मध्यंतरी तो गेला तेव्हापासून बरेच दिवस काही बोलणं झालं नव्हतं...
अचानक हळूहळू बोलणं सुरु झालं
आणि मीच त्या दिवशी पुढाकार घेऊन म्हणाले -
" उद्या सुट्टी घे तू"
" आज घेतली होती गं,
पण आजचं कारण मी उद्या सांगू शकतो."
"अच्छा...मग उद्या पण घे..."
"बरं घेतो.
पण का ? "
"मला भेटायचंय म्हणून..."
" ओके लंच टाईम मध्ये ये ऑफिसखाली
मी भेटतो ना..."
"नाही मला पूर्ण दिवस भेटायचंय..."
"बरं चालेल... घेतो सुट्टी..."
खरंतर तो इतक्या लवकर होकार देईल असं वाटलं नव्हतं.
वाटलेलं कि आता हा अजून किती मस्का मारायला लावेल...
पण 'त्याच्यापेक्षा' तरी 'हा' बरा निघाला.
किमान एका भेटीसाठी ताटकळत ठेवलं नाही मला ह्याने 'त्याच्यासारखं...'
सो भेट ठरली...
वाटलं होतं त्याला सांगावं ,
परवा dp ठेवलेलास त्यात होतं ते गुलाबी शर्ट घालून ये...
पण मनात म्हटलं उगाच ह्याला वाटेल मी लाईन वगैरे मारतेय म्हणून जाणूनबुजून काही बोलले नाही...
तसा त्या दिवशी 'त्याने' दिलेला गुलाबी टी- शर्टचं मी 'ह्याला' भेटताना घालणार होते.
थोडा तोकडा होता...
पण छान दिसतो.
'त्याला' मी काहीही कपडे घातलेले आवडतात.
उलट तोच मला कितीतरी वेळा नव्या नव्या स्टाईल च्या कपड्यांची फर्माईश करतो.
पण 'हा' म्हणजे विचित्र प्रकरण.
ह्याला आवडतो तो म्हणजे 'पंजाबी ड्रेस' आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे ' साडी'.
साडी तशी माझीही लाड़की.
पण नेसता आणि सावरता येत नाही.
शिवाय भेटायला जाताना थोडीच साडी नेसून जाऊ.
आणि दुसरं म्हणजे पंजाबी ड्रेसच्या ओढण्या सांभाळणं हा तसा एक टास्क असतो.
त्यामुळे मी बऱ्याचदा तो अवोईड करते.
वेळ ठरली तसा तो बरोबर वेळेत वाट बघत उभा होता...
त्याच्या हातातलं गौरीचं पुस्तकंही माझी वाट बघत होतं...
मी पोचले आणि एकदम भारी वाटलं...
"आयला गुलाबी गुलाबी...."
न बोलता न सांगताही कशी काय माझी गुलाबी शर्टाची इच्छा त्याने पूर्ण केली कोणास ठाऊक...
दिवसभर फिरलो...
मरीन्सच्या समुद्रावर रखरखत्या वाळूवर भर उन्हात एकमेकांमध्ये पुरती रमून गेलेली कपल्स पाहिली...
आम्ही दोघे मात्र ' काठावर'...
शेवटी तो म्हणालाच -
" अस्स प्रेम करता यायला हवं..."
त्याला टाळत मी तिथून उठले आणि म्हणाले इथे फारशी मज्जा नाही.
भूक लागलीय...
चल रस्ता क्रॉस करून जाऊ...
खाऊन झाल्यावर गार्डन मध्ये जायचं ठरलं...
पटकन टॅक्सीत बसलो...
सकाळीच सुरु झालेल्या पिरेड्समुळे पोटात थोडं दुखत होतं...
पण आजची भेट रद्द करता येत नव्हती
म्हणून खरंतर उन्हातून मी ही गेले...
टॅक्सीत बसल्या बसल्या मला कंबर दुखतेय हे थोडं थोडं जाणवायला लागलं होतं...
त्याने विचारलं काय होतय?
मी काही म्हणाले नाही...
त्याने डावा हात त्याच्या हातात घेतला आणि हाताच्या प्रत्येक सांध्यावर थोडं थोडं प्रेशर देत म्हणाला - "सांग कुठे दुखतंय...?
इथे नर्व पॉईंटस् असतात..."
मी काही बोलले नाही...
त्याची नखं थोडी थोडी लागायला लागल्यावर मी म्हणाले - " हळू रे बाबा, तुझी नखं लागतात..."
" मग लागलीच पाहिजेत...
इतका मऊ हात असतो का कधी ?
यावरूनच कळतंय तू काही काम करत नसणार घरात...
थोडी भांडी वगैरे घासत जा...
हात असे व्हायला हवेत...
कडक आणि खरखरीत..."
" भांडीच घासणारा नवरा शोधायचाय" असं म्हणून मी गप्प...
ऊन वाढलं...
तसं गार्डन मध्ये जाऊन बसलो...
थोड्याफार गप्पा झाल्या...
मोकळं वाटलं...
ओळख झाल्यापासून बरेच दिवस असं फिरायचं मनात होतं...
निघता निघता
पुन्हा काळोख पडल्यावर एक बियर किंवा एक सिगारेट मारायची जाम इच्छा झाली होती.
पण ती मी मनातल्या मनात गिळून टाकली.
गच्च ट्रेन च्या गर्दीतून घरी येताना
मी पुढे, तो मागे आणि माझ्या भोवती त्याच्या हातांचं कडं...
त्यावेळी
त्याने ऐकवलेल्या कविता आताही कानामागून रेंगाळतायत...
त्याचा रात्री आलेला मेसेज मला जास्त छळून गेला...
" तुला 100% देता येत नव्हतं पण तू सोबत होतीस...
कित्येक वर्षांनी मी समुद्र पाहिला आज... "
- आपल्याला खूप लपवून ठेवावंस वाटतं असलं तरी आपले डोळे काहीतरी बोलत असतात हे नक्की...
जिंदगी धूप तुम घना साया!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Feb 2018 08:56 AM (IST)
आपल्याला खूप लपवून ठेवावंस वाटतं असलं तरी आपले डोळे काहीतरी बोलत असतात हे नक्की...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -