पृथ्वीवर असणारी सर्व एनर्जी स्थिर आहे . त्यात घट वा वाढ होत नाही. तरीही सर्व सजीव सृष्टीची जी वाढ होते ती कशी होते आहे, तर सूर्योदय ते सूर्यास्त या काळात पृथ्वीवर सूर्यकिरणांच्या रूपाने सूर्यशक्ती येत असते. ही सुर्यशक्ती पकडण्याचे कार्य वनस्पतीची हिरवी पाने करत असतात. वनस्पती हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्या उपस्थितीत प्रकाश संशलेषण करून जी शक्ती बनवतात, तीच शक्ती वेग वेगळ्या रूपात सर्व सजीव सृष्टीत फिरत असते. हीच शक्ती वनस्पती लिक्वीड कार्बन च्या रूपात जमिनीतील सूक्ष्म जीवांसाठी पुरवतात .त्याच्या बदल्यात ही जमिनीतील सूक्ष्मजीव सृष्टी वनस्पतीला आवश्यक अन्नद्रव्ये पुरवतात. खरे तर ही एवढी सोपी पद्धत असताना जी स्वयंपूर्ण स्वयंपोशी स्वयंविकासी आहे,आपण मानवाने मात्र शेती करण्याच्या नावाखाली ती अत्यंत अवघड करून ठेवली आहे. या सृष्टीचे सृजन करण्यासाठी सूर्यप्रकाशाचा प्रत्येक कण हिरव्या पाना मार्फत पकडणे एवढे एकच काम करणे गरजेचे आहे. करोडो वर्ष निसर्ग हे काम मानवी हस्तक्षेपाशिवाय करत आला आहे आणि करत राहणार आहे. परंतु मानव आणि मानवाचे पाळीव प्राणी यात अनावश्यक लुडबुड करून बाधा आणत आहेत.


आधुनिक शेती शास्त्र मात्र, वनस्पती जमिनीतून मुळ्यांच्या मार्फत विद्रव्य ions च्या अवस्थेत अन्न द्रव्ये घेतात या एकखांबी तंबू सारखे राहिले आहे. परंतु , कातळावर दिमाखात उभे असणारे विशालकाय वृक्ष . भिंतीत उगवून वाढणारी पिंपळाची रोपे , ऐन उन्हाळ्यात चैत्र पालवी ने बहरून जाणारा कोरडवाहू कडुलिंब यासारख्या असंख्य उदाहरणाकडे अपवाद म्हणून शेती शास्त्र डोळेझाक करते.


मूलद्रव्य सारणी मध्ये शंभर पेक्ष्या जास्त मूलद्रव्ये असताना देखील खत म्हणून फक्त 16 अन्न द्रव्ये वापरून फोफसी वाढणारी पिके कीटक नाशक आणि बुरशी नशकाची गरज निर्माण करतात. जमिनीत काही अन्न द्रव्ये अत्यंत कमी तर काही अत्यंत ज्यादा असताना देखील दोन्हीही प्रकारची अन्न द्रव्ये जमिनीत टाका अशी अवघड शिफारस शेती शास्त्र करते. हवेत 78% नायट्रोजन चा महासागर असताना युरिया चा वापर करावा अशी शिफारस केली जाते.


अश्या प्रकारच्या सर्व विरोधाभासी शिफारसी असताना आम्ही मात्र मासानोबु फुकुओका यांच्या Do Nothing (वीना सायास) पद्धतीने शेती करतो.


विना नांगरणी ,
विना खुरपणी,
विना फवारणी आणि 
विना रसायन 
ही चार तत्वे पळून शेती सुरू करताच स्वयंपूर्ण स्वयंपोषी स्वयंविकासी निसर्ग त्याचे कार्य सुरू करतो 


विना नांगरणी:- 


आपल्या पायाखाली एक जग राहते जे वरच्या जगात असणाऱ्या वनस्पती साठी अन्न तयार करण्याचे कार्य करते . सतत नांगरणी करून या अश्या सूक्ष्म जीवांची घरे दारे मोडून त्यांच्या कार्यात आपण बाधा आणत असतो. विना नांगरणी सुरू करताच जमिनीची कण रचना तयार करणारे सूक्ष्म जिवाणू कार्यरत होतात. नांगरणी मुळे हवेत उडून जाणार कार्बन जमिनीतच रोखला जातो. कण रचना सुधारल्याने पावसाचे पाणी जमिनीत चांगले मुरते. कण रचना सुधारल्याने जमिनीत पोकळ्या तयार झाल्याने जमिनीत ऑक्सिजन चा संचार वाढतो. पिकांची मुळी आणि सर्व सूक्ष्म जिव सृष्टी यांच्यासाठी हा ऑक्सिजन अत्यंत आवश्यक असतो.


 विना खुरपणी:-  


तण हा आपल्या पुढचा प्रश्न नसून त्या त्या वेळी जमिनीत असणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे अत्यंत हलक्या जमिनीत फक्त कुसळ उगवते. ही गवते तिथेच कुजल्यानंतर हळु हळू रुंद पानाची गवते उगवतात. त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढल्यानंतर द्विदल तणे उगवतात. द्विदल तणामुळे जमिनीचे आरोग्य सुधारताच, तेथे झुडपे वाढू लागतात. झुडपानी तयार केलेल्या लिक्वीड कार्बन मुळे जमीन आणखी सुपीक होते. त्यानंतर तेथे वृक्ष वर्गीय वनस्पती उगवतात. वृक्ष वर्गीय वनस्पती नी वर्षभर सूर्यप्रकाशाचा वापर करून जो लिक्वीड कार्बन जमिनीत सोडलाजातो त्यामुळे जमीन सर्वोच्च पातळीवरील सुपीकता प्राप्त करते. जमीन जेवढे Bacteria Dominant तेवढी तणे ज्यादा, जसं जशी जमीन सुपीक बनते, तस तसे तणांचे प्रकार बदलतात व हळु हळु कमी होत जातात. जमीन Fungal Dominant होताच तणांचे कार्य संपल्याने तणे उगवणे बंद होतात परंतु वृक्ष वर्गीय वनस्पती उगवत राहतात. अश्या पद्धतीने निसर्ग एकपिक पद्धतीचे घनदाट जंगले तयार करतो.


विना फवारणी:- 


कोणत्याही प्रकारची फवारणी निसर्गातील सजीव सृष्टी साठी हानिकारक असते. सर अल्बर्ट हॉवर्ड म्हणतात तुमच्या पिकावर येणारे कीड आणि रोग हे तुमचे मित्र असून तुमचे कामकाज चुकते आहे, हे सांगण्यास आलेला दुत आहे. प्रत्येक सजीवाच्या जन्माचा उद्देश पुढची पिढी सशक्त तयार करणे हा आहे. सशक्त बीज वाढले पाहिजे आणि या स्पर्धेत अशक्त बीज नष्ट झाले पाहिजे यासाठी कीड आणि रोगाची निर्मिती आहे,त्यामुळे सुपीक जमिनीत सशक्त पिके असतील तर कोणत्याही फवारणी ची गरज राहणार नाही. हळु हळु आम्ही याचा प्रत्यय घेत आहोत .


विना रसायन:-


 जमिनीच्या सुपिकतेच्या पटीत त्यातील पीक उत्पादन देत असते, परंतु रसायने वापरून आपण अधिक चांगले पीक देण्यास जमिनीस भाग पाडतो. पिकाला अन्न द्रव्ये उपलब्ध करून देण्यासाठी जमिनीतील सूक्ष्म जीव सृष्टी जमिनीत साठलेला कार्बन वापरते आणि पिकाला ती अन्न द्रव्ये वीनासायास उपलब्ध होतात. खरे तर पिकाने प्रकाश संशलेशनातून बनवलेला लिक्वीड कार्बन जमिनीतील सूक्ष्म जीवांसाठी सोडणे अपेक्षित आहे. परंतु पिकाला विनासायास जमिनीतून अन्न द्रव्ये उपलब्ध झाल्याने पीक सूक्ष्म जीवांसाठी लिक्वीड कार्बन सोडत नाही, त्यामुळे जमिनीतील सूक्ष्म जीव सृष्टी ची उपासमार होते. आपण वापरलेली सर्व रसायने ,कीड नाशके ,बुरशी नाशके या सूक्ष्मजीवसृष्टी साठी हानिकारक आहेत. त्यामुळे या सूक्ष्मजीवसृष्टीचे कार्य हळु हळु मंदावत जाते. जमिनीत साठलेला सेंद्रिय कर्ब वापरून काही काळ रसायनाच्या मदतीने पिके चांगली येतात. परंतु जसं जसा सेंद्रिय कर्ब कमी होत जाईल तस तसे उत्पादन घाटात जाते आणि एक दिवस शेती परवडत नाही अशी अवस्था निर्माण होते. आम्ही याला घर जाळून कोळशाचा व्यापार म्हणतो . एक दिवस असा येतो राहायला घर नाही आणि विकायला कोळसा नाही. 


जास्तीत जास्त दिवस आणि जास्तीत जास्त वेळ सूर्यप्रकाश पकडणे म्हणजे शेती. मानवी प्रयत्नापेक्ष्या अत्यंत वेगाने निसर्ग स्वतः जमीन सुधारणा करतो आणि अत्यंत सशक्त अशी पिके घेता येतात याचा प्रत्यय आम्ही घेतो आहोत. सहा ते सात वर्षात आमचा एक आंब्याचा प्लॉट Fungal Dominant झालेलं आहे जमीन एवढी सुपीक झालेली आहे की तणे उगवणे जवळपास बंद झालेले आहे. परंतु त्याच वेळेस तिथे वृक्ष वर्गीय वनस्पती मात्र उगवत आहेत अंबा बाग काहीही न करता उत्तम उत्पादन देत आहे.