Budget 2023 PM Awas Yojana :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात (Budget 2023) अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. निर्मला सीतारमण यांनी परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी आणखी बळ दिले आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी (PM Awas Yojana) यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. आधीच्या तुलनेत पीएम आवास योजनेत तब्बल 66 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 


पंतप्रधान आवास योजनेतंर्गत गरीब, अल्प उत्पन्न गटासाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती अथवा लाभार्थ्यांच्या नावे अनुदान दिले जाते. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या निधीत 66 टक्क्यांची वाढ केली आहे. आता, पीएम आवास योजनेत 79 हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 


सरत्या 2022-23 या आर्थिक वर्षात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी (PMAY) 48,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. देशातील सर्व लोकांना त्यांचे स्वतःचे घर देणे हे प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट आहे. 


या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना घरे वाटप केली जातात. यामध्ये ज्यांच्याकडे कायमस्वरूपी घर नाही अशा लोकांना घरे दिली जातात. गृहनिर्माण योजनेंतर्गत यादी तयार करताना लाभार्थीकडे दुचाकी किंवा तीनचाकी वाहन नाही याची तपासणी केली जाते. यासोबतच इतरही अनेक मानके निश्चित करण्यात आली आहेत.


आतापर्यंत देशातील लाखो लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेंतर्गत डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना एक लाख 20 हजार रुपये तर सपाट भागातील घरांच्या बांधकामासाठी एक लाख 30 हजार रुपये देण्यात येतात. या योजनेला सरकारकडून नेहमीच अर्थसंकल्पात प्राधान्य दिले जाते आणि यावेळीही मोठे पाऊल उचलत बजेटमध्ये वाढ करण्यात आली आहे.


> पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काय तरतूदी


देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आज काही तरतूदी करण्यात आल्या. त्यामध्ये  ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्टक्चर प्रोजेक्टसाठी 75 हजार कोटी रुपये तर अर्बन इन्फ्रा फंडासाठी दरवर्षी 10000 कोटी दिले जाणार आहेत. 


- ट्रान्सपोर्ट इन्फ्रा प्रोजेक्टवर 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
- अर्बन इन्फ्रा फंडासाठी दरवर्षी 10000 कोटी दिले जातील
- गटार साफ करण्याची प्रक्रिया पूर्णपणे मशीनवर आधारित असेल
- मिशन कर्मयोगी नागरी सेवकांची कार्यक्षमता वाढविण्याची घोषणा केली


इतर महत्त्वाच्या बातम्या: