'आकडे कधीच खोटं बोलत नाहीत. विराट कोहली फक्त भारताचाच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे....' वीरेंद्र सेहवागचे हे शब्द विराट कोहलीच्या अलौकिक कामगिरीची पोचपावती देतात. विराट कोहलीला एकही आयसीसी चषक उंचावता आला नाही, असं असलं तरी संघाचं नेतृत्व करताना विराटने केलेली कामगिरी दखल घ्यावी अशीच आहे. आकडेवारीच त्याच्या कामगिरीची साक्ष देते. सौरव गांगुलीने विदेशात कसा विजय मिळवाचा याची चुणूक दाखवून दिली अन् विराट कोहलीने भारताला विदेशात सातत्याने विजय मिळवून दिले, हे विसरता कामा नये. भरकटलेल्या कसोटी क्रिकेटला विराट कोहलीने नवीन दिशा दिली...  


विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अनेक अशक्यप्राय विजय  मिळवलेत. आकडेवारीवर नजर टाकायची झाली, तर कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 18 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. फक्त 5 मालिकेत पराभव झाला आहे. ही आकडेवारी विराट कोहलीच्या नेतृत्व कौशल्याची चुणूक दाखवणारी आहे. विराट कोहलीने भारतीय संघाला आयसीसीचा चषक जिंकून दिला नाही, हे जितके खरे आहे तितकेच विराट कोहलीने भारतीय संघाची रुपरेषा बदलल्याचे सत्य आहे. विराट कोहलीने भारतीय संघाच्या कामगिरीत सातत्य आणलं. संघामध्ये विजयासाठीचा आत्मविश्वास निर्माण केला. सामन्यातील अखेरच्या चेंडूपर्यंत लढायचे कसे? हे दाखवून दिले.


कामगिरीत सातत्य का गरजेचं असते हेही विराट कोहलीने दाखवून दिले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात भारतीय संघाची कामगिरी उंचावली. आज भारतीय संघाकडे एकापेक्षा एक सरस गोलंदाज आहेत. १०० कसोटी सामन्याचा अनुभव असणारा गोलंदाजाला संधी मिळत नाही, का तर त्यापैक्षा दर्जेदार गोलंदाज आहेत म्हणून... विराट कोहलीने फलंदाजासोबत गोलंदाजांची फळीही उभारण्यात मोठं योगदान दिलेय. सर्व खेळाडूंना फिटनेसचे धडेही दिलेत.  त्यामुळेच भारतीय संघाची विजयाची सरासरीही वाढली. मागील सात वर्षात विराट कोहलीने धोनीचा वारसा यशस्वीपणे पुढे नेला. त्यात एका गोष्टीची उणीव राहिली आणि त्याच चष्म्यातून कोहलीच्या कामगिरीकडे बघितलं गेलं, ती म्हणजे आयसीसी चषक न जिंकणे! ही गोष्टच विराटच्या कारकिर्दीला लागलेला डाग आहे, असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. 


मागील ६८ दिवसांत विराट कोहलीने भारतीय संघाच्या तिन्ही प्रकारचे कर्णधारपद सोडलं आहे. गेल्या काही दिवसांत मैदानाबाहेर सुरु असलेलं प्रकरणामुळे नक्कीच भारतीय संघाचे मोठं नुकसान झालेय. खेळापेक्षा नक्कीच कुणीही मोठं नसते, पण एखाद्या दिग्गजाला अशाप्रकारे वागणूक मिळणे चुकीचं आहे. यामुळे क्रिकेटचं नक्कीच नुकसान होतं. सौरव गांगुली, धोनी, सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर जे झाले तेच विराट कोहलीबरोबर झाले. प्रत्येकाचे विषय वेगळे असू शकतात, पण सर्वांचं कारण एकच आहे. १६ सप्टेंबर ते १५ जानेवारी या काळात 68 दिवसांत विराट कोहलीने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील नेतृत्वाला रामराम ठोकला. गेल्या काही दिवसांपासून विराट आणि बीसीसीआय यांच्यातील संघर्ष आपण सर्वांनी पाहिलाच. विराटने अचानक कर्णधारपद सोडण्याचे कारण काहीही असो... भविष्यात पुस्तकात अथवा एखाद्या मुलाखतीमधून यावरुन पडदा उठेल.. पण विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर विराट पर्वाचा अस्त होतोय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण विराट कोहली खेळाडू म्हणून किती चमकेल हे येणारा काळच सांगेल.


कसोटी सामन्यात विजय संपादन करणाऱ्या कर्णधारांमध्ये विराट कोहली भारताचा पहिला तर जगातील तिसरा कर्णधार आहे. भारतीय संघाला विराट कोहलीने धोनीपेक्षा जास्त विजय मिळवून दिले आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्येही भारतीय संघाला विराट कोहलीने विजय मिळवून दिले आहेत. जिथे, भारतीय संघ कोलमडत होता, जवळही पोहचत नव्हता, अशा ठिकाणी विराट कोहलीने भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. विराट कोहलीने ६८ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केलं आहे. यामध्ये ४० सामन्यात विजय मिळवला आहे. धोनीने ६० सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केलं आहे, यामध्ये भारतीय संघाला २६ सामन्यात विजय मिळवता आला आहे. विराट कोहलीच्या विजयाची सरासरी ५८ टक्के इतकी आहे.  २०१४-१५ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना धोनीने अचानक कर्णधारपद सोडलं. तेव्हा विराट कोहलीकडे भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली, त्यावेळी भारतीय संघ सातव्या क्रमांकावर होता. आज विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं तेव्हा भारतीय संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. मागील सात वर्षात विराट कोहलीने भारतीय क्रिकेटची पाने सोनेरी शब्दाने लिहिली आहेत. ऑक्टोबर 2016  पासून एप्रिल 2021 भारतीय संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता, यासाठी आयसीसीने अनेकदा भारताची पाठही थोपटली आहे.  विराट कोहलीची कामगिरी कशी आहे, हे आकडेच सांगतात....स्टी वॉ आणि पाँटिग यांच्यानंतर विराट कोहलीची विजयाची सरासरी सर्वाधिक आहे. नेतृत्व असताना विराट कोहलीची फलंदाजी अधिक निखरुन आली आहे. ६८ सामन्यात विराट कोहलीने ५४ च्या सरासरीने अन् २० शतकांच्या मदतीने ५८६४ धावांचा पाऊस पाडला आहे.  मागील दोन वर्षांत भलेही शतक झळकावता आले नाही, मात्र धावांचा पाऊस पाडण्यात कोहलीला अपयश आलेलं नाही. विराट कोहली कर्णधार पर्वाचा अंत झालाय, पण विराट कोहली युग यापुढेही सुरुच राहणार आहे.  विराट त्याच आक्रमकपणे, जिद्दीने पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडेल, हे नक्कीच.


विराट कोहलीने दीर्घकाळापर्यंत भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. 2012 मध्ये विराट कोहलीने शतकांचा पाऊस पाडला होता. युवा आणि आक्रमक खेळाडू म्हणून विराटचा सुरु झालेला प्रवास आजही कायम आहे. खेळाडू म्हणून विराट सर्वोत्कृष्ट खेळाडूपैकी एक आहे. तो मैदानावर असताना भारतीय संघ जिंकेल, असे प्रत्येकालाच वाटते. दोन वर्षांपासून विराट कोहलीच्या शतकांचा दुष्काळ पडला आहे, हा विराट कोहलीचा बॅड पॅच सुरु आहे. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात असा काळ येतोच, यातून सावरुन अधिक वेगाने विराट कोहलीला सुरुवात करावी लागेल. एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे विराट नक्कीच पुन्हा भरारी घेईल, यात शंकाच नाही.  नेतृत्व सोडलं असलं तरी एक खेळाडू म्हणून विराट कोहली अद्याप खेळणार आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरप्रमाणे विराट कोहलीही दणक्यात पुनरागमन नक्कीच करेल.  


विराट कोहलीचा खराब फॉर्मही काही खेळाडूंच्या असलेल्या फॉर्मपेक्षा चांगला असतो, हे आकडे बोलतात अन् आकडे कधीच खोटं बोलत नाहीत. विराट कोहली आज अनेक खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत आहे. विराट कोहलीने भारतीय क्रिकेटला सातवे आसमान पर नेऊन ठेवलेय. येथून विराटचा वारसा ज्याला मिळेल, तोही भारतीय संघाला यशस्वीपणे पुढे घेऊन जाईल, याबद्दल शंका उपस्थित होणार नाही. सरतेशेवटी... Thank You Virat! पुढील करियरसाठी शुभेच्छा!