मुंबई : भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण पाहायला  मिळाली आहे. गुरुवार म्हणजेच 8 जानेवारी 2026 ला सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. सलग चार दिवस बाजारात घसरण झाल्यानं गुंतवणकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सेन्सेक्स 780.18 अंकांनी घसरला तर निफ्टी 50 मध्ये 263.90 अंकांची घसरण झाली. या घसरणीला अमेरिकेनं रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 500 टक्के टॅरिफ लादण्याचे संकेत दिल्यानं हातभार लागला. 

आज शेअर बाजारात सेन्सेक्सवर 200 अंकांच्या घसरणीसह ट्रेडिंग सुरु झालं. आज बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये  780.18 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 84180.96 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 50 निर्देशांक  263.90 अंकांच्या घसरणीसह 25876.85 वर बंद झाला. 

भारतीय शेअर बाजारात सर्वाधिक दबाव तेल आणि मेटल कंपन्यांच्या शेअरवर दिसून आला. हिंडाल्कोचा शेअर 3.77 टक्क्यांनी तर ओएनजीसीचा शेअर 3.12 टक्क्यांनी आणि जिओ फायनान्सच्या शेअरमध्ये  3 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. 

अमेरिकेचा इशारा अन् शेअर बाजारावर परिणाम

अमेरिकन काँग्रेसमध्ये रशियावर निर्बंध लादणारा कायदा संमत केला जाणार आहे. त्या कायद्याद्वारे रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. अमेरिकेनं रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर  500 टक्के टॅरिफ लादणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळं भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो. भारत रशियाकडून जवळपास 30 टक्के तेल आयात करतोय. 

अमेरिकेनं रशियाविरोधातील कायदा मंजूर केल्यास त्याचा फटका भारत,चीन आणि ब्राझीलला होण्याची दाट शक्यता आहे.पुढील 50 दिवसात रशियानं यूक्रेन विरुद्धचं युद्ध थांबवलं नाही तर  अमेरिका 500 टक्के निर्बंध लागू करणार आहे. 

भारत रशियन तेलाचा आयातदार देश असल्यानं भारतातून अमेरिकेला निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर अमेरिका 500 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादू शकते. याचा थेट फटका भारताच्या निर्यातीवर होऊ शकतो. अमेरिकन लोकांना भारतीय वस्तू महाग खरेदी कराव्या लागू शकतात. 

दरम्यान अमेरिकेकडून 500 टक्के टॅरिफचा मुद्दा समोर आणला जात असला तरी भारताकडून यावर अद्याप प्रतिक्रिया समोर आलेली नाही. भारतावर अमेरिकेनं अगोदरच 50 टक्के टॅरिफ लादलेलं आहे. त्यापैकी 25 टक्के टॅरिफ रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं आहे. 

भारतीय शेअर बाजारातील घसरणीला जागतिक बाजारांची कामगिरी देखील कारणीभूत आहे. जपानचा निक्केई 25 , हाँगकाँगकचा  हँग सेंगमध्ये देखील घसरण झाली आहे. बुधवारी अमेरिकन बाजार देखील घसरणीसह बंद झाले.  दुसरीकडे विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारात विक्रीसच सत्र सुरुच ठेवण्यात आलं आहे. जानेवारीच्या सुरुवातीलाच विदेशी गुंतवणूकदारांनी हजारो कोटी रुपये  काढून घेतले आहेत. यामुळं देखील भारतीय शेअर बाजारावर दबाव वाढला आहे. मात्र, भारतीय कंपन्या येत्या काही दिवसात निकाल जाहीर करणार आहेत, त्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसू शकतो. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)