मुंबई : निर्मला सीतारमण या 2026-27 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पाला शेअर बाजारावर थंड प्रतिसाद पाहायला मिळतोय. निर्मला सीतारमण यांचं भाषण सुरु होऊन एक तास होत आलेला असताना शेअर बाजारात निफ्टी आणि सेन्सेक्सवर तेजी आणि घसरण सुरुच आहे. अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होत असताना सेन्सेक्स आणि निफ्टी 50 हे दोन्ही निर्देशांक सपाट असल्याचं पाहायला मिळतंय. 

11.52 मिनिटांनी निफ्टी 50  निर्देशांक  25320  अंकांवर ट्रेड होत असताना पाहायला मिळाला. तर, सेन्सेक्स  82378 वर ट्रेड होत होता.  सेन्सेक्स मध्ये देखील तेजी आणि घसरण पाहायला मिळाली. बँक निफ्टी, फिन निफ्टी, निफ्टी मिडकॅप सिलेक्ट, बँकेक्समध्ये देखील घसरण आणि तेजी सुरु आहे. निफ्टी टोटल मार्केट, निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी 100, निफ्टी मिडॅकप, निफ्टी आयटी, निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकात घसरण  पाहायला मिळतेय.   

परदेशी नागरिक शेअर खरेदी करू शकणार

आता परदेशी नागरिक थेट भारतीय शेअर्स खरेदी करू शकणार. भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींना पोर्टफोलिओ गुंतवणूक योजनेद्वारे इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी दिली जाईल. वैयक्तिक मर्यादा 5 टक्क्यांवरून 10 टक्क्य़ांपर्यंत वाढवली जाणार आहे, तर अशा सर्व गुंतवणूकदारांसाठी एकत्रित मर्यादा 10 टक्क्यांवरून 24 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

या बदलामुळे गंभीर परदेशी वैयक्तिक गुंतवणूकदारांना भारतीय कंपन्यांमध्ये अधिक महत्त्वपूर्ण हिस्सेदारी घेता येईल, ज्यामुळे संभाव्यतः किमती निश्चितीमध्ये सुधारणा होईल, भागधारकता अधिक व्यापक होईल आणि दीर्घकालीन भांडवल निर्मितीला पाठिंबा मिळेल, असं निर्मला सीतारमण म्हणाल्या. 

विकसित भारताच्या दिशेनं जाणारा अर्थसंकल्प

निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना शाश्वत आर्थिक विकासासाठी सहा विभागांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सांगितलं. यासाठी 7 क्षेत्रातांमधील उत्पन्न वाढीवर लक्ष देणार असल्याचं म्हटलं. उद्योग क्षेत्र, एमएसएमएई, इन्फ्राला प्रोत्साहन, दीर्घकालीन सुरक्षा आणि स्थिरता आणि शहरी आर्थिक विभागांची निर्मिती करणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं. 

केंद्र सरकारचं कर्तव्य म्हणून विकसित भारतासाठी सुधारणांची एक्सप्रेस सुरु राहणार असल्याची घोषणा देखील निर्मला सीतारमण यांनी केली. आमचं सरकार विकसित भारताच्या दिशेनं विश्वासानं पाऊल टाकतंय, असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलंय. या अर्थसंकल्पात 2026-27 सार्वजनिक भांडवली खर्च  12.2  लाख कोटी अपेक्षित धरण्यात आला आहे. केंद्र सरकारनं भाषणाऐवजी सुधारणांना प्राधान्य दिलं, असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सूक्ष्म आणि लघू आणि मध्यम उद्योगांसाठी  10 हजार कोटी रुपयांची घो,णा केली. यातून भविष्यातील रोजगार निर्मिती उद्योगांना अर्थसहाय्य केलं जाईल.  2000 कोटी रुपयांचा आत्मनिर्मभर भारत फंड  हा सूक्ष्म उद्योगासाठी जोखीम निधी म्हणून दिला जाईल. एमएसएमईला टीअर  2  आणि टीअर 3 शहरांमध्ये प्रोत्साहन दिलं जाईल.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)