तीन पुस्तकांमधले हे परिच्छेद आहेत.

एक : सुशीलानं आजूबाजूला बघितलं. सगळ्या नजरा. कुणी चोरट्या, कुणी भुकेल्या नजरेनं तिच्याकडे बघत होते. अंगावर पाजणाऱ्या बाळाच्या आईकडे निर्धास्तपणे बघू देणाऱ्या या संस्कृतीनं ते सगळे सुखावले होते. अचानक तिनं दुसऱ्या बाजूचाही पदर बाजूला केला. दचकून पुन्हा सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे अगदी लक्षपूर्वक बघू लागल्या. तिच्या नवऱ्यानं तिला कोपरानं धक्का मारून अंगावरून पदर घ्यायला सांगितला. ती डोळे बंद करून घेऊन गप्प बसली. तो तिच्यावर ओरडला, त्यानं तिला मारलं, पण ती हलली नाही. त्यानं बाळाला उचलून हातावर घेतलं आणि तिचं अंग पदरानं झाकलं. ट्रेन पुढच्या स्टेशनला पोचली तरी ती तशीच हरवलेल्या अवस्थेत होती. त्यानं तिला ओढून गाडीतून खाली उतरवून नेलं. ( स्तनपाषाण, राजनैतिक कथा : वोल्गा )

दोन : बाळाला साफियानं अलगद हातावर घेतलं. आपला चिकनचा कुर्ता वर करून तिनं बाळाचे ओठ स्तनांपाशी नेले. बाळानं ओठांनी लुचल्यासारखं केलं. आपल्या इवल्याशा डोळ्यांनी किलकिल बघत त्यानं दूध चोखण्याचा प्रयत्न केला. दोनदा स्तन त्याच्या पकडीतून निसटला. पण नंतर त्यामुळे रागावून की काय; किंवा भूक अनावर झाल्यामुळे त्याच्या तोंडाच्या बोळक्यात एकदम शक्ती आली आणि आपल्या हिरड्यांनी त्यानं स्तनाग्र बरोबर पकडलं आणि दूध खेचलं. ती एकदम दचकली, तिच्या स्तनांमध्ये वेदना झाल्या; पण त्याचबरोबर नकळत तिच्या योनीमध्ये अनामिक सुखाचा थरारही उठला. जवळपास तीन-चार मिनिटं बाळ पीत होतं. बाळाचं पहिलं पाजणं. खरंतर आता उत्सव व्हायला हवा होता. नाच, गाणी, ढोलकी, हसणं इथं दुमदुमायला हवं होतं. मिठाई, दागिने, कपडे, बक्षिसी यांची खैरात व्हायला हवी होती. ( माझा ईश्वर स्त्री आहे : नूर जहीर )

तीन : “ही कथा अश्लील आहे?” मंटोच्या वकिलाने विचारलं. “होय.” साक्षीदार उत्तरला.“कुठल्या शब्दावरून तुम्ही हे ठरवलं की कथा अश्लील आहे?”“स्तन हा शब्द.” साक्षीदार.“मिलॉर्ड, स्तन हा शब्द अश्लील नाहीय.” वकील.“बरोबर आहे.” न्यायाधीश.“स्तन हा शब्द तर अश्लील नाहीय. मग?” वकील.“नाही, पण इथे लेखकाने स्त्रीच्या छातीला स्तन म्हटलं आहे.” साक्षीदार.मंटो एकदम उभा राहिला आणि म्हणाला, “स्त्रीच्या छातीला स्तन म्हणू नको, तर काय भुईमुगाची शेंग म्हणू?”कोर्टात हशा उसळला. मंटोही हसू लागला.“जर आरोपीने पुन्हा अशा तऱ्हेची अचकट-विचकट चेष्टा केली, तर  ‘कंटेंप्ट ऑफ कोर्ट’ या गुन्ह्याखाली कोर्टाबाहेर काढलं जाईल किंवा योग्य ती शिक्षा दिली जाईल.” मंटोला त्याच्या वकिलाने हळूहळू समजावलं आणि तोही समजून घेऊन गप्प बसला. वाद सुरूच राहिला आणि फिरफिरून साक्षीदारांना बस एक ‘स्तन’ सापडत होता, जो अश्लील सिद्ध होऊ शकत नव्हता.“स्तन हा शब्द जर अश्लील असेल, तर गुडघा किंवा कोपर अश्लील का नाहीत?”  मी मंटोला विचारलं.“बकवास!”  मंटो भडकला. ( कागजी है पैरहन : इस्मत चुगताई )

हे अनुक्रमे तेलुगू, इंग्लिश आणि उर्दू भाषांमधल्या कथासंग्रह, कादंबरी आणि आत्मचरित्र या प्रकारांतल्या पुस्तकांमधले तिन्ही परिच्छेद आज एका घटनेने आठवले आणि पुस्तकं कपाटातून बाहेर काढून ते पुन्हा वाचले. निमित्त आहे गृहलक्ष्मी नामक मासिकाच्या मुखपृष्ठावरील स्तनपान करणाऱ्या गिलू जोसेफ या अभिनेत्रीचं छायाचित्र! त्या छायाचित्रासोबत लिहिलं होतं : टक लावून न्याहाळू नका, आम्हांला निश्चिंतपणे स्तनपान करायचं आहे!



अर्थातच यावर वादंग होण्यास सुरुवात झाली. छायाचित्र अश्लील आहे, हा पहिला मुद्दा होता. अजून काही प्रश्न होते : तिने पदर / ओढणी / स्टोल का पांघरला नाही? स्तन अर्धउघडा दिसतोय ते स्वाभाविक, पण खांदा कशाला उघडा टाकला? स्तनपान करा, पण ते उघड्यावर करण्याचा हट्ट कशाला? असे फोटो म्हणजे निव्वळ स्टंटबाजी, प्रसिद्धीची हाव, व्यापारी दृष्टिकोनातून केलेला स्त्रीदेहाचा वापर नाही का? मॉडेल स्वत: आई नाही, मग ती असा फोटो नेमका कशासाठी देते? पुन्हा ती कॅमेऱ्याकडे का पाहते आहे, तिचं लक्ष बाळाकडे असायला नको का? तिनं बाळाला ज्या पद्धतीने धरलं आहे, ती पोझिशन स्तनपानासाठी वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का?

एक ना दोन, हजार प्रश्न.

हे प्रश्न विचारताना, हे चित्र अश्लील ठरवताना लोकांनी आपल्या भाषेतली सभ्यतेची पातळी झटकन ओलांडून श्लील – अश्लीलतेची आपली समज अशी काही दाखवून दिली की, त्यांची दुटप्पी सोंगं बघताबघता उघडी पडली. आज स्तनपान उघड्यावर करू द्या म्हणताय, उद्या मासिकपाळीचं प्रदर्शन उघड्यावर करणार का? परवा लैंगिक संबंधही उघड्यावर प्रदर्शित करणार का? – असे प्रश्नही लोकांनी विचारले. नग्नतेचा निषेध करायचा, तर आपण चौकात नागडं होऊन नाचू नये; एवढी प्राथमिक अक्कलदेखील अनेकांकडे नसते – यात स्त्री-पुरुष सारेच आले – हे पुन्हा एकदा ध्यानात आलं.
थोडक्यात अंगावर पिणारं मूल असेल, तर त्या स्त्रियांनी घराबाहेर पडूच नये. घरात देखील अंगभर पदर – चादर घेऊन स्तनपान करावं, कारण घरातही अनेक नात्यांचे पुरुष असतातच आणि तेही कोणत्याही नात्यातल्या बाईचा स्तन लेकराला दूध पाजताना अर्धउघडा जरी दिसला तरी टक लावून पाहणारच. खेरीज ‘बाळाला नजर लागते, म्हणून लपवून दूध पाजावं’ ही आपली परंपरा आहेच की, तिला अंधश्रद्धा कशासाठी म्हणायचं? खेरीज स्तनपानाच्या वेळी आईच्या चेहऱ्यावर भाव सात्विकच हवेत. त्यावर कंटाळा, सुख, वेदना वगैरे दुसरं काही दिसता कामा नये; दिसलं तर ती आदर्श माता नाही. स्तनपानावेळी ऑरगॅझम मिळतो, असं लिहिणाऱ्या लेखिका केवळ प्रसिद्धीसाठी काहीही काल्पनिक लिहितात; त्यांना जिथंतिथं सेक्स सुचतो, वात्सल्य सुचत नाही; अशा स्त्रिया देवी असूच शकत नाहीत, वेश्याच त्या!


किती बोलतात लोक.... मग कुणीतरी साक्षात शंकराला दूध पाजणाऱ्या तारामाईचं चित्र दाखवतं, स्तनपान करणाऱ्या मातेचं छायाचित्र असलेलं पोस्टाचं तिकीट दाखवतं. पण त्याकडे पद्धतशीर दुर्लक्ष केलं जातं. किंवा आयांनी मिल्कपंप वापरावेत, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्याची कटकटच नको, असे ‘आधुनिक’ पर्यायही सुचवले जातात.



मुळात ही मोहीम कशासाठी आहे? ते आई आणि बाळ दोघांच्याही प्रकृतीसाठी हितकारक कसे आहे? याची चर्चा या निमित्ताने अपेक्षित होती. पुरुषांनी ‘आपली नजर’ बदलण्याची गरज आहे, हे ठामपणे मांडलं जायला हवं होतं; पण बोललं गेलं ते असं की जणू स्तनपान हा स्त्रीचा गुन्हा वा दोष आहे असं वाटावं! सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघवी करण्याचा हक्क पुरुषांना आहे आणि तसाच हक्क आईकडेही फक्त बाई म्हणून पाहण्याचाही आहे, असंच या असंख्य कॉमेंट्स सुचवत होत्या. याच विचाराच्या काही लोकांनी गृहलक्ष्मी मासिकावर आणि या छायाचित्रातल्या मॉडेलवर Indecent Representation of Women(Prohibition) Act, १९८६ खाली फौजदारी गुन्हा दाखल केला. ही अर्धबुद्धी पुरुषमत्ताक वृत्ती बदलण्यास अजून किती काळ स्त्रियांना संघर्ष करावा लागणार आहे, याची ही केस म्हणजे एक झलकच आहे. स्तनपानाला ‘नग्नतेचं तांडव’ संबोधणाऱ्या समाजाचं मानस बदलण्यासाठी प्रयत्न करत राहणं, इतकंच आता शक्य आहे.

'चालू वर्तमानकाळ' सदरातील याआधीचे ब्लॉग :


चालू वर्तमानकाळ (29) : बरी या (अकलेच्या) दुष्काळे पीडा केली!   

चालू वर्तमानकाळ (28) : सुंदर, सजलेल्या, तरुण बाहुल्या

चालू वर्तमानकाळ (27) : दुसरी बाजू… तिसरी, चौथी, पाचवी बाजू वगैरे 

चालू वर्तमानकाळ (26) : द आदिवासी विल नॉट डान्स

चालू वर्तमानकाळ : 25 : कौमार्य चाचणीचा खेळ व पुरुषार्थ चाचणीचं दिव्य

चालू वर्तमानकाळ (24) : पॅनिक बटण आणि इ–संवाद वगैरे

चालू वर्तमानकाळ (23) : पितात सारे गोड हिवाळा?

चालू वर्तमानकाळ २२. लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत?

चालू वर्तमानकाळ (21) : आनंदाची गोष्ट

चालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं

चालू वर्तमानकाळ (19) : रोशनी रोशनाई में डूबी न हो… 

चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या

चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही…

चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये!

चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं

चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन

चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’  

चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं

चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर

चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड

चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे

चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं

चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं

चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या

चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात…

चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…

चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत

चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!

चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब