नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला म्हणजे आज देशाचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होणार याकडे देशातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे. निर्मला सीतारमण कोणत्या 10 मोठ्या घोषणा करु शकतात हे जाणून घेणार हे जाणून घेणार आहोत.
1. आयकर
गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प जाहीर करताना निर्मला सीतारमण यांनी नव्या कर रचनेनुसार 12 लाखापर्यंत कर सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला होता. याशिवाय पगारदार व्यक्तींना 75 हजारांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. टॅक्स स्लॅब अधिक सुलभ केला होता. मात्र, काही करदाते अजूनही जुन्या कररचनेचा वापर करत आहेत. त्यामुळं त्यांच्याकडून 12 लाखांपर्यंतची करसवलत 14 लाख करावी अशी मागणी केली जातेय.
2. जुनी कररचना
नव्या कररचनेनुसार 12 लाख रुपयांपर्यंत कर सवलत देण्यात आली आहे. मात्र, काही करदाते जुनी कररचना चांगली मानतात. त्यांच्याकडून जुन्या कररचनेत कर सवलत वाढवण्याची मागणी केली जात आहे. सध्या बेस कर सवलत मर्यादा 2.5 लाख रुपये आहे. मात्र सेक्शन 87 अ नुसार कर रिबेट दिला जातो. त्यामुळं वार्षिक कमाईवरील करसवलत 5 लाख रुपये होते. ती 8 लाख करण्याची मगणी केली जातेय.
3. टीडीएस कपात
2025 च्या अर्थसंकल्पात केंद्रानं ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस कपातीची मर्यादा 50 हजार रुपयांवरुन 1 लाख रुपये केल होती. घरभाड्यातून मिळणाऱ्या कमाईवरील मर्यादा 2.40 लाखांवरुन 6 लाख केली होती. ती वाढवून 10 लाख करण्याची मागणी होते. ज्येष्ठ नागरिकांची टीडीएस कपातीच मर्यादा 1 लाखांवरुन 2 लाख करावे, अशी मागणी केली जातेय.
4. NPS निवृत्ती फंडावर करसवलत
सरकारनं नॅशनल पेमेंट सिस्टीमनुसार गैरशासकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 80 टक्के रक्कम निवृत्तीच्या वेळी काढण्याची परवानगी दिली आहे. तर 20 एन्युटीसाठी ठेवले आहेत. त्यात एनपीएस सूट नव्या कररचनेत घेऊन 80 टक्के रक्कम काढण्यावर शून्य टक्के कर लावावा, अशी मागणी केली जातेय.
5. GST सुधारणा
केंद्र सरकारनं काही महिन्यांपूर्वी जीएसटी कररचनेत बदल केला आहे. 250 हून अधिक वस्तूंचे दर कमी झाले आहेत. त्यानंतर शिक्षण, लघू उद्योग, रिअल इस्टेटमध्ये सूट देण्याची मागणी होती. याशिवाय पेट्रोल आणि डिझेल जीएसटीत आणण्याची मागणी केली जातेय.
6. विमा विमा क्षेत्र 0 टक्के जीएसटीमध्ये ठेवणे आणि 100 टक्के विदेशी गुंतवणुकीला मान्यता मिळाल्यानंतर विमा आणि आरोग्य विमा गावांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारनं प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
7. सोना-चांदी
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीनं 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सोनं दीड लाखांच्या पार पोहोचलं आहे. दरवाढीमुळं सराफा व्यवसायावर परिणाम झाला आहे. यामुळं सोने आणि चांदीवर लावण्यात येणारं आयात शुल्क कमी करावं, जीएसटी दरात कपात करावी, अशी मागणी केली जातेय.
8. शेतकऱ्यांना काय अपेक्षा
शेतकऱ्यांना यावेळी पीएम किसान सन्मान निधीची रक्कम वाढण्याची अपेक्षा आहे. पीएम किसान सन्मानची सध्याची रक्कम 6000 रुपये आहे, ती वाढून 12000 हजार होण्याची अपेक्षा आहे.
9. शेअर बाजाराला काय अपेक्षा
जागतिक तणावाचा परिणाम शेअर बाजारावर होतोय. त्यामुळं एलटीसीजी आणि एसटीसीजी आणि एसटीटी मध्ये कपातीची मागणी केली जाते. याशिवाय विदेशी गुंतवणूकदारांना बाजारात परत येण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणा असावी अशी अपेक्षा आहे.
10.ज्येष्ठ नागरिकांना सूट
करोना संसर्गापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या तिकीट बुकिंगमध्ये सवलत दिली जायची. ती सेवा बंद आहे. ती सेवा पुन्हा सुरु करावी अशी मागणी केली जातेय.
