World Environment Day: अ‍ॅमेझॉनची जंगलं... संपूर्ण बर्फानं व्यापलेले आर्क्टिक आणि अंटार्क्टिका... ऑस्ट्रेलियातली प्रवाळ द्विपं असो की आशियातली कांदळवनं... सहाराचं वाळवंट असो की विशाल महासागर.... जगातल्या प्रत्येक खंडात, प्रत्येक महासागरात, लाखो प्राणी आणि पक्ष्यांचं गेली अनेक दशकं अभ्यास करणारा... आणि आपल्या जादूई आवाजातून पृथ्वीतलावरची रहस्य, इथलं अनोखं जीवन, जैवविधता हे सगळं जगासमोर मांडणारा एक अवलिया म्हणजे सर डेव्हिड अ‍ॅटनबरो. वयाची शंभरी पार केली तरी सर डेव्हिड आजही मनानं तरूण आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे अजूनही काम करतायत. एक तरूण इतिहास आणि निसर्गप्रेमी डेव्हिडचा प्रवास पृथ्वीचा आवाज कसा बनला याचीच ही गोष्ट. 

Continues below advertisement

शाळा-कॉलेजमध्ये असल्यापासून डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री टीव्ही अशा चॅनेलचं मला प्रचंड वेड होतं. बेअर ग्रिल्स, रॉबसन ग्रीन, जेरेमी वेड, रिक स्टेन हे सर्वात आवडते प्रेझेंटर. मॅन व्हर्सेस वाईल्ड, एक्स्ट्रिम फिशिंग, रिव्हर मॉन्स्टर, रिक स्टेनच्या फूड स्टोरीज हे आवडीचे शो. पण याच चॅनेल्सवर एक शांत, लयबद्ध आवाजातल्या एका प्रेझेंटरनं माझ्यावर केलेली जादू आजही कायम आहे. सर डेव्हिड अ‍ॅटनबरो (Sir David Attenborough) यांची ती जादू.

Continues below advertisement

प्लानेट अर्थ, ब्ल्यू प्लॅनेट, फ्रोझन प्लानेट... हे अ‍ॅटनबरो यांचे शो म्हणजे अफलातून गोष्टींचा खजिना. आणि त्यात जगातल्या अतिशय खडतर ठिकाणी, प्रतिकूल वातावरणात राहून आपल्या आजोबांच्या वयाचा माणूस गोष्ट सांगतोय, तिथल्या निसर्गाची... तिथल्या जीवनाची... अ‍ॅटनबरो यांची सादरीकरणाची पद्धतच इतकी अनोखी आहे की एका क्षणाला तुम्ही तिथे असल्याचा भास होतो.

अ‍ॅटनबरो यांच्या अगदी जवळ नेलं ते एबीपी माझातले माझे जुने वरीष्ठ संदीप रामदासी सरांनी. एबीपी माझामधल्या ट्रेनिंग सेशन्स दरम्यान संदीप सरांनी दोन माणसांशी खास ओळख करून दिली होती. अर्थात त्यामागचा उद्देश होता की मीडियामध्ये वावरताना स्क्रिप्ट, स्टोरी, त्याचं व्हिज्युअलायझेशन, प्रेझेंटेशन आणि इतर अनेक गोष्टी तुम्ही आत्मसात कराव्या. त्यासाठी सर डेव्हिड अ‍ॅटनबरो आणि जपानचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अकिरा कुरोसावा. कुरोसावाविषयी एवढं कुतूहल वाटलं नाही पण सर डेव्हिड अ‍ॅटनबरो हे नाव आणखी घट्टपणे मनात कोरलं गेलं.

डेव्हिड अ‍ॅटनबरो... हे नाव डोळ्यासमोर आलं की आपोआप आपली निळीशार पृथ्वी डोळ्यासमोर येते. आणि या पृथ्वीच्या कुठल्यातरी भागातून माहिती देणारे डेव्हिड महाशय. डेव्हिड यांचा जन्म 8 मे 1926 सालचा. रिचर्ड आणि जॉन ही डेव्हिडची अन्य दोन भावंडं. (यापैकी रिचर्ड हे पुढे जाऊन जगप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते बनले. तर जॉन व्यावसायिक क्षेत्राकडे वळले) ब्रिटनच्या इस्लेवर्थ भागात डेव्हिड यांचं बालपण गेलं. लहानपणापासूनच डेव्हिड यांना दगडधोंडे, जीवाश्म, पक्षी, कीटक, भोवतालचे प्राणी यांचं प्रचंड आकर्षण. इतर मुलं खेळात रमायची पण डेव्हिड निसर्गातल्या गोष्टींमध्ये काहीतरी शोधत असायचे. याच कुतूहलातून त्यांनी आपल्या आयुष्याचं पुढचं ध्येय निश्चित केलं.

डेव्हिड यांनी केंब्रिजच्या क्लेअर कॉलेजमधून नॅचरल सायन्स विषयाचं शिक्षण घेतलं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी रॉयल नेव्हीमध्ये काही काळ सेवा बजावली. त्यानंतर 1952 साली डेव्हिड बीबीसीमध्ये रूजू झाले. त्यावेळी बीबीसीमध्ये आजच्यासारखे निसर्ग आणि पर्यावरणविषयक कार्यक्रम फारसे नव्हते. पण डेव्हिड यांनी दोनच वर्षात बीबीसीची ओळख बदलली.

1954 मध्ये डेव्हिड यांची झू क्वेस्ट (Zoo Quest) ही मालिका आली. यात सर डेव्हिड यांनी आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि आशियातील दुर्गम भागात जाऊन दुर्मिळ प्राण्यांविषयी डॉक्युमेंटरी चित्रित केल्या. त्या काळात सामान्य प्रेक्षकांनी असं काहीच पाहिलं नव्हतं. त्यात डेव्हिड यांची निवेदनाची पद्धत, शांत-मृदू भाषेतली मांडणी प्रेक्षकांना अधिकच भावली. प्रेक्षकांना घरबसल्या जंगलात फिरण्याचा अनुभव येऊ लागला इतकं डेव्हिड यांचं सादरीकरण अफलातून होतं. त्यामुळे झू क्वेस्ट या मालिकेनं डेव्हिड यांना प्रचंड लोकप्रियता आणि जागतिक ओळख मिळवून दिली.

साठच्या दशकात डेव्हिड अ‍ॅटनबरो यांनी बीबीसीमध्ये अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या. रंगीत टीव्ही वाहिन्यांच्या युगाची सुरूवात करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. गम्मत म्हणजे टेनिसमध्ये आधी पांढरा चेंडू वापरला जायचा. मात्र आता टेनिस खेळताना जो पिवळा चेंडू आपल्याला दिसतो त्याची संकल्पना ही डेव्हिड अ‍ॅटनबरो यांचीच. बीबीसीमध्ये डेव्हिड यांनी अनेक प्रयोग केले. मात्र व्यवस्थापनात त्यांचं मन रमलं नाही. त्यांनी आपलं पद सोडलं आणि कॅमेरा घेऊन ते पुन्हा निसर्गात परतले. 

1979 साली डेव्हिड अ‍ॅटनबरो यांच्या लाईफ ऑन अर्थ (Life on Earth) या मालिकेनं दूरदर्शनच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला. भूतलावरची उत्क्रांती अत्यंत सोप्या भाषेत आणि तीही अद्भुत दृश्यांसह डेव्हिड यांनी जगासमोर मांडली. त्यानंतर द लिव्हिंग प्लानेट (The Living Planet), द ट्रेल्स ऑफ लाईफ (The Trails of Life), द लाईफ ऑफ बर्ड्स (The Life of Birds) अशा मालिका येत गेल्या. आणि त्यातून सर डेव्हिड आणि ते करत असलेली निसर्गविषयक जनजागृती व्यापक होत गेली.

गेल्या काही दशकात तंत्रज्ञानानं कात टाकली. हे नवे बदल आत्मसात करत डेव्हिड यांनी नव्या मालिका आणल्या. ब्ल्यू प्लॅनेटची तर सीरीजच त्यांनी मांडली. उच्च प्रतीचं चित्रिकरण आणि अ‍ॅटनबरो यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज यामुळे या मालिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. अनेक नवख्या निसर्ग अभ्यासकांना यातून प्रेरणा मिळत गेली. त्यामुळे अनेक तरूण पर्यावरणशास्त्र, जीवशास्त्र आणि वन्यजीव संवर्धन या क्षेत्रांकडे आपसूकच वळले.

सध्या जगासमोरचं सर्वात मोठं पर्यावरणीय संकट म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. निसर्गसौंदर्याबरोबरच डेव्हिड यांनी पर्यावरण रक्षणासाठीही आवाज उठवला. हवामान बदल (Climate Change), जंगलतोड, महासागरातील प्लास्टिक प्रदूषण आणि जैवविविधतेचा ऱ्हास याबद्दल त्यांनी ठाम भूमिका घेतली. अ लाईफ ऑफ अवर प्लानेट (A Life on Our Planet) आणि ओशियन विथ डेव्हिड अ‍ॅटनबरो (Ocean with David Attenborough) यांसारख्या निर्मितींमधून त्यांनी मानवजातीला पर्यावरण वाचवण्यासाठी तातडीनं कृती करण्याचं आवाहन केलं. 

एका मुलाखतीत डेव्हिड यांना प्रश्न विचारण्यात आला, “जर तुम्ही जगातल्या प्रमुख नेत्यांना फोन करू शकलात तर काय सांगाल?” सर डेव्हिड अ‍ॅटनबरो म्हणाले “Rewrite our Story”. अ‍ॅटनबरो यांच्या मते, "निसर्गाचे संरक्षण हा केवळ पर्यावरणाचा विषय उरलेला नाही; तो मानवजातीच्या अस्तित्वाचा विषय आहे. तुमच्याकडे अजूनही बदल घडवण्याची संधी आहे. ती वाया घालवू नका."

डेव्हिड अ‍ॅटनबरो यांच्या कार्याची दखल घेत अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी त्यांचा गौरव केलाय. 1985 मध्ये त्यांना ब्रिटनकडून ‘सर’ ही पदवी देण्यात आली. 2005 मध्ये ऑर्डर ऑफ मेरिट (Order of Merit) हा ब्रिटनमधील सर्वोच्च सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. इतकंच नव्हे तर अ‍ॅटनबरो यांच्या नावानं अनेत प्राणी, वनस्पतींच्या प्रजातींची नावंही ठेवण्यात आली आहेत. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून ते कलर, एचडी, थ्रीडी, फोर के आणि नवनव्या आधुनिक तंत्रज्ञानाशी डेव्हिड यांनी केलेली मैत्री खास भावते. बदल हा निसर्गाचा नियम अ‍ॅटनबरोंनी स्वत:मध्येही चांगलाच मुरवून घेतलाय. गेली सात दशकं ते हेच शिकवत आलेयत. जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी आज ते निसर्गाचे दूत आहेत. या पृथ्वीचा आवाज आहेत. 

जगात काही व्यक्ती अशा असतात ज्या फक्त आपलं आयुष्य जगत नाहीत.. तर संपूर्ण मानवजातीला जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देतात. विशाल जंगलांमध्ये, हिमनद्यांच्या गूढ विश्वात, महासागरांच्या अथांग खोलीत आणि वाळवंटांच्या शांततेत एक आवाज गेली सात दशकं सातत्याने घुमतोय. तो आवाज आहे डेव्हिड अॅटनबरो यांचा. अ‍ॅटनबरो यांनी आपल्याला निसर्गाचे अनेक चमत्कार दाखवले. वेगवेगळी रूपं दाखवली. जगाच्या कानाकोपऱ्यातील असंख्य जीवसृष्टींशी आपली ओळख करून दिली. आणि एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला भाग पाडलं... आपण या पृथ्वीचे केवळ रहिवासी आहोत? की तिचे रक्षणकर्तेही?

वयाच्या शंभराव्या वर्षीही त्यांची जिज्ञासा तितकीच तरुण आहे. त्यांचा संदेशही तितकाच स्पष्ट आहे...

"पृथ्वी आपली नाही... आपण पृथ्वीचे आहोत..." : सर डेव्हिड अ‍ॅटनबरो