नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी आर्थिक वर्ष 2026-27 साठी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पीय भाषण करताना निर्मला सीतारमण यांनी आरबीआय आणि सार्वजनिक बँकांकडून मिळणाऱ्या लाभांशाबाबत घोषणा केली. 

आरबीआय आणि सार्वजनिक बँका सरकारची तिजोरी भरणार

निर्मला सीतारमण यांनी आरबीआय आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून सरकारला 3.16 लाख कोटींचा लाभांश 2026-27 या वर्षात मिळेल, अशी आशा असल्याचं म्हटलं. आरबीआयकडून  2.68 लाख कोटींचा लांभाश मिळेल अशी आशा अशी आशा सरकारला आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मिळणारा लाभांश हा सरकारच्या उत्पन्नाचा मोठा स्त्रोत आहे.  आरबीआय सरकारच्या पैशांचं व्यवस्थापन करते. त्या पैशातून जी कमाई होते त्यातून काही रक्कम लाभांश म्हणून सरकारला दिली जाते. आरबीआयकडून मिळणाऱ्या लाभांशामुळं सरकारला राजकोषीय तूट कमी करण्यास मदत मिळते. 

सरकारला आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये रिझर्व्ह बँक आणि सार्वजनिक बँका यांच्याकडून लाभांश म्हणून 2-3 लाख कोटी रुपये मिळू शकतात असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात हा अंदाज  2.56 लाख कोटी रुपये होता.  सरकारला बँकांकडून अधिक लाभांश मिळणं म्हणजे सरकारी बँकांचा भक्कम ताळेबंद आणि करन्सी मार्केटमधील तेजी आणि घसरणीचा परिणाम असू शकतो.  रुपयाचं मूल्य घसरु नये म्हणून आरबीआयला डॉलरची विक्री करावी लागलेली आहे. ज्यामुळं  आरबीआयचं उत्पन्न वाढलं आहे. यामुळं 2026 -27 मध्ये अधिक लाभांश मिळेल असा अंदाज आहे. 

गेल्या वर्षीच्या अर्थसकंल्पात लाभांशाबद्दल जो अंदाज वर्तवण्यात आला होता. ती लाभांशाची रक्कम सरकारला चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर मिळेल. सरकारी बँका देखील  वार्षिक निकाल जाहीर केल्यानंतर लाभांश जाहीर करतात. त्यानंतर लाभांशाची रक्कम वर्ग केली जाते.  मे 2025 मध्ये आरबीआयनं सरकारला 2.69 लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश सरकारला दिला होता. 

दरम्यान, निर्मला सीतारमण यांनी नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. सीतारमण यांनी संसदेत अर्थसकंल्प मांडला. हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करणार असल्याचं म्हटलं. विकसित भारतासाठी आम्ही सुधारणांवर जोर देत असल्याचं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं. निर्मला सीतारमण यांनी शेअर बाजारातील ऑप्शन अँड फ्युचर ट्रेडिंगवरील एसटीटी वाढवल्यानं शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)