जळगाव : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारमण यांनी नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील आयात शुल्क कमी केलं जाईल किंवा सोने चांदीवरील जीएसटी कमी केला जाईल, अशी अपेक्षा सोने ग्राहकांना आणि सराफांना होती. मात्र, सोने आणि चांदी संदर्भात कोणताच निर्णय केंद्रीय अर्थसंकल्पात न घेतल्यानं सोने आणि चांदीचे दर असेच कायम राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.   

केंद्रीय अर्थ संकल्पात सोने चांदी विषयक कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याने,त्याचा सोने चांदी दराच्या बाबत कोणताही परिणाम नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून आज पुन्हा एकदा सोने चांदीच्या दरात  घसरण झाल्याचं पाहायला मिळाले आहे.

गेल्या दोन दिवसात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने सर्व सामन्यांना दिलासा मिळाला असला तरी गुंतवणूकदारांना मात्र मोठा आर्थिक फटका बसल्याचे पाहायला मिळाले आहे. आज केंद्रीय अर्थ संकल्प जाहीर करण्यात आल्याच्या नंतर त्यात सोने चांदी विषयक कराच्या बाबत नव्याने कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्याने,त्याचा सोने चांदी दरावर कोणताही परिणाम होताना दिसत नसला तरी जागतिक घडामोडी पाहता,सोने चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

काल सोन्याचे दर हे जीएसटी सह 1 लाख 60 हजारांवर होते. सोन्याच्या दरात आज पाच हजार रुपयांची घसरण होऊन ते 1लाख 55 हजार रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. तर, चांदीच्या दरात देखील 30 हजार रुपयांची घसरण होऊन चांदीचे दर 270000 रुपयांच्या खाली आले आहेत. सोनाच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने,सर्व सामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

1  फेब्रुवारी 2026 ला अर्थसंकल्पादिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. स्पॉट मार्केटमध्ये चांदीचा दर 265600 रुपयांवर आला. चांदीच्या दरानं 4 लाख 20 हजारांचा उच्चांक गाठला होता. ज्या वेगानं चांदीचे दर वाढले होते, त्याच वेगानं चांदीचे दर खाली आले.  चांदीचे दर जवळपास 1 लाख 34 हजार रुपयांनी घसरले. 

केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील आयात शुल्क कमी केलं जाईल अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र, सोने आणि चांदीवरील आयात शुल्क कमी करण्यात आलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर वाढत असल्यानं गुंतवणूदारांकडून सिल्वर आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केली जात होती. मात्र, त्यात देखील आज घसरण झाली.