आयपीएलच्या बाराव्या मोसमाच्या फायनलचं पहिलं तिकीट कोणत्या संघाला मिळणार, याचा फैसला मंगळवारी चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांमधला हा सामना आयपीएलच्या प्ले ऑफमधला क्वालिफायर वनचा सामना असून, या सामन्याला रात्री साडेसात वाजता सुरुवात होईल. या सामन्यातल्या पराभूत संघाला फायनल गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
रोहित शर्माची मुंबई इंडियन्स की, महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्स... आयपीएलच्या यंदाच्या फायनलचं पहिलं तिकीट कुणाला मिळणार, याची उत्सुकता गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या आयपीएल चाहत्यांना लागून राहिलीय.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या गुणतालिकेत यंदा पहिल्या दोन क्रमांकांवर झेप घेऊन प्ले ऑफच्या क्वालिफायर वन सामन्यात खेळण्याची संधी मिळवलीय. या टॉप टू टीम्समधल्या सामन्याची आयपीएलच्या इतिहासात आधीपासूनच अल क्लासिको अशी ख्याती आहे. क्लब फुटबॉलच्या मैदानात रिअल माद्रिद आणि एफसी बार्सिलोनाचा सामना जसा साऱ्या जगाला खिळवून ठेवतो, तोच महिमा मुंबई आणि चेन्नईमधल्या सामन्यानं आयपीएलच्या जगात निर्माण केलाय. त्यामुळंच रिआल माद्रिद आणि एफसी बार्सिलोना सामन्याची अल क्लासिको ही बिरुदावली आता आयपीएलच्या जगात मुंबई-चेन्नई सामना मिरवतोय.
मुंबई आणि चेन्नई या दोन संघांनी आजवरच्या इतिहासात एकदाच नाही, तर तीनदा तीनदा आयपीएलच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय. चेन्नईनं 2010, 2011 आणि 2018 साली तर मुंबईनं 2013, 2015 आणि 2017 साली आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नईनं नऊपैकी सात प्रयत्नांमध्ये आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारलीय, तर मुंबईनं अकरा वर्षांत चारवेळा फायनल गाठलीय. मुंबई आणि चेन्नई या संघांत आयपीएलच्या रणांगणात आजवर अठ्ठावीस सामने चुरशीनं खेळले गेले आहेत. त्यापैकी मुंबईनं सोळा, तर चेन्नईनं बारा सामने जिंकले आहेत.
प्ले ऑफमधल्या क्वालिफायर वन सामन्याच्या निमित्तानं मुंबई आणि चेन्नई यंदाच्या मोसमात तिसऱ्यांदा आमनेसामने येतील. याआधी दोन्ही साखळी सामन्यांमध्ये मुंबईनं चेन्नईवर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. वानखेडेवरच्या सामन्यात मुंबईनं चेन्नईचा 37 धावांनी, तर चिदंबरम स्टेडियमवरच्या सामन्यात मुंबईनं यजमानांचा 46 धावांनी धुव्वा उडवला होता. आता क्वालिफायर वन सामन्यात त्या पराभवाची परतफेड करून फायनलचं तिकीट बुक करण्याचा चेन्नईचा प्रयत्न राहिल.
अर्थात आयपीएलच्या नियमावलीनुसार या सामन्यातल्या पराभूत संघाला क्वालिफायर टू सामन्यातून फायनलचं तिकीट बुक करण्याची आणखी एक संधी मिळणारय. आयपीएलच्या गुणतालिकेत पहिल्या दोन संघांत स्थान मिळवण्याची तीच तर खरी बक्षिसी असते.
आयपीएलच्या क्वालिफायर वन सामन्यात मुंबईच्या आक्रमणाची मदार प्रामुख्यानं जसप्रीत बुमरा, लसिथ मलिंगा, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या आणि राहुल चहार यांच्यावर राहिल. या पाचजणांनी मिळून यंदाच्या मोसमात 66 फलंदाजांना माघारी धाडलं आहे. त्यात बुमरानं 17, मलिंगानं 15, हार्दिकनं 14, कृणालनं 10 आणि चहारनं 10 विकेट्स काढल्या आहेत. चेन्नईचं आक्रमण प्रामुख्यानं इम्रान ताहिर, हरभजनसिंग आणि रवींद्र जाडेजा या फिरकी त्रिकुटावर अवलंबून आहे. त्या तिघांनी मिळून तब्बल 47 विकेट्स घेतल्या आहेत. त्यापैकी ताहिरनं 21, तर हरभजन आणि जाडेजानं प्रत्येकी 13 विकेट्स काढल्या आहेत.
अष्टपैलू केदार जाधवला झालेल्या दुखापतीमुळं चेन्नईच्या फौजेतला समतोल किंचित ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळं चेन्नईच्या फलंदाजांमध्ये कर्णधार धोनी, शेन वॉटसन, फॅफ ड्यू प्लेसी, सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांना अधिकची जबाबदारी उचलावी लागणार आहे. धोनीनं बारा सामन्यांमध्ये तीन अर्धशतकांसह 368 धावा फटकावल्या आहेत. त्याखालोखाल रैनानं 359, ड्यू प्लेसीनं 314, वॉटसननं 258 आणि रायुडूनं 219 धावा जमवल्या आहेत. मुंबईची फलंदाजी प्रामुख्यानं रोहित शर्मा, क्विन्टन डी कॉक, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड या पाचजणांवर अवलंबून राहिल. मुंबईकडून डी कॉकनं सर्वाधिक 492 धावांचा, रोहित शर्मानं 386 धावांचा, हार्दिक पंड्यानं 373 धावांचा रतीब घातला आहे. सूर्यकुमार यादवच्या खात्यात 338 आणि कायरन पोलार्डच्या खात्यात 238 धावा जमा आहेत.
यंदाच्या मोसमात मुंबईनं चेन्नईवर गाजवलेलं वर्चस्व पाहिलं तर, क्वालिफायर वन सामन्यात रोहितसेनेचं पारडं जड मानलं जात आहे. पण या सामन्यातल्या विजयानं फायनलच्या तिकीटाची बक्षिसी मिळणार असल्यानं, धोनी आणि त्याच्या चेन्नईचे सुपर किंग्स मुंबईला सहजासहजी जिंकू देणार नाहीत, हेही तितकंच खरंय.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आयपीएलच्या फायनलचं पहिलं तिकीट मुंबईला की चेन्नईला?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 May 2019 12:07 AM (IST)
प्ले ऑफमधल्या क्वालिफायर वन सामन्याच्या निमित्तानं मुंबई आणि चेन्नई यंदाच्या मोसमात तिसऱ्यांदा आमनेसामने येतील. याआधी दोन्ही साखळी सामन्यांमध्ये मुंबईनं चेन्नईवर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलंय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -