Adani Group : गौतम अदानी (Gautam Adani) हे देशातील एक बडे उद्योगपती आहेत. सध्या त्यांच्या अदानी समुहाची (Adani Group) हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची कामं सुरु आहेत. दरम्यान, कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी अदानी ग्रुपने गेल्या काही महिन्यांत परतफेडीला वेग दिला आहे. सध्या अदानी समुहाची आर्थिक स्थिती सुधारल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं त्यांनी झपाट्यानं कर्जफेड करण्यास सुरुवात केलीय. 


कर्जाची पातळी पाच वर्षांतील सर्वात कमी


अदानी समूहाची आर्थिक स्थिती सुधारली आहे. त्यांच्या कर्जाच्या परतफेडीत वाढ झाली आहे. त्यामुळं आता समूहावरील कर्जाची पातळी पाच वर्षांतील सर्वात कमी झाली आहे. दरम्यान, अशातच अदानी समूहाने आता मध्य प्रदेशात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. NDTV प्रॉफिटच्या अहवालानुसार, क्रेडिट प्रोफाइलच्या बाबतीत अदानी समूहाची आर्थिक स्थिती गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम आहे. नजीकच्या भविष्यात पुनर्वित्त संदर्भात समूहासाठी कोणताही धोका नाही. 31 डिसेंबर रोजी संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत समूहाचा EBITDA (earnings before interest, taxes, depreciation, and amortization) 60 टक्क्यांनी वाढून 19,475 कोटी रुपये झाला आहे.


अदानी समुहावर आता कर्ज किती?


NDTV हा अदानी समूहाचा एक भाग आहे. अहवालात कर्जाच्या आकड्यांबाबत त्यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांत अदानी समूहाचे निव्वळ कर्ज 3.5 टक्क्यांनी कमी झाले आहे. आता अदानी समूहाच्या निव्वळ कर्जाचा आकडा 1,78,350 कोटींवर आला आहे. गेल्या 5 वर्षांतील हा नीचांक आहे. त्याच वेळी, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत रोख शिल्लक सुमारे 9 टक्क्यांनी वाढून 43,952 कोटी रुपये झाली आहे.


मध्य प्रदेशमध्ये 75 हजार कोटींची गुंतवणूक 


दरम्यान, अदानी समूहाने मध्य प्रदेशमध्ये 75 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. अदानी समूहाने शुक्रवारी उज्जैनमध्ये प्रादेशिक उद्योग परिषदेदरम्यान ही घोषणा केली. आपली गुंतवणूक विविध क्षेत्रांमध्ये होणार असून, या गुंतवणुकीमुळे राज्यात 15 हजारांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे समूहाने सांगितले.


मध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक


अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे संचालक प्रणव अदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या समूहाला मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात वाढीची क्षमता दिसत आहे. ज्याचा फायदा घेण्यासाठी समूह मोठी गुंतवणूक करणार आहे.अदानी समूहाने मध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळं 11 हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.


महत्वाच्या बातम्या:


अदानी समूहानं एक मोठा निर्णय, संरक्षण क्षेत्रात करणार 3000 कोटींची गुंतवणूक