Continues below advertisement


नवी दिल्ली : बँकेमध्ये नोकरी करण्यासाठी जे उमेदवार इच्छूक आहेत, त्यांच्यासाठी मोठी अपडेट आहे. बँक ऑफ बडोदानं पात्र उमेदवारांकडून लोकल बँक ऑफिसर या पदासाठी अर्ज मागवले आहेत. बँकेकडून एकूण 2500 जागांवर भरती केली जाणार आहे. महाराष्ट्रातून एकूण 485 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी संबंधित उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. लोकल बँक ऑफिसर या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2025 इतकी आहे.


अर्ज कोण करु शकतं?


बँक ऑफ बडोदानं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करतील त्याच राज्यात नियुक्ती केली जाईल. ऑनलाईन अर्जासोबत फी देखील भारवी लागेल. बँक ऑफ बडोदाच्या जाहिरातीनुसार एकूण 2500 जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारानं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण झालेलं आवश्यक आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पदवीधारक देखील अर्ज करु शकतात. सीए, कॉस्ट अकाऊंटट, इंजिनिअरिंग किंवा वैद्यकीय पदवीधार देखील अर्ज करु शकतात. उमेदवारांचं वय 21 ते 30 दरम्यान असावं. पदवी घेतल्यानंतर संबंधित उमेदवारांकडे आरबीआयच्या यादीतील शेड्यूल कर्मशिअल बँक आणि प्रादेशिक ग्रामीण बँकेकडील किमान एक वर्ष कामाचा अनुभव असावा. उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करणार आहे, त्यांच्याकडे त्या राज्यातील भाषेवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. त्या उमेदवाराला संबंधित भाषा बोलता, लिहिता आणि वाचता आणि समजून घेता आली पाहिजे.


महाराष्ट्रातून एकूण 485 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये 72 जागा अनुसुचीत जाती, 36 अनुसुचित जमाती, 130 जागा ओबीसी, 48 जागा ईडब्ल्यूएस आणि 199 जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत.


बँक ऑफ बडोदामधील लोकल बँक ऑफिसर पदासाठी अर्ज करायचा असल्यास खुला, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये फी भरावी लागेल. तर, एससी, एसटी, दिव्यांग, माजी सैनिक आणि महिलांसाठी फी 175 रुपये आहे.


उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना पहिली 12 वर्ष त्यांनी ज्या राज्यातून अर्ज केला आहे, त्याच राज्यात किंवा प्रमोशन होईपर्यंत नोकरी करावी लागेल. निवड झालेल्या उमेदवारांना 48480 ते 85920 रुपयांदरम्यान वेतन मिळेल. लोकल बँक ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यांवर कर्ज असल्यास त्यांचा सिबिल स्कोअर देखील 680 पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. निवड झालेल्या उमदेवारांचा प्रोबेशनचा कालावधी देखील 1 वर्षांच्या दरम्यान असेल.


निवड प्रक्रिया :


लोकल बँक ऑफिसर पदासाठी निवड प्रक्रिया ऑनलाईन टेस्ट, सायकोमेट्रिक टेस्ट यानंतर गट चर्चा, मुलाखत या टप्प्यांमधून घेतली जाईल. पहिल्यांदा ऑनलाईन टेस्ट उत्तीर्ण झालेलं आवश्यक आहे. ऑनलाईन टेस्ट इंग्रजी भाषा, बँकिंगसंदर्भातील ज्ञान, सामान्य आणि आर्थिक बुद्धिमत्ता, रिझनगिंग अॅबिलिटी आणि क्वांटिटेटिव अॅप्टिट्यूडचा समावेश असेल.


उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करेल त्याला त्या राज्यातील भाषा येणं आवश्यक आहे. लिहिणे, वाचणे, बोलणे आणि भाषा समजून घेणे या गोष्टींवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारानं दहावी आणि बारावीचं शिक्षण घेत असताना ती भाषा अभ्यासली असल्याचा पुरावा देण्यासाठी त्या दोन्ही वर्गांचं गुणपत्रक देणं आवश्यक आहे.