Diamonds and Jewelry Import Export News : भारतीय हिरे-दागिने उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या GJEPC च्या ताज्या आकडेवारीनुसार, जून 2025 मध्ये एकूण हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीत घट झाली आहे. आकडेवारीनुसार, जून 2025 मध्ये निर्यात 13 हजार 978.980 कोटी इतकी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 15 हजार 836.94 कोटी रुपयांची निर्यात झाली होती. यामध्ये 14.25 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. ही घसरण प्रामुख्याने ट्रम्प यांच्या टप्प्याटप्प्याने जाहीर होणाऱ्या टॅरिफमुळे उद्भवलेल्या जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे झाली आहे. याशिवाय, मध्यपूर्वेतील सुरू असलेला राजकीय अस्थिरतेचा फटका जागतिक मागणीवर देखील पडला आहे.
आयातीत किती झाली घट?
दुसरीकडे, जून 2025 मध्ये हिरे आणि दागिन्यांची एकूण आयात 13 हजार 308.49 कोटी झाली असून, मागील वर्षाच्या याच कालावधीत 13 हजार 322.76 कोटी च्या तुलनेत 2.96 टक्क्यांची घट झाली आहे. देशांतर्गत मागणी स्थिर असून, त्यामागे सोन्याचे वाढते दर आणि आर्थिक अस्थिरता हे दोन मुख्य घटक आहेत. सध्या सोनं खरेदीसाठी संथ कालखंड असला, तरी लवकरच सुरू होणाऱ्या सण-समारंभ व लग्नसराईच्या हंगामामुळं बाजारात मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
कट आणि पॉलिश केलेले हिरे
जून 2025 मध्ये या प्रकारातील एकूण निर्यात 6 हजार 692.94 कोटी इतकी होती, जी मागील वर्षीच्या 8 हजार 496.87 कोटी च्या तुलनेत 23.49 टक्क्यांनी घसरली आहे. अमेरिकेसह चीन, युरोपसारख्या बाजारांमध्ये महागाई, मंदीचा धोका आणि वाढती व्याजदरं यामुळं लक्झरी वस्तूंवरील खर्चात घट झाली आहे. यासोबतच, अमेरिकेमध्ये लेब ग्रोन डायमंड्स (Lab Grown Diamonds) कडे कल वाढल्याने नैसर्गिक हिरे खरेदीचा उत्साह कमी झालेला दिसतो. त्याचबरोबर, या विभागातील आयातही 6 हजार 16.72 कोटी इतकी झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत 7.03 टक्क्यांनी घसरली आहे.
रफ डायमंड्स (कच्चे हिरे)
जून 2025 मध्ये रफ डायमंड्सची आयात 2 हजार 7567.68 कोटी इतकी झाली असून, यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 5.13 टक्क्यांची घट झाली आहे. अमेरिकेसह चीनमधून कमी मागणी असल्यामुळे व्यापाऱ्यांनी आधीचे साठे विकून टाकण्यावर भर दिला आहे.
लेब ग्रोन डायमंड्स (पॉलिश केलेले)
या प्रकारातील निर्यात जून 2025 मध्ये 572.86 कोटी इतकी असून, मागील वर्षाच्या तुलनेत 24.95 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. चीनसारखे देश मोठ्या प्रमाणात लेब ग्रोन डायमंड्स तयार करत असल्याने जागतिक बाजारात कडवट स्पर्धा निर्माण झाली आहे.
सोने दागिने
जून 2025 मध्ये सोन्याच्या दागिन्यांची एकूण निर्यात 5 हजार 415.71 कोटी इतकी झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत 5.75 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ मध्यपूर्व, अमेरिका आणि दक्षिण-आशियाई देशांकडून वाढलेल्या मागणीमुळे झाली आहे. वाढत्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोनं हे सुरक्षित गुंतवणूक माध्यम मानलं जातं, त्यामुळे ग्राहकांकडून त्यात गुंतवणुकीचा कल वाढलेला दिसतो.
प्लॅटिनम दागिने
जून 2025 मध्ये प्लॅटिनम दागिन्यांची निर्यात 390.75 कोटी इतकी असून, मागील वर्षाच्या तुलनेत 13.56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिका, जपान व चीनमध्ये प्लॅटिनम लक्झरी व स्टेटसचा प्रतीक म्हणून स्वीकारलं जात आहे. विशेषतः पुरुषांमध्ये याचे आकर्षण वाढत आहे.
रंगीत रत्ने (Coloured Gemstones):
जून 2025 मध्ये रंगीत रत्नांची निर्यात 826.44 कोटी इतकी असून, मागील वर्षाच्या तुलनेत 6.06 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्या सेलिब्रिटी आणि फॅशन हाऊसेसच्या प्रभावामुळे रंगीत रत्न पुन्हा ट्रेंडमध्ये आले असून, लग्नसराई आणि डिझायनर दागिन्यांमध्ये यांचा वापर वाढतो आहे.
कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कॉलिन शहा काय म्हणाले?
जून 2025 मध्येही निर्यातीतील घट कायम राहिल्याचे दिसत आहे. हे ट्रम्प प्रशासनाच्या टप्प्याटप्प्याने जाहीर होणाऱ्या टॅरिफच्या अनिश्चिततेमुळे आहे. याचा परिणाम जागतिक व्यापारावर होत असून, त्याचे पडसाद देशांतर्गत बाजारातही दिसत आहेत. याशिवाय, मध्यपूर्व आणि रशिया-युक्रेनमधील दीर्घकालीन संघर्ष देखील ग्राहकांच्या मागणीवर परिणाम करत आहे.
आगामी काळात, ट्रम्प टॅरिफ पूर्णपणे लागू होईपर्यंत व्यापार सावधपणेच होईल अशी शक्यता आहे. हे नवीन टॅरिफ धोरण कसे राबवलं जातं यावर संपूर्ण उद्योगाचा पुढील मार्ग ठरेल. यासोबतच भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार चर्चेची वाटही लक्षपूर्वक पाहावी लागेल. दुसरीकडे, देशांतर्गत बाजारात सण आणि लग्नसराईच्या हंगामामुळे मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
