मुंबई: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी छेडलेल्या टॅरिफ वॉरमुळे सोमवारी जगभरातील भांडवली बाजार अक्षरश: गडगडले. भारतीय भांडवली बाजारही त्याला अपवाद राहिला नाही. भारतीय शेअर बाजारात (Stock Market) सोमवारी गुंतवणुकदारांनी तब्बल 19 लाख कोटी रुपये गमावले. प्री-ओपनिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 4000 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला होता. तर शेअर बाजाराचे व्यवहार सुरु झाल्यानंतरही सेन्सेक्सची (Sensex) घसरण कायम होती. सेन्सेक्स 2,751 अंकांनी घसरुन 72,612.75 या पातळीवर स्थिरावला आहे. तर निफ्टीमध्ये (Nifty) 914 अंकांची घसरण झाली असून हा निर्देशांक 21,989.85 या पातळीवर स्थिरावला.
सोमवारी शेअर बाजारात आयटी कंपन्यांच्या समभागांना सर्वाधिक फटका बसला. एसबीआय, टीसीएस, टाटा मोर्टसच्या समभागात मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र, एकीकडे शेअर बाजाराची घसरण सुरु असताना तीन कंपन्यांचे समभाग मात्र तेजीत होते. यापैकी सिमेन्स कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 20 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. त्यामुळे अप्पर सर्किट लावण्याची वेळ आली. सिमेन्स कंपनीने ऊर्जा क्षेत्रातील व्यवसायाचा विस्तार करताना सिमेन्स एनर्जी इंडिया लिमिटेड या नावाने नवीन कंपनी सुरु केली होती. त्यानुसार सिमेन्स कंपनीच्या समभागधारकांना नव्या कंपनीचे तितकेच समभाग मिळणार आहेत. 4 एप्रिल रोजी सिमेन्स कंपनीच्या एका समभागाची किंमत 4,939 रुपये इतकी होती. सोमवारी शेअर बाजार उघडताच या समभागाची किंमत 2,571 रुपये इतकी होती. त्यानंतर हा समभाग 2,490 पर्यंत आणखी खाली घसरला. मात्र, काहीवेळातच या समभागाने जवळपास 20 टक्क्यांची उसळी घेत 2,998 ची पातळी गाठली. त्यामुळे या समभागाला अप्पर सर्किट लागले.
याशिवाय, Delhivery या कंपनीच्या समभागाची किंमत 1.15 रुपयांनी वाढली आहे. सध्या या कंपनीच्या समभागाची किंमत 259.95 रुपये इतकी आहे. तसेच गोदरेज कन्झ्युमरच्या समभागाची किंमतही वधारली आहे. Godrej Consumer Products Limited च्या शेअरची किंमत तब्बल 5 रुपयांनी वाढून 1162 रुपये इतकी झाली आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला. रुपयामध्ये 16 पैशांची घसरण होऊन डॉलरच्या तुलनेत त्याची किंमत 85.63 रुपये इतकी झाली.
जागतिक मंदीचे सावट?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगभरातील भांडवली बाजारात मोठी पडझड झाल्याने त्याचा परिणाम जागतिक व्यापारावर होण्याची शक्यता आहे. यामुळे तज्ज्ञांकडून जागतिक मंदी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँक काय पावले उचलणार, याकडे देशवासियांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
शेअर बाजारात ब्लडबाथ, सेनेक्स अन् निफ्टी गडगडले, ट्रम्प यांच्या निर्णयाने गुंतवणुकदार कंगाल
