Gautam Adani News : जगातील तिसरे आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी कठोर परिश्रम हे व्यवसाय आणि जीवनात यश मिळवण्याचं एकमेव सूत्र असल्याचं सांगितलं. जे हातात नाही त्याची चिंता करू नये, असंही त्यांनी सांगितलं. अदानी स्वत: अनेकदा अत्यंत कठीण परिस्थितीतून गेले आहेत. त्याचं अपहरण करण्यात आलं होतं, असा खुलासा त्यांनी स्वतः एका मुलाखतीत बोलताना केला होता. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान ते ताज हॉटेलमध्ये अडकले होते.


चिंता करून काहीच होत नाही... 


शनिवारी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गौतम अदानी यांनी त्यांचं अपहरण आणि 26/11 च्या मुंबई हल्ल्याशी संबंधित एक भयानक गोष्ट सांगितली. गौतम अदानी म्हणाले की, त्यांनी आयुष्यात दोनदा मृत्यू जवळून पाहिला आहे. आपल्या अपहरणाबद्दल बोलताना गौतम अदानी म्हणाले की, 'वाईट काळ विसरलेलंच बरं. मी प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेतो. अपहरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझी सुटका करण्यात आली. पण ज्या रात्री माझं अपहरण झालं, त्या रात्री मी शांतपणे झोपलो. कारण हातात नसलेल्या गोष्टींची जास्त काळजी केल्यानं काहीच फायदा होत नाही. त्यावेळी मी तेच केलं. 


अदानी म्हणाले की, "माझा विश्वास आहे की, जे आपल्या हातात नाही, त्याची चिंता कोणीच करू नये. नियती स्वतःच ठरवेल." दरम्यान, 1997 मध्ये अदानींच्या अपहरणाच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता.


26/11 च्या हल्ल्यावेळी ताज हॉटेलमध्येच होते अदानी... 


गौतम अदानी यांनी मुलाखतीत पुढे बोलताना सांगितलं की, "26 नोव्हेंबर 2008 च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ते ताज हॉटेलमध्ये होते आणि त्यातून सुखरूप बचावले. दुबई येथील एका मित्रासोबत ते ताज हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्या डोळ्यासमोर दहशतवादी गोळीबार करत होते. दहशतीचं ते दृश्य अगदी जवळून पाहिलं. पण घाबरलो नाही, कारण घाबरून काहीही होणार नव्हतं."


घटनेचं वर्णन करताना अदानी म्हणाले की, हॉटेलमध्ये रात्रीचं जेवण केल्यानंतर बिल देऊन बाहेर पडणार, तेवढ्यात त्यांना दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर संपूर्ण रात्र दहशतीत घालवली. जर ते काही मिनिटं आधी हॉटेलमधून बाहेर पडले असते, तर कदाचित काहीतरी वाईट घडलं असतं. त्यावेळी अदानी रात्रभर ताज हॉटेलमध्ये अडकले होते. हॉटेलचे कर्मचारी त्यांना मागच्या रस्त्यानं वरच्या मजल्यावर घेऊन गेले. सकाळी 7 नंतर कमांडो ते असलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर त्यांच्या मदतीनं अदानी सुखरुप बाहेर पडले.