नवी दिल्ली : बिहार सरकारनं मायक्रो फायनान्स कंपन्यांसाठी नवे नियम बनवले आहेत. बिहार सरकारच्या मायक्रो फायनान्स कंपन्यांसंदर्भातील कडक धोरणामुळं दिवसभरात मायक्रो फायनान्स कंपन्यांचे स्टॉक पडल्याचं दिसून आलं. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, फ्यूजन फायनान्स आणि एल अँड टी फायनान्स या सूक्ष्मवित्त पुरवठा करणाऱ्या म्हणजेच मायक्रो फायनान्स कंपन्यांचे स्टॉक घसरले आहेत.
बिहार सरकारचे नवे नियम
बिहार सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार मायक्रो फायनान्स कंनप्यांना आरबीआयचा परवाना असला तरी बिहार सरकारकडे नोंदणी करावी लागेल.
कंपन्यांना नव्या नियमानुसार मुद्दल जितकं असेल त्या पेक्षा अधिक रक्कम व्याज म्हणून वसूल करता येणार नाही. म्हणजेच जर 10000 रुपयांचं कर्ज एखाद्यानं घेतला असेल तर व्याजाची रक्कम त्यापेक्षा अधिक असू नये.
कंपन्यांना आता कर्ज देण्यापूर्वी राज्याच्या वित्त विभागाची परवानगी घ्यावी लागेल.यामुळं सरकार पाहू शकेल की कर्ज घेणारा व्यक्ती किंवा संस्था पहिल्यापासून कर्जबाजारी आहे की नाही.
कर्ज वसुलीचे नियम देखील कठोर करण्यात आले आहेत. एखादी कंपनी कर्जवसुली करण्यासाठी धमकावत असेल तर ते कृत्य गुन्हेगारी स्वरुपाचं मानलं जाईल. या नियमांचा उद्देश कंपन्यांची मनमानी थांबवणे आणि गरीब कर्जदारांना वाचवणे हा आहे. जर एखादी कंपनी जबरदस्ती वसुली करत असल तर तातडीनं कारवाई केली जाईल.
एखाद्या व्यक्तीला किती कर्ज द्यावं, याची मर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. एखादा व्यक्ती एका वेळेस केवळ दोन संस्थांकडून कर्ज घेऊ शकतो. याचा उद्देश लोकांना कर्जाच्या जाळ्यातून वाचवणं आहे.
मायक्रो फायनान्स कंपन्यांचे स्टॉक्स घसरले
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या शेअरमध्ये 6 टक्के घसरण झाली. हा स्टॉक 13.91 रुपयांवर बंद झाला.तर, एल अँड टी फायनान्स होल्डिंग्जच्या शेअरमध्ये 19.65 रुपयांची घसरण झाली. एल अँड टीचा शेअर 280.25 रुपयांवर पोहोचला. तर, फ्यूजन फायनान्सच्या शेअरमध्ये 14.01 रुपयांची घसरण झाली. हा स्टॉक 190 रुपयांवर बंद झाला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
