Air travel News : दिवाळीचा (Diwali) सण जवळ आला आहे. या सणाला सर्वचजण आपापल्या घरी जातात. अनेकजण नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्ताने घरापासून दूर असतात. दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्हाला विमानाने (Plane) घरी जायचे असेल तर या सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विमानाच्या प्रवास भाड्यात सरासरी 20 ते 25 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळं आता विमान प्रवास (Air travel) करणं स्वस्त झालं आहे. 


विमान प्रवासात (Air travel) नेमकी घसरण का झाली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. एका अहवालानुसार, अलीकडेच तेलाच्या किंमतीत झालेली घसरण यामुळे विमानाचे प्रवास भाडे कमी झाले आहे. कोणत्या मार्गांवर किती भाडे कमी झाले याबाबतची माहिती पाहुयात. ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म इक्सीगोच्या अहवालानुसार, देशांतर्गत मार्गावरील सरासरी विमान भाडे 20-25 टक्क्यांनी घटले आहे. या किमती 30 दिवसांच्या आगाऊ खरेदी तारखेवर आधारित सरासरी एक-मार्ग भाड्यासाठी आहेत. अहवालात 2023 चा कालावधी 10 ते 16 नोव्हेंबर आहे. तर या वर्षी तो 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर असा आहे. दरम्यान, विमान प्रवास भाड्यात 20 ते 25 टक्क्यांची घसरण झाल्यामुळं विमान प्रवास करणाऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. 


कोणत्या मार्गावर किती भाडे झाले कमी?


यावर्षी, बंगळुरु-कोलकाता फ्लाइटचे सरासरी विमान भाडे 38 टक्क्यांनी घसरुन 6319 रुपये झाले आहे. जे गेल्या वर्षी 10,195 रुपये होते.


चेन्नई-कोलकाता मार्गावरील तिकिटाची किंमत 8725 रुपयांवरुन 36 टक्क्यांनी घसरून 5604 रुपयांवर आली आहे.


मुंबई-दिल्ली फ्लाइटचे सरासरी विमान भाडे 8788 रुपयांवरुन 5762 रुपयांवर आली आहे. म्हणजे यामध्ये 34 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 


दिल्ली-उदयपूर मार्गावरील तिकिटांचे दर 11296 रुपयांवरुन 34 टक्क्यांनी घसरून 7,469 रुपयांवर आले आहेत.


दिल्ली-कोलकाता, हैदराबाद-दिल्ली आणि दिल्ली-श्रीनगर मार्गांवर ही घट 32 टक्के आहे.


विमान प्रवास भाड्यात नेमकी का झाली घसरण?


गेल्या वर्षी मर्यादित क्षमतेमुळे दिवाळीच्या आसपास विमान भाड्यात वाढ झाली होती. ज्याचे मुख्य कारण म्हणजे गो फर्स्ट एअरलाइनचे निलंबन. यावर्षी अतिरिक्त क्षमतेची भर पडली आहे, ज्यामुळे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रमुख मार्गांवरील सरासरी विमान भाडे वार्षिक आधारावर 20-25 टक्क्यांनी घटले आहे. दुसरीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे. त्याचा परिणामही दिसू लागला आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे विमान कंपन्यांच्या खर्चावर लक्षणीय परिणाम झाला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Solapur Airport : मोठी बातमी! सोलापूर विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून लायसन्स मंजूर