Onion Prices News : यंदा देशभरात चांगला पाऊस (Rain) झाला आहे. सध्या परतीचा मान्सून (Monsoon) देशातील अनेक भागात धुमाकूळ घालताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक भागात शेती पिकांना (Agriculture Crop) फटका देखील बसला आहे. दरम्यान, सध्या कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. कांद्याच्या दरात चांगली वाढ जाली आहे. मात्र, दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला झल लागत असल्याचं बोललं जात आहे. सध्या कांद्यासह टोमॅटो तसेच हिरव्या भाज्यांचे भाव देखील वाढले आहेत.
देशातील मेट्रो शहरांतील बहुतेक किरकोळ बाजारात कांदा आणि टोमॅटोचे भाव 70 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. हिरव्या भाज्यांचे भावही भडकले आहेत. अहवालानुसार, मोठ्या शहरांमध्ये शिमला मिरची, पालक यांसारख्या हिरव्या भाज्यांच्या किमती 100 रुपये किलोपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसत आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे सध्या या भाज्या विक्रीसाठी आहेत, त्यांना मात्र फायदा होत आहे.
का होतेय भाज्यांच्या दरात वाढ?
कांदा, टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे देशातील अनेक भागांत झालेला मुसळधार पाऊस. महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आदी प्रमुख भाजीपाला उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे आशियातील सर्वात मोठ्या भाजीपाला आणि फळ बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे पावसामुळे रस्ते खराब झाल्याने पुरवठा साखळी प्रभावित झाली आहे. यामुळं दरात मोठी वाढ झाली आहे.
सरकारकडून सवलतीच्या दरात कांदा विक्री
दरवर्षी पावसाळ्यात या महिन्यांत भाज्यांचे भाव वाढलेले दिसून येतात. नंतर त्यांच्या किमती हळूहळू कमी होतात. कांद्याच्या बाबतीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तो अनुदानावर विकण्यास सुरुवात केली आहे. कांद्याच्या चढ्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने 5 सप्टेंबरपासून प्रमुख शहरांमध्ये सवलतीच्या दरात कांद्याची विक्री सुरू केली आहे. याअंतर्गत 35 रुपये किलो या सवलतीच्या दरात कांदा लोकांना उपलब्ध करून दिला जात आहे.
टोमॅटोची विक्री सुरु
एनसीसीएफ आणि नाफेड या सहकारी संस्थांमार्फत सरकार अनुदानित दराने कांद्याची विक्री करत आहे. सरकारच्या बफर स्टॉकमधून कांदे सवलतीच्या दरात विकले जात आहेत. येत्या काही दिवसांत सरकार टोमॅटोची अनुदानित विक्रीही सुरू करू शकते, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्यानंतर सरकारने गेल्या वर्षी सवलतीची विक्री केली होती, ज्यामुळे किमती नियंत्रणात राहण्यास मदत झाली.
महत्वाच्या बातम्या: