मुंबई : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. मिड कॅप (Mid Cap) आणि स्मॉल कॅप (Small Cap) सेक्टरमधील शेअर्सने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. शेअर बाजारात दिसलेल्या तेजीने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ( BSE Sensex) 65780 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 19577 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
आज दिवसभरातील व्यवहार स्थिरावले तेव्हा, सेन्सेक्स निर्देशांक 152.12 अंकांनी वधारत 65,780.26 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी निर्देशांक 46.10 अंकांनी वधारत 19,574.90 अंकांवर बंद झाला.
आज दिवसभरातील व्यवहारात, बँक, ऑटो आणि वित्तीय शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसून आला. इतर सर्व सेक्टरमध्ये गुंतवणूकादारांनी खरेदी केली. मीडिया सेक्टरमध्ये मोठी तेजी दिसून आली. मीडिया सेक्टर 3.19 टक्क्यांनी वधारत बंद झाला. त् यानंतर, हेल्थकेअर इंडेक्समध्ये 1.55 टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली. दुसरीकडे, फार्मा सेक्टरमधील शेअर्स 1.10 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले.
सेन्सेक्समधील 30 पैकी 18 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. त्यातही सन फार्माच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.09 टक्क्यांची वाढ दिसून आली. याशिवाय आयटीसी, टायटन, बजाज फायनान्स आणि नेस्ले इंडियाचे शेअर्सही तेजी दिसून आले. या कंपन्यांच्या शेअर दरात 0.98 टक्के ते 1.49 टक्क्यांची तेजी दिसून आली.
गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 5 सप्टेंबर रोजी 316.70 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. सोमवारी, 4 सप्टेंबर 2023 रोजी बाजार भांडवल 315.01 लाख कोटी रुपये होते. आज बाजारात दिसून आलेल्या तेजीमुळे बाजार भांडवलात 1.69 लाख कोटींची वाढ दिसून आली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या बाजार भांडवलाने आतापर्यंतचा विक्रम गाठला आहे.
2141 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ
आजच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारात तेजीसह बंद झालेल्या शेअर्सची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या 3817 कंपन्यांच्या शेअर्सचे व्यवहार झाले. त्यापैकी 2146 कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर, 1525 कंपन्यांच्या शेअर दरात घट झाली. 146 कंपन्यांच्या शेअर दरात कोणतेही बदल झाले नाहीत. आजच्या व्यवहारात 357 कंपन्यांच्या शेअर दराने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर, 19 कंपन्यांच्या शेअर दराने नीचांक गाठला. आजच्या व्यवहारात 384 कंपन्यांच्या शेअर दरांना अप्पर सर्किट लागले. तर, 176 कंपन्यांच्या शेअर दरांना लोअर सर्किट लागले.