Air Fares Rises : अहमदाबादमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपच्या (cricket world cup final) फायनलचा थरार रंगणार आहे. उद्या (19 नोव्हेंबर)  भारत आणि ऑस्ट्रेलिया ( India vs Australia Final Match) यांच्यात हा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी विमानांच्या तिकीटांमध्ये वाढ झाली आहे. हवाई प्रवास महागल्याचे पाहायला मिळत आहे. आता अहमदाबादला जाण्यासाठी तब्बल 40 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. भारताने अंतिम फेरी गाठल्याने विमान कंपन्यांची चांदी झाली आहे.


उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी अहमदाबादला जाणाऱ्यांची स्पर्धा लागली आहे. मागणी इतकी वाढली आहे की विमान कंपन्यांना अहमदाबादला जाण्यासाठी अतिरिक्त उड्डाणे सुरू करावी लागली आहेत. वाढत्या मागणीमुळे दर मिनिटाला भाडे वाढत आहे. दिवाळीदरम्यान नुकताच नफा कमावणाऱ्या एअरलाइन्ससाठी यंदा आणखी एक दिवाळी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप फायनलच्या रूपाने आली आहे. इंडिगो आणि विस्ताराने मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान दोन दिवसांसाठी प्रत्येकी एक फ्लाइट वाढवली आहे. याशिवाय इंडिगोने बंगळुरु ते अहमदाबाद आणि हैदराबाद ते अहमदाबाद दरम्यानची उड्डाणेही वाढवली आहेत.


कुठून किती भाडे?


विविध एअरलाइन बुकिंग प्लॅटफॉर्मनुसार, अहमदाबादला मोठ्या प्रमाणात फ्लाइट येत आहेत. 18 नोव्हेंबर म्हणजे आज मुंबई ते अहमदाबादसाठी 18 उड्डाणे आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक तिकीटे बुक झाली आहेत. एअरलाइन्स आता थेट दिल्ली आणि बंगळुरूसारख्या इतर शहरांमधून उड्डाणे उडवण्याच्या तयारीत आहे. दिल्ली ते अहमदाबादचे भाडे 14 ते 39 हजार रुपयांवर पोहोचले आहे. मुंबईतील लोकांना 10 ते 32 हजार रुपये मोजावे लागतात. बंगळुरूचे भाडे 27 ते 33 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्याचबरोबर कोलकाता ते अहमदाबाद यादरम्यान प्रवासाचे भाडे हे 40 हजार रुपये आहे.


वडोदरा जिल्ह्यात जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ 


अहमदाबादला लागून असलेल्या वडोदरा जिल्ह्याला जाणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. येथून अहमदाबादला अवघ्या 2 तासात पोहोचता येते. मुंबई आणि दिल्लीहून वडोदरा जाणाऱ्या फ्लाइट्सही महाग होत आहेत. उच्च मागणीमुळे प्रोत्साहित होऊन, विमान कंपन्या केवळ भाडेच वाढवत नाहीत तर मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक विमानांची व्यवस्थाही करत आहेत. इंडिगो आणि विस्तारा नंतर, इतर एअरलाइन्स देखील लवकरच नवीन फ्लाइटची घोषणा करू शकतात.


सणासुदीच्या काळात विमान प्रवास वाढला


भारतीयांमध्ये हवाई प्रवासाची (Air Travel) क्रेझ वाढत आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांचा हवाई प्रवास खर्चीक आहे. तरीदेखील प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू असल्यानं विमान वाहतूक क्षेत्रात प्रवाशांचा कल वाढला आहे. डीजीसीएने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये देशात हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या 11 टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत सुमारे 1.26 कोटी प्रवाशांनी विमानाने प्रवास केला. आकडेवारीनुसार, इंडिगो एअरलाइन्स अजूनही या क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. DGCA नुसार, 79 लाखांहून अधिक लोकांनी इंडिगो एअरलाइन्सचा वापर केला. ही कंपनी भारतीय बाजारपेठेत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीचा बाजारातील हिस्सा 63.4 टक्के होता. देशातील हवाई वाहतूक क्षेत्र दरवर्षी सुमारे 11 टक्के दराने वाढत आहे. सप्टेंबरमध्ये या कंपन्यांनी अंदाजे 1.22 कोटी लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले होते.


महत्त्वाच्या बातम्या:


 सणासुदीच्या काळात किती जणांनी केला विमान प्रवास? 'ही' कंपनी बनली नंबर वन