Adani Group Updates: अदानी समूह  (Adani Group) आता आणखी एक कंपनी आपल्या पंखाखाली घेण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्यासाठी अदानी समूहानं 4100 कोटी रुपयांची बोली लावली आहे. अदानी पॉवरनं लॅन्को अमरकंटक पॉवरला (Lanco Amarkantak Power) 4100 कोटी रुपयांची सुधारित ऑफर सादर केली आहे. औष्णिक वीज कंपनी लॅन्को अमरकंटक सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. त्यामुळे अदानी समूहासोबत कंपनीची बोलणी सुरू असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरुन आहे. 


अदानी समुहानं यापूर्वीही दिलेली ऑफर 


दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेली औष्णिक वीज कंपनी लॅन्को अमरकंटक विकत घेण्यासाठी अदानी समूहानं यापूर्वी 3650 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अदानी समुहानं सहा महिन्यांत आपली दुसरी ऑफर सादर केली आहे. यावरून लॅन्को अमरकंटकच्या खरेदीत अदानी पॉवर किती स्वारस्य दाखवत आहे, याचा अंदाज येऊ शकतो. दरम्यान, लॅन्को अमरकंटकवर मोठं कर्ज आहे, याच कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपनी आपला स्‍टेक विकत आहे, अशी माहिती मिळत आहे. 


अदानी पॉवरसमोर मोठं आव्हान 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, 95 टक्के कर्जदारांनी फायनान्स कॉर्पोरेशनच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमच्या योजनेअंतर्गत मतदान केलं होतं. ही ऑफर 10-11 महिन्यांनंतर सादर करण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, अदानी पॉवरला (Adani Power) अजुनही संधी आहे, कारण राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) नं PFC-नेतृत्वाखालील कन्सोर्टियमच्या 3,020 कोटी रुपयांच्या प्रक्रियेस मान्यता दिली नाही. दरम्यान, या बोली प्रक्रियेत दोन कर्जधारक देखील सहभागी आहेत, ज्यांच्याकडे कंपनीचे 41 टक्के कर्ज आहे. त्यामुळे अदानी पॉवरसाठी ही बाब नक्कीच आव्हानात्मक ठरू शकते. 


अदानींचे शेअर्स वाढले


अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात अदानी पॉवरचे शेअर्स 21.21 टक्क्यांनी वाढले होता. याशिवाय, गेल्या तीन महिन्यांत स्टॉकनं 44.60 टक्के परतावा दिला आहे. फेब्रुवारीमध्ये हाच प्रति शेअर 132.40 रुपये होता, परंतु तेव्हापासून आतापर्यंत शेअर इतका वेगानं वाढला आहे की, त्यानं गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत. या शेअर्सनी गुंतवणूकदारांना फेब्रुवारीपासून तब्बल 303 टक्क्यांचा परतावा दिला आहे.