क्रिकेटचा देव म्हणून जगभरातील दिग्गज खेळाडू ज्याचे पूजन करतात त्या सचिन तेंडुलकरच्या अर्जुन सचिन तेंडूलकरला अखेर आयपीएलमध्ये एका सामन्यात का असेना संधी मिळाली. लखनऊ संघाचा या हंगामातील शेवटचा सामना होता. पाण्याची बॉटल घेऊन मैदानात येणारा अर्जुन थेट खेळण्यासाठी उतरला. गेल्या अनेक वर्षांपासून अर्जुन मैदानावर कधी उतरेल याची मी व्यक्तीश: वाट पाहत होतो. अर्जुननं 5 बॉलमध्ये 5 धावा आणि 4 षटकांत 36 धावा देऊन 1 बळी मिळवला हे आपण सर्वांनी काल पाहिलं. मात्र, त्यानंतर अनेकांनी अर्जुनला समाज माध्यमांतून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या आधी अनेकदा अर्जूनला ट्रोल केलं होतं. आता देखील ट्रोल करण्याची संधी नेटिझन्सनी सोडली नाही, पण अर्जूनच्या बाजूनं देखील अनेकांनी पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं. अर्जुननं केलेली कामगिरी अत्यंत कौतुकास्पद होती. कारण जगातील कोणत्याच खेळाडूवर जितकं दडपण नसेल तितकं दडपण गेल्या अनेक वर्षांपासून अर्जुन सहन करत आला आहे.

Continues below advertisement

खचला नाही तो संधीची वाट पाहत राहिला

सचिन तेंडुलकरचा मुलगा म्हटल्यानंतर सर्वजण अपेक्षा करणार यात काही चूक नाही. पण तो सचिन होता आणि हा अर्जुन आहे. बापाप्रमाणे मुलानं देखील तितकंच चांगल्या पद्धतीनं खेळलं पाहिजे असं काही नाही. पण त्याचे प्रयत्न कुठंच कमी पडत नव्हते हे देखील तितकंच महत्वाचे आहे. 14-15 वर्षांची वैभव सूर्यंवंशी सारखी सामान्य कुटुंबातून आलेली मुलं अख्खं क्रिकेट विश्व गाजवत आहेत. अशावेळी अर्जूनच्या ठिकाणी दुसरा कुणी असता तर पुर्णपणे खचून गेला असता, पण अर्जून खचला नाही तो संधीची वाट पाहत राहिला. संधी मिळाल्यानंतर त्यानं झलक दाखून दिली. सचिन तेंडुलकर नावाच्या कुबड्या त्यानं कधीही घेतल्या नाहीत.

तग धरुन राहण्याला देखील खूप धाडस लागतं

अर्जुन तेंडूलकर हा मुळात काहीसा लाजाळू मुलगा आहे. कोल्हापुरात आल्यानंतर नृसिंहवाडी आणि पुन्हा कोल्हापूरपर्यंत त्याच्यासोबत प्रवास करण्याचा योग आला होता. फारसा बोलणार नाही पण कुणाला दुखवणार देखील नाही असा त्याचा स्वभाव आहे. अलिकडेचं एका मुलाखतीमध्ये तो अगदी मोजून मापून वाक्य बोलल्याचं आपण पाहिलं आहे. सध्या तो गोवा राज्याकडून खेळतो. क्रिकेट सोडून इतर क्षेत्रातील मुलांसोबत त्याची मैत्री आहे. मित्रांमध्ये तो क्रिकेटविषयी बोलत नाही. कदाचित त्यामुळंच तो टिकाकार दुनियेपासून लांब राहिला. ग्रामीण भागात एक म्हण आहे, मोठ्या झाडाखाली छोटं झाड कधीच मोठं होतं नाही. मोठ्या झाडाखाली असणाऱ्या छोट्या छोट्या झाडांना लगेच काढून फेकून दिलं जातं. मात्र अशावेळी तग धरुन राहण्याला देखील खूप धाडस लागतं. ते धाडस अर्जुन तेंडुलकरमध्ये सध्या दिसत आहे.

Continues below advertisement

पण कधी माज दाखवला नाही

अर्जून तेंडूलकरनं काल संधीचं सोनं केल्यानंतर सचिन सुखावला. त्यानं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून एखाद्या बापाचा आनंद काय असतो ते पाहायला मिळाले. अर्जुन हा सचिन तेंडूलकरच्या नावानंच जगभर प्रसिद्ध आहे. अर्जूनच्या सोबतची किंवा त्यापेक्षा लहान मुलं क्रिकेट विश्वात नाव गाजवत आहेत. अशावेळी बाप म्हणून सचिनवर काहीसं दडपण असणार हे नक्की, पण त्यानं कधी ते अर्जुनला किंवा सार्वजनिक ठिकाणी दाखवलं नाही. सचिननं केलेल्या पोस्टमधून त्याच्या मनावर आतापर्यंत दाटून आलेलं मळभ दूर झाल्याचं दिसत होतं. काल सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली, आमच्याकडं गावात सरपंचाचं पोरगं असलं तर त्याला सगळ्यात आधी बॅटिंग आणि बॉलिंग द्यायला लागतीय पण इथं ज्याच्या बापाला क्रिकेट देव समजला जातो त्याच्या मुलानं ड्रेसिंग रुममध्ये कित्येक महिने बसून काढले, पाण्याची बॉटल घेऊन मैदानात गेला पण कधी माज दाखवला नाही, म्हणून अर्जून सचिन तेंडुलकर होणं सोप्पं नाही.