Bengaluru Mumbai Express Train बंगळुरु : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या राजधानीच्या शहरांना जोडणारी बंगळुरु मुंबई एक्स्प्रेस सुरु होत आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवत या एक्स्प्रेसचं उद्घाटन केलं. या एक्सप्रेसचा कर्नाटकातील काही शहरांसह पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे.
बंगळुरु - मुंबई एक्स्प्रेस मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत धावेल. या रेल्वेगाडीचा फायदा बंगळुरु, हुबळी धारवाड विभाग, बेळगाव, सांगली, सातारा, पुण्यातून मुंबईचा प्रवास करणाऱ्यांना होणार आहे. ही एक्स्प्रेस दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाकडून चालवली जाईल.
नव्यानं सुरु होत असलेल्या बंगळुरु मुंबई बंगळुरु एक्सप्रेसचा क्रमांक 16553/16554 असा आहे. उद्घाटनाच्या दिवशी म्हणजेच आज ही एक्स्प्रेस विशेष सेवा म्हणून 06557 या क्रमांकानं धावेल. ही एक्स्प्रेस सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरु ते लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई या दरम्यान ही रेल्वे धावेल.एसएमव्हीटी बंगळुरु ते एलटीटी मुंबई या दोन्ही स्थानकामधील अंतर 1210 किलोमीटर असून या प्रवासासाठी 24 तास 5 मिनिटे लागतील. बंगळुरु येथून या एक्स्प्रेसची नियमित सुरुवात 23 मे पासून होईल, तर मुंबईतून ही सेवा नियमितपणे 24 मे पासून होईल.
बंगळुरु-मुंबई- बंगळुरु एक्स्प्रेसचे थांबे
तुमकुरु, दावणगीरी, एसएसएस हुबळी, धारवाड, बेळगाव, मिरज, सांगली, कराड, सातारा, लोणंद, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण आणि ठाणे. एसएमव्हीटी बंगळुरु ते एलटीटी मुंबई ही एक्स्प्रेस(16553) आठवड्यातून दोनदा धावणार आहे. शनिवारी आणि मंगळवारी ही एक्सप्रेस रात्री 8.35 मिनिटांनी मुंबईकडे जाण्यासाठी बंगळुरुतून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी आणि बुधवारी रात्री 8.40 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ही एक्स्प्रेस(16554) रविवारी आणि बुधवारी रात्री 11.15 मिनिटांनी सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी म्हणजेच रात्री साडे दहा वाजता बंगळुरु येथे सोमवारी आणि गुरुवारी पोहोचेल. SMVT बंगळुरु- LTT मुंबई एक्स्प्रेस आठवड्यातून दोनदा धावणार आहे. या एक्स्प्रेसमध्ये एसी-2 चा एक कोच, एसी-3 चे चार कोच, सहा स्लीपर कोच, चार जनरल सेकंड क्लास कोच, एक सेकंड क्लास लगेज कम ब्रेक व्हॅन यासोबत दिव्यांगाची सुविधा असेल. यात एक लगेज कम जनरेटर कम ब्रेक व्हॅन असे एकूण 17 एलएचबी कोच असतील.
बंगळुरु - मुंबई स्लीपर कोचचं तिकीट 750 रुपये, थ्री टायर एसीचं तिकीट 1880 रुपये तर, टू टायर एसीचं तिकीट 2575 रुपये असेल.
