Fined On Indian Railway :  प्रवाशांकडून तिकिटाचे शुल्क वसूल करायचे पण सुविधांच्या नावाने बोंब असण्याचा अनुभव अनेकांना रेल्वे प्रवासाच्या (Travelling in Railway) दरम्यान आला असेलच. मात्र, एका रेल्वे प्रवाशाने असुविधेमुळे झालेल्या त्रासानंतर रेल्वे विरोधातच ग्राहक न्यायालयात (Consumer Court) तक्रार केली. ग्राहक न्यायालयाने दक्षिण मध्य रेल्वेला (South Central Railway) दंड ठोठावला. गरीब रथ एक्स्प्रेसमधून प्रवास करताना एसी, पंखे सुरू नव्हते. त्यामुळे खेळती हवा नसलेल्या डब्यातून प्रवास करावा लागला असल्याचे प्रवाशाने म्हटले.


'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण मध्य रेल्वेमधून प्रवास करणारे प्रवाशी केव्हीएस अप्पा राव यांनी तक्रार दाखल केली होती. गरीब रथ एक्स्प्रेसमधील एसी, पंखे सुरू नसल्याची तक्रार रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली असल्याचे राव यांनी म्हटले. त्याशिवाय, झालेल्या मनस्तापासाठी नुकसानभरपाई देण्याची मागणी करणारे पत्र अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही. 


त्यावर जिल्हा ग्राहक न्यायालयाने हे प्रकरण बेजबाबदारपणा आणि सेवा पूर्णपणे न देण्याचे असल्याचे म्हटले. दक्षिण मध्य रेल्वेने बिघाडावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे ग्राहकाला मनस्ताप सहन करत प्रवास करावा लागला. त्यामुळे रेल्वेला ग्राहक न्यायालयाने 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला. 


मुलीसह प्रवास करत होते राव


अप्पा राव 5 एप्रिल 2023 रोजी आपल्या मुलीसह विशाखापट्टणम ते सिकंदराबाद या प्रवासाला निघाले होते. गरीब रथ ट्रेनमध्ये त्यांनी दोन तिकीट आरक्षित केल्या होत्या. राव यांच्या म्हणण्यानुसार, ट्रेन संध्याकाळी 8.40 वाजता निघाली आणि रात्रीचे जेवण करून ते 10 वाजता झोपायला गेले. मात्र, रात्रीच्या वेळी एसी आणि पंखे बंद होते. त्यांनी याबाबत टीटीईला माहिती दिली असता त्यांनी एलुरु स्थानकावरील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. पण ट्रेन तिथून निघाली तरी समस्येचे निराकरण झाले नव्हते. मग विजयवाडा स्टेशनवर सकाळी हा बिघाड दुरुस्त झाला. तोपर्यंत त्या कोचमधील सर्व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. 


आरटीआयही केला होता दाखल


राव यांनी आरटीआयही दाखल केला होता. यातून त्यांना ट्रेनचे डिझेल जनरेटर काम करत नसल्याचे समोर आले. त्यामुळे एसी प्लांटचा वीजपुरवठा बंद झाला. यानंतर त्यांनी हैदराबादच्या जिल्हा ग्राहक न्यायालयात खटला दाखल करून दंडाची मागणी केली.


इतर संबंधित बातमी :