5G Spectrum Auction : भारतात लवकरच 5G सेवा (5G Service) सुरु होणार आहे. भारतात सध्या 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया सुरु आहे. शनिवारी या प्रक्रियेचा पाचवा दिवस होता. केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की, 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया संपवत ऑक्टोबरमध्ये भारतात 5G सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असेल. भारतातील 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. यामुळे भारतात लवकरच ऐतिहासिक घटना घडणार आहे. 


भारतातील टेलिकॉम क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न


केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, भारतातील टेलिकॉम क्षेत्रात आगामी काळात मोठे बदल घडणार आहेत. केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. भारतील टेलिकॉम क्षेत्राचा ग्लोबल बेंचमार्कसोबत ताळमेळ बसवण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे.


टेलिकॉम क्षेत्रात बदल घडवण्याचा प्रयत्न


केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे की, केंद्र सरकारकडून अलिकडेच दोन मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.  यामध्ये बीएसएनएल (BSNL) पुनरुज्जीवन योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच टेलिकॉम टॉवरसाठीही मोठी घोषणा करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.


5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू


भारतात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव प्रक्रिया सुरू झाल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार विभागातील कर्मचाऱ्यांच्या कठोर मेहनतीचा परिणाम लवकरच दिसून येईल. कर्मचाऱ्यांचा उत्साह आणि मेहनतीमुळे हे सर्व शक्य झालं आहे. 5G स्पेक्ट्रमचा लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरच देशात 5G सेवा सुरु करण्यात येईल. 


5G स्पेक्ट्रमसाठी 'या' 4 कंपन्या शर्यतीत 


5G स्पेक्ट्रमच्या 9 फ्रिक्वेन्सी बँडचा लिलाव (5G Auction) सुरु आहे. एअरटेल (Airtel), अदानी डेटा (Adani), जिओ (Jio) आणि व्होडाफोन-आयडिया (VI) यासारख्या कंपन्या या लिलावासाठी शर्यतीत आहेत. 5G सुरू झाल्यास इंटरनेट सेवेचा वेग वाढणार आहे मात्र त्यासाठी ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे. सध्या ट्रायकडून भोपाळ, नवी दिल्ली विमानतळ, कांडला पोर्ट आणि बंगळुरु या चार ठिकाणी 5 Gच्या पायलट चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत.