Economic Survey 2022-23 Health : कोरोना महासाथीला अटकाव करण्यासाठी देशभरात राबवण्यात आलेल्या कोरोना लसीकरण (Coronavirus Vaccination) मोहिमेचे आर्थिक सर्वेक्षणात (Economic Survey 2022-23) कौतुक करण्यात आले आहे. कोरोना लसीकरणात मोठ्या प्रमाणावर आलेल्या अडचणींवर मात करत लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात आल्याचे आर्थिक सर्वेक्षणात नमूद करण्यात आले. 6 जानेवारी 2023 पर्यंत देशभरात 220 कोटी लशीचे डोस देण्यात आले आहेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्यांपैकी 90 टक्के लोकांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले असल्याची माहिती देण्यात आली.
भारताने कोरोना लसीकरणाची मोहीम 16 जानेवारी 2021 पासून सुरू करण्यात आली. ही लसीकरण मोहीम जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम ठरली. कमी वेळेत अधिकाधिक लोकांना कोरोना लस देण्याचे आव्हान होते.
आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले की, कोविनच्या (Co-Win) मजबूत डिजीटल पायाभूत सुविधेमुळे देशात 220 कोटी लस देणे शक्य झाले. कोरोना महासाथीची सुरुवात होण्याआधीच भारताकडून मोठ्या प्रमाणावरील लसीकरण मोहिमेची तयारी सुरू करण्यात आली होती. सरकारने 'अंत्योदय'चे मूलभूत तत्वज्ञानाला अनुसरून डिजीटल आरोग्य सेवा वितरणावर अधिक लक्ष केंद्रीत केले असल्याचे अहवालात म्हटले.
भारतात कोविड-19 लसीकरणाचे नियोजन, अंमलबजावणी, देखरेख आणि मूल्यमापन करण्यासाठी, को-विन प्रणालीने संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी उपयुक्ता दाखवली. लसीकरणासाठी पुरवठा साखळीत जबाबदारी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, प्लॅटफॉर्मने राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावर (सरकारी आणि खाजगी) रिअल-टाइम स्टॉक ट्रॅकिंग प्रदान केले. त्यामुळे लशींचा अपव्यय टाळता आला. प्री-कोविन आधीच्या काळात लसींचा अपव्यय होत असे, तो टाळता आल्याकडे आर्थिक सर्वेक्षण अहवालात लक्ष वेधण्यात आले.
कोविन अॅप हे 12 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असल्याने नागरिकांना याचा वापर करताना मोठा फायदा झाला असल्याचे आर्थिक सर्वेक्षणात नमूद करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, लसीकरण प्रमाणपत्र तयार करण्यात आले होते.
आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडताना, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, सहा जानेवारी 2023 पर्यंत देशभरात 220 कोटी कोरोना लस देण्यात आले आहेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्या लोकसंख्येपैकी 97 टक्के जणांना कोविडचा किमान एक डोस घेतला आहे. तर, 90 टक्के पात्र नागरिकांनी कोविडचे दोन्ही डोस घेतले आहेत. वय 12-14 वर्ष या वयोगटासाठी 16 मार्च 2022 पासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहेत. तर, 10 एप्रिल 2022 पासून 18 ते 59 वर्षाच्या नागरिकांसाठी खबरदारीचा तिसरा डोस देण्यास सुरुवात झाली. जवळपास 22.4 कोटी डोस देण्यात आले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या: