इच्छामरणाला ‘काही अटींवर’ का होईना पण मान्यता मिळाली, ही बातमी वाचली आणि मनात मृत्यूबाबतच्या अनेक विचारांची गर्दी झाली. आवडता खाऊ, आवडतं खेळणं हवं – इथपासून सुरू झालेल्या माणसाच्या इच्छा अखेरीस ‘शेवटचा दिस गोड व्हावा’ इथवर येऊन थांबतात. आस या शब्दातून उदास हा शब्द घडतो. आस या शब्दाच्या अनेक अर्थच्छटा आहेत… इच्छा, अपेक्षा, उत्कंठा, आशा. आशा तुटली की निराशा. आस सुटली की उदास. उत् + आस अशी उदास या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते. उत् वापरतात ते प्रश्न / शंका विचारणं, विचार करत राहणं यासाठी. म्हणून उदास असतो तेव्हा माणसाला हजारो प्रश्न पडतात. मनात शेकडो शंका, कुशंका, संशय, संभ्रम निर्माण होतात. अडचणी, अडथळे, त्रास, जाच, छळ, ताप, संताप, पश्चात्ताप, अस्वस्थता, कोलाहल, गोंधळ, वेदना, दु:खं… सगळ्यांचा विचार! मेंदू शिणत जातो आणि कृतीप्रवणता कमी होऊन अवयव थिजू लागतात. वादळात, पुरात, अग्नीतांडवात सापडल्यासारखं वाटणं थांबून राखेत, वाळवंटात, भेगाळ जमिनीवर एकटे मागे राहिले आहोत असं वाटू लागतं. उदासीनतेवर मात सोपी नसते. तिचा मार्ग एका जागी खिळून राहण्यातून नव्हे, तर लहान-लहान हालचाली करत कृती करत राहण्यातूनच जातो. संसाराचं हेच सार. बाकी सोपं काहीच नाही. आस सोपी नाही, उदास राहणं सोपं नाही. …अवघडाच्या उंबऱ्यावर थबकलेल्या लोकांना इच्छामरणाची अपेक्षा करताना हे लख्ख जाणवतं / आठवतं.माणूस मुळात स्वार्थी असतो आणि मनापेक्षा शरीर जास्त महत्त्वाचं मानणारा असतो. मतभेद असतात, ते मोकळेपणाने मांडले जातात, त्यांवर चर्चा होतात – हे सगळं चांगलंच असतं. मतांमागचे विचार बाजूला सरून जेव्हा त्यांना भावना येऊन चिकटतात तेव्हा खरा गदारोळ सुरू होतो. जवळची माणसं मरतात, तेव्हा हा मृत्यू कसा स्वीकारायचा असतो, यावर विचार करून पाहिला की, आपल्या मृत्यूबाबतचे विचार आणि कल्पनाही स्पष्ट होत जातात. जाणारा मरून गेलेला असतो, त्यानं क्वचित काही इच्छापत्र लिहून ठेवलेलं असतं. पण त्या इच्छेचा मान न राखता संबंधित मंडळी मनमानी करतात. “तो तर मरून गेलाच आहे, पण आम्हांला याच समाजात जगायचंय अजून.” असं म्हणत आपल्या इच्छांनुसार कृती करतात. देहदान, अवयवदान याबाबत अनेकांचे असे अनुभव आहेत. जितक्या घाईनं प्रेत घराबाहेर काढलं जातं, तितक्याच घाईनं अनेकदा नातलग वा संबंधित त्याचे इतर दृश्य तपशील पुसून टाकायला उत्सुक असतात. व्यवहार म्हणून काही गोष्टी कराव्याच लागतात, जसं कुणाचं काही देणं – कर्ज इत्यादी राहिलं असेल किंवा कार्यालयीन महत्त्वाची कागदपत्रं पुढील जबाबदार व्यक्तीकडे सोपवायची असतील इत्यादी. मालमत्तेचं वाटप, त्या व्यक्तीच्या मालकीच्या वस्तूंचं काय करायचं याचा निर्णय, पत्रं-छायाचित्रं अशा व्यक्तिगत चिजांची विल्हेवाट… इथं मतभेद सुरू होतात. एका मित्रानं त्याचे वडील वारले तेव्हा त्यांनी केलेला दुर्मिळ पेनांचा संग्रह समुद्राला अर्पण केला. एका मित्रानं त्याची बायको गेली, तेव्हा घरातली असंख्य भांडीकुंडी व तिचा मोठा वॉर्डरोब परित्यक्ता स्त्रियांच्या आश्रमाला दिला. एका मैत्रिणीनं तिचं बाळ गेल्यावर त्याचे कपडे, बुट, खेळणी सगळं अनाथआश्रमात नेऊन दिलं. एका मैत्रिणीनं तिचा नवरा गेल्यानंतर त्यावेळी हॉस्पिटलमध्ये घातलेल्या त्याच्या कपड्यांचा एक तुकडा आणि त्याच्या नखाचा तुकडा डॉक्टरांकडून मागून घेतला व त्याची कैलासयात्रा करण्याची इच्छा होती, ती त्या वस्तू घेऊन जिद्दीनं पूर्ण केली आणि त्या वस्तू तिथं बर्फात गाडून परतली. आमच्या एका बाईंनी त्यांच्या कपाटातल्या साड्यांवर चिठ्ठ्या स्टेपल करून ठेवलेल्या होत्या की त्या कुणाकुणाला – विद्यार्थिनी, नातलग, मैत्रिणी, कामकरी सख्या यांना द्यायच्या. एकानं आपले सगळे पैसे प्राणी संग्रहालयाला दिले की, माणसं साली हरामखोर असतात, यापैकी एकही पैसा माणसांसाठी खर्च नाही झाला पाहिजे. अनेक तर्‍हा. आता या प्रत्येकाला आवडतील, पटतीलच असं नाही. पण नंतर ज्याची मालकी त्याच्यावर ते सगळं असतं. धार्मिक विधी करावेत की नाही, अग्नी कसा द्यावा, तेराव्याचं जेवण घालावं की नाही, सुतक कुणी कुणी पाळायचं असतं, मृत्यूनंतर लोकांनी सांत्वनभेटीला यावं की नाही… प्रत्येक लहानसहान मुद्यावर केवढ्या चर्चा होतात. हे आले नाही, ते भेटले नाही, अमक्यांनी फक्त फोनच केला, तमक्यांनी फार चांगलं पत्र पाठवलं अशा चर्चा. त्यात रागलोभ. त्यावरून त्यांच्यावर वेळ येईल तेव्हा आपण त्यांच्याशी कसं वागायचं याची मनातल्या मनात आखणी. माणसं खरंच दु:खी होतात का जवळच्या माणसांच्या मृत्यूमुळे असा प्रश्न पडावा अशी एकेक वर्तनाची तर्‍हा.काहीवेळा माणसं आजारी असतात, कधी कोणताही आजार नसताना केवळ वृद्धापकाळाने शरीर जर्जर होऊन अंथरुणाला खिळलेली असतात… तेव्हा पूर्वकल्पना आलेली असते. त्या व्यक्तींना व आसपासच्यांनाही. जे समाधानानं आयुष्य जगलेले असतात, ते हे चांगुलपणानं स्वीकारतात. ज्याचं जगणं असमाधानी असतं, त्यांना रुखरुख लागून राहिलेली असते अनेक गोष्टींची व जगण्याची वासना तीव्र होत जाते. काहींना आपल्या मागे राहणार्‍या माणसांची काळजी पोखरत असते… खासकरून जे त्यांच्यावर अवलंबून असतात, त्यांची काळजी. अगदी लहान मुलं, परावलंबी असतील अशाच अपंग व्यक्ती ( कारण सारे अपंग परावलंबी नसतात ) आणि वृद्ध यांच्याबाबतच अशी काळजी वाटावी खरंतर; कारण ते खरेखुरेच परावलंबी असतात. बाकीच्यांनी स्वावलंबी असायलाच हवं. तशी प्रत्येकानं स्वावलंबी बनण्याची तरतुद स्वतःसाठी व इतरांसाठी सर्वांनी केलीच पाहिजे. अवलंबन कुठे कुठे असतं? आर्थिक अवलंबन सगळ्यात अवघड. पैशांचं सोंग आणता येत नाही असं आपण म्हणतोच. त्या खालोखाल भावनिक, मग काही मोजक्या जणांबाबतच वैचारिकही. बाकी अवलंबनं ही अवलंबनं नसतात तर सवयी असतात. घरात कुणीतरी वावरणारं होतं आणि आता नाही. ती व्यक्ती अमुक कामं करत होती, ती कामं आता अडणार. दुसर्‍या कुणी केली तरी तशी होणार नाहीत. घरातली वा घराबाहेरची वा कार्यालयीन कामं. नियमित संवाद होता, फोन होत, पत्रं लिहिली जात. सल्ले देणं-घेणं, चांगल्या-वाईट गोष्टी शेअर करणं, दिलासा-प्रोत्साहन-पाठबळ इत्यादी देणं, यासाठी ‘तसं समजून घेण्याची क्षमता असणारी’ दुसरी व्यक्ती नाही… हा अभाव जाणवतो. व्यावहारिक सुविधा गमावणं इथपासून ते लैंगिक, शारीरिक, भावनिक, वैचारिक सोबत गमावणं इथपर्यंत हा प्रवास असू शकतो. यावर काही माणसं उत्तरं शोधतात, अनेकदा ती वरवरची असतात आणि त्यामुळे असमाधान, तुलना, वाद, अपेक्षाभंग असं सगळं होत राहतं. खरी उत्तरं वेगळीच आणि वेगळीकडेच असतात. मृत्यू आपण कसा स्वीकारतो आणि पर्यायांकडे पर्याय म्हणून न बघता स्वतंत्र न्याय देतो का, यावर ते अवलंबून असतं. व्यवहाराचा प्रचंड थकवा येतो. वाटतं, सगळं मागे पडावं, थोडा तुकाराम आठवावा... या ओळी गुणगुणताना त्यालाही विसरून जावं... शब्द मिटून नुसता अर्थ मागे उरावा... पूर्णविराम देखील शिल्लक राहू नये, सगळं कोरं व्हावं आणि त्या आनंदउजेडात शांतपणे डोळे मिटावेत. याजसाठीं केला होता अट्टहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥ आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥ चालू वर्तमानकाळ सदरातील याआधीचे ब्लॉग : चालू वर्तमानकाळ (30) : बाई, आई, स्तनपान, चर्चा... वगैरे चालू वर्तमानकाळ (29) : बरी या (अकलेच्या) दुष्काळे पीडा केली!    चालू वर्तमानकाळ (28) : सुंदर, सजलेल्या, तरुण बाहुल्या चालू वर्तमानकाळ (27) : दुसरी बाजू… तिसरी, चौथी, पाचवी बाजू वगैरे  चालू वर्तमानकाळ (26) : द आदिवासी विल नॉट डान्स चालू वर्तमानकाळ : 25 : कौमार्य चाचणीचा खेळ व पुरुषार्थ चाचणीचं दिव्य चालू वर्तमानकाळ (24) : पॅनिक बटण आणि इ–संवाद वगैरे चालू वर्तमानकाळ (23) : पितात सारे गोड हिवाळा? चालू वर्तमानकाळ २२. लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत? चालू वर्तमानकाळ (21) : आनंदाची गोष्ट चालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं चालू वर्तमानकाळ (19) : रोशनी रोशनाई में डूबी न हो…  चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही… चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये! चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’   चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात… चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील… चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची! चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब