मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या रविवारी म्हणजेच 1  फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी शुक्रवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. आज शेअर बाजार घसरणीसह सुरु झाला. बीएसई सेन्सेक्स 619 अंकांच्या घसरणीसह 81947 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी देखील 171 अंकांच्या घसरणीसह कारभार करत होता. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. यात भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत वाढीचा अंदाज वर्तवला आहे. तरी देखील शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळाली. 

आज शेअर बाजारात घसरण दिसून आली त्याचं प्रमुख कारण विदेशी गुंतवणूकदारांकडून करण्यात येत असलेली विक्री होय. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून जानेवारीत 43686.59 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री करण्यात आली आहे. यापूर्वी 2025 मध्ये 19 दशलक्ष डॉलर भारतीय बाजारातून विदेशी गुंतणूकदारांकडून काढून घेण्यात आले. 29 जानेवारीला विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 394 रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. याचवेळी 2638 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केली आहे. 

रुपयांची घसरण

डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण झाल्यानं बाजारावर परिणाम झाला. गुरुवारी रुपया डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर पोहोचला होता. या महिन्यात रुपया 2.3 टक्के घसरला आहे. रुपयातील घसरणीमुळं गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. निफ्टी आयटी निर्देशांकात 1 टक्क्यांची घसरण दिसून आली. मेटल  निर्देशांक 4 टक्क्यांनी घसरला.  वित्तीय, ऑईल अँड गॅस , कॅपिटल गुडस या सारख्या शेअरवर दबाव दिसून आला. याशिवाय  क्रूड ऑईलचे वाढते दर हा देखील चिंतेचा विषय आहे. कच्चा तेलाच्या वाढत्या किमती आणि भूराजनैतिक अनिश्चिततांमुळं  बाजारावर परिणाम दिसून आले. 

बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 296.59 अंकांच्या घसरणीसह 82269.78 अंकांवर होता. तर, निफ्टी 50 निर्देशांक 98.25 अंकांच्या घसरणीसह 25320.65 अंकावर पोहोचला आहे. 

जिओजितचे मुख्य रणनीतीकार डॉ. वी के विजयकुमार म्हणाले की अर्थसंकल्प जवळ येत असताना मार्केट हेडविंड आणि टेलविंड दोन्हीचा सामना कर आहेत. भूराजनैतिक अस्थिरता हे देखील प्रमुख कारण बनलं आहे.  ट्रम्प यांच्याकडून टॅरिफची धमकी देणं सुरुच असल्यानं त्याचा देखील परिणाम बाजारावर होतोय.   

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)