भारतामध्ये स्पर्धा परीक्षांची परंपरा सशक्त असून, दरवर्षी लाखो तरुण-तरुणी सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून परीक्षांच्या मैदानात उतरतात. UPSC आणि MPSC या दोन मोठ्या स्पर्धात्मक प्रणाली या तरुणाईच्या जीवनाचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत. मात्र या स्पर्धेची दुसरी बाजू ही आहे की, अंतिम निवड फक्त मोजक्याच उमेदवारांची होते, आणि शेकडो मेहनती, गुणवत्ताधारक उमेदवार 'फायनल लिस्ट'च्या वेशीवरच थांबतात.
याच पार्श्वभूमीवर UPSC ने सुरू केलेली “प्रतिभा सेतू” योजना ही स्वागतार्ह आणि मार्गदर्शक ठरते. या योजनेतून UPSCच्या अंतिम टप्प्यात (मुख्य परीक्षा वा मुलाखत) पोहोचलेले पण अंतिम निवड न झालेले उमेदवारांची माहिती सरकारी व खाजगी संस्थांना शेअर केली जाते. यामुळे अशा उमेदवारांना इतर क्षेत्रांमध्ये त्यांच्या क्षमतेनुसार नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. हा उपक्रम म्हणजे अपयशाच्या कड्यावरून आशेचा एक मजबूत पूल उभारण्याचा प्रयत्न आहे.
मग महाराष्ट्रासाठी हा पूल का नको?
MPSC ही देखील एक अत्यंत स्पर्धात्मक आणि विश्वासार्ह परीक्षा प्रणाली आहे. दरवर्षी १० लाखांहून अधिक उमेदवार MPSCच्या विविध परीक्षा देतात. हे उमेदवार अनेक वर्षांचे समर्पण, वय, आर्थिक संसाधने आणि मानसिक ऊर्जा पणाला लावतात. परंतु अंतिम निकालात अपयशी ठरणाऱ्या गुणवंतांची संख्या मोठी आहे. ही केवळ अपयशाची गोष्ट नाही – ही आहे अपव्ययाची. कुशल मनुष्यबळाचा, प्रशासनक्षम व्यक्तींचा आणि सार्वजनिक संसाधनांवर आधारित तयार झालेल्या गुणवत्तेचा उपयोग न शासनाला होतो, ना समाजाला.
“प्रतिभा सेतू”सदृश उपक्रम एमपीएससीसाठीही हवा
यासाठी राज्य शासनाने MPSC प्रतिभा नोंदणी पोर्टल उभारावे. या पोर्टलमध्ये मुख्य परीक्षा वा मुलाखतीपर्यंत पोहोचलेले पण अंतिम यादीत न आलेले उमेदवार आपली शैक्षणिक, प्रशासकीय, सामाजिक व व्यावसायिक माहिती अपलोड करू शकतील.
या पोर्टलवर पुढील माहिती संकलित व प्रसारित करता येईल:
उमेदवाराचे नाव, परीक्षा, टप्पा, गुण व रँक
शैक्षणिक पात्रता, कौशल्ये (IT, भाषा, विश्लेषण)
CSR/NGO/शैक्षणिक संस्था यामध्ये अनुभव
संपर्क व उपलब्धतेचा तपशील
ही माहिती पुढील क्षेत्रात वापरता येईल:
जिल्हा प्रशासन, महापालिका, पंचायत समित्या – कंत्राटी कामासाठी
CSR प्रकल्प – सामाजिक जबाबदारीतील कामासाठी
स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक केंद्रे – मार्गदर्शक, शिक्षक म्हणून
या उपक्रमाचे फायदे काय?
उमेदवारांचा आत्मसन्मान वाचेल.राज्य प्रशासनाला गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ मिळेल.शासकीय परीक्षांवरील विश्वास वाढेल.स्थानिक स्तरावर रोजगार संधी निर्माण होतील. गुणवत्तेचा उपयोग सामाजिक विकासासाठी होईल
निष्कर्ष:
“स्पर्धा परीक्षा ही केवळ निवडणूक नसून, ती एका संधींच्या व्यवस्थेची सुरुवात असावी.”UPSC ने दाखवलेला मार्ग महाराष्ट्र राज्यानेही स्वीकारावा. MPSCमार्फतही ‘प्रतिभा सेतू’सदृश उपक्रम हाती घेणे ही काळाची गरज आहे. ही योजना केवळ अपयशी उमेदवारांसाठी नव्हे, तर एका नव्या, आशावाद्य महाराष्ट्रासाठीही एक पायरी ठरू शकेल.
अँड. कुलदीप आंबेकरसंस्थापक/अध्यक्षStudent Helping Hands