ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात शेफाली वर्मानं आपल्या टनाटन टोलेबाजीचा असा काय जलवा दाखवला आहे की, लोकांनी तिचं लेडी सहवाग असं बारसं करून टाकलं. भारताची ही लेडी सहवाग आज खऱ्या अर्थानं त्या उपाधीला जागली. ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या आयसीसी क्रमवारीत ती आता नंबर वन फलंदाज झाली आहे.

भारताची माजी कर्णधार मिताली राजनंतर ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या क्रमवारीत नंबर वन होणारी शेफाली वर्मा ही दुसरी भारतीय महिला आहे. पण तिच्यासाठी ही कामगिरी सोपी अजिबात नव्हती. न्यूझीलंडची सुझी बेट्स ऑक्टोबर 2018 पासून, म्हणजे गेली दीड वर्षे नंबर वनवर ठाण मांडून बसली आहे. त्याच सुझी बेट्सला शेफाली वर्मानं अकरा रेटिंग गुणांनी पिछाडीवर टाकलं. नंबर वनच्या शर्यतीत शेफालीच्या खात्यात 761 रेटिंग गुण, तर सुझी बेट्सच्या खात्यात 750 रेटिंग गुण आहेत.

ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या विश्वचषकात शेफालीनं आपल्या बॅटचा असा काय जलवा दाखवला की, अवघ्या चार सामन्यांमध्ये तिच्या नावावर 161 च्या स्ट्राईक रेटनं 161 धावांचं भरघोस पीक उभं राहिलंय. शेफालीचं अवघं सोळा वर्षांचं वय लक्षात घेतलं तर तिच्या कामगिरीचं आणखी कौतुक वाटतं. विशेष म्हणजे स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्यासारख्या दोन बड्या फलंदाज आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावत नसताना, भारतीय महिलांना विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिलं ते एकट्या शेफाली वर्मानं. पण याच कामगिरीनं आता तिच्याविषयीच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. ही लेडी सहवाग भारतीय महिलांना ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या फायनलचं तिकीट मिळवून देईल का, असा प्रश्न भारतीय क्रिकेटरसिकांना पडलाय.

ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय महिलांनी आजवर कधीही फायनलमध्ये धडक मारलेली नाही. फायनलच्या या उंबरठ्यावर भारतासमोर लागोपाठ दुसऱ्यांदा आव्हान आहे ते इंग्लंडचं. 2018 सालच्या गत ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात इंग्लंडनं भारताचं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आणलं होतं. पण त्याआधीही ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताला इंग्लंडला कधीच हरवता आलेलं नाही. इंग्लंडचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातला भारताविरुद्धचा रेकॉर्ड हा 5-0 असा आहे.

इंग्लंडची ही कामगिरी लक्षात घेता शेफाली वर्मासमोरचं आव्हान खूपच मोठं आहे. तिला स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिक्सची साथ मिळाल्याशिवाय बलाढ्य इंग्लंडला हरवणं कठीण आहे. त्यात या लढाईत इंग्लंडच्या सोफी एकलस्टनला खेळण्याचं आव्हान भारतीय फलंदाजांसमोर आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमधल्या गोलंदाजांच्या क्रमवारीत सोफी एकलस्टन आता नंबर वन झाली आहे. तिनं विश्वचषकाच्या चार साखळी सामन्यांमध्ये मिळून आठ फलंदाजांना माघारी धाडलं आहे. त्यामुळं पर्यायानं सोफी एकलस्टनला भिडण्याची जबाबदारी बॅट्समन नंबर वन शेफाली वर्मावर आहे. शेफाली वर्मानं ते द्वंद्व जिंकलं तर इंग्लंडची लढाई जिंकून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाची फायनल गाठणं भारतीय महिलांना सोपं जाईल.