर, तुम्हाला पेन्शनप्रमाणे दरमहा ठराविक रक्कम मिळवायची असेल, तर ही योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते. मासिक उत्पन्न योजनेच्या तपशीलाबद्दल माहिती पाहुयात. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत, तुम्ही एकरकमी गुंतवणूक करुन मोठा परतावा मिळवू शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही एकल किंवा संयुक्त खाते उघडू शकता. संयुक्त खात्यांतर्गत, दोन किंवा तीन लोक एकत्र खाते उघडू शकतात. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती एमआयएस खाते उघडू शकते. या योजनेत तुम्ही 1000 ते 15 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करु शकता. एका खात्यात गुंतवणुकीची कमाल मर्यादा 9 लाख रुपये आहे.


या योजनेंतर्गत व्याजदर किती? 


लहान बचत योजनांचे व्याजदर सरकार वेळोवेळी ठरवते. हे दर प्रत्येक तिमाही आधारावर लागू आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत 7.40 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही या योजनेत 15 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरमहा 9,250 रुपये व्याज मिळतील. तुम्ही हे व्याज दरमहा, तीन महिने, सहा महिने किंवा वार्षिक आधारावर काढू शकता. अशा स्थितीत तुम्हाला पाच वर्षांत एकूण 5,55,000 रुपये व्याज मिळू शकतात.


मॅच्युरिटीपूर्वी खाते बंद केले जाऊ शकते


लक्षात घेण्यासारखे बाब म्हणजे, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत, तुम्ही तुमचे पैसे एकूण 5 वर्षांसाठी गुंतवू शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमची गुंतवणूक 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता. त्याचवेळी, जर तुम्हाला तुमचे खाते 5 वर्षापूर्वी बंद करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता. जर तुम्ही तुमचे MIS खाते एक ते तीन वर्षांच्या दरम्यान बंद केले तर तुमच्या एकूण रकमेपैकी 2 टक्के कपात केली जाईल. तर 3 ते 5 वर्षांच्या दरम्यान एकूण रकमेच्या 1 टक्के रक्कम कापली जाईल.


महत्त्वाच्या बातम्या:


Post Office RD : पोस्टाची भन्नाट योजना, दरमहा 5000 रुपये गुंतवा आणि 8 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळवा