Union Budget 2023:  देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जातो. अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीआधी हा अर्थसंकल्प पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थसंकल्पीय भाषण (Budget Speech) हे लांबलचक असते. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री किमान एक ते दीड तास भाषण करतात. मात्र, देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) सादर करताना सर्वात कमी वेळ भाषण केल्याचीही नोंद आहे. सर्वात कमी अवधीचे भाषण करण्याचा विक्रम हिरुभाई मुलजीभाई पटेल (Hirubhai M. Patel) यांच्या नावावर आहे.


हिरुभाई पटेल यांच्या नावावर विक्रम


हिरुभाई मुलजीभाई पटेल हे देशाचे 11 वे अर्थ मंत्री होते. 1977 मधील जनता पक्षाच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. या सरकारचे पंतप्रधान म्हणून मोररजी देसाई होते. हिरुभाई मुलजीभाई पटेल यांनी अर्थसंकल्प सादर करताना अवघ्या 800 शब्दांचे भाषण सादर केले होते. हे सर्वात कमी कालावधीचे अर्थसंकल्पीय भाषण आहे.
 
हिरुभाई मुलजीभाई पटेल हे मोरारजी देसाई  सरकारच्या काळात 26 मार्च 1977 मध्ये अर्थमंत्री झाले होते. ते देशाचे 11 वे अर्थमंत्री होते. 24 जानेवारी 1979 पर्यंत त्यांनी देशाच्या अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर ते देशाचे गृहमंत्रीदेखील झाले होते. 


निर्मला सीतारमण यांच्या नावावरही विक्रम


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्री म्हणून 2019-20 मध्ये पहिल्यांदा अर्थसंकल्पीय भाषण केले होते. यावेळी त्यांनी दोन तास 17 मिनिटे भाषण करत विक्रम रचला होता. पुढील वर्षी त्यांनी स्वत: चा विक्रम मोडीत काढला. 2020-21 मध्ये अर्थसंकल्पीय भाषण करण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी  दोन तास 42 मिनिटांचा वेळ घेतला. ही वेळ आणखी लांबी असती. मात्र, प्रकृती बरी वाटत नसल्याने त्यांनी दोन पाने वाचली नाहीत.


अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या जसवंत सिंह यांच्या नावावर सर्वाधिक भाषणाचा विक्रम होता. जसवंत सिंह यांनी 2003 मध्ये अर्थसंकल्प सादर करताना दोन तास 15 मिनिटे भाषण केले होते. 


सर्वाधिक शब्दाच्या भाषणांचा विक्रम 


देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांच्या नावावरदेखील एक अनोखा विक्रम आहे. वर्ष 1991 मध्ये मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला. त्यांचे हे भाषण 18,650 शब्दांचे होते. यानंतर अरुण जेटली (Arun Jaitley) यांनी सर्वाधिक शब्दांचे अर्थसंकल्पीय भाषण सादर केले. 2018 च्या अर्थसंकल्पीय भाषणात अरुण जेटली यांनी 18,604 शब्द वापरले होते.