'त्या' दिवशी 'त्या'ला एक फोन आला. पलिकडून बोलणाऱ्या माणसानं 'त्या'ला सांगितलं की, "तुझी एका शॉर्टफिल्मसाठी निवड झालीय. तुला यामध्ये इरफान खानसोबत 'रोल' करायचा आहे. उद्या सकाळी आठपर्यंत तूम्ही 'सेट'वर पोहोचा". या फोननंतर तो काही काळ पार थिजून गेला. त्याला विश्वासच बसत नव्हता की, आपलं चित्रपटात काम करण्याचं स्वप्नं आता पूर्ण होणार आहे. अन्, तेही चक्क इरफान खानसारख्या कसलेल्या चतुरस्त्र अभिनेत्यासोबत... त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याला विश्वासही बसत नव्हता अन् शब्दही फूटत नव्हते. त्यानं काही जवळच्या मित्रांना ही आनंदाची गोष्ट सांगितली.

त्या रात्री 'त्या'ला झोपच येत नव्हती. तो सर्वार्थानं 'फ्लॅशबॅक'मध्ये गेला होता. त्याच्या डोळ्यासमोरून येथपर्यंतच्या प्रवासाचा पट झर-झर जात होता. अकोला ते 'मायानगरी' मुंबईपर्यंतच्या प्रवासातील अनेक आठवणीत तो रात्रभर झोप न आल्यानं कड बदलत होता. सकाळी-सकाळी 'तो' झोपी गेला. मात्र, 'त्या' सकाळी 'तो' लवकरच उठला. कारण, आजची सकाळ त्याच्या आयुष्यात पाहिलेल्या स्वप्नांना वास्तविकतेचे पंख देणारी होती. 'तो' फटाफट तयार होऊन 'शुटींग'च्या 'सेट'कडे निघाला. वाटेत त्याच्या मनावर 'शॉर्टफिल्म' अन 'इरफान खान'च्या नावाचं काहीसं दडपण आलं होतं. मात्र 'सेट'वर पोहोचेपर्यंत 'तो' अगदी 'नॉर्मल' झाला.

'सेट'वर पोहोचल्यावर 'त्या'ची आपल्या 'रोल'बद्दलची उत्सुकता अधिकच वाढतच होती... तितक्यात, दिग्दर्शकानं त्याला आवाज दिला. दिग्दर्शक त्याला जसा-जसा 'त्या'चा 'रोल' समजावून सांगत होता, तसे-तसे त्याच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव काहीसे हिरमुसल्यासारखे झाले. मात्र, इरफान खानसोबत दिसण्याच्या संधीनच तो शहारून गेला. त्याचा 'शॉट' येण्यासाठी तो वाट पाहू लागला. शुटींगचं शेड्युल त्या दिवशी खुपच संथपणे सुरु होतंय. दुपारचे बारा वाजले, तीन वाजले.... संध्याकाळी काटा सहावर, सातवर गेला तरी 'त्या'ला बोलावलेच जात नव्हते. अखेर रात्री नऊला तो 'क्षण' आला. इरफान खान दरवाजा वाजवतो. दरवाजा 'त्या'नं उघडायचा. मात्र, त्यानं आपला चेहरा अर्धाच यात दिसू द्यायचा असा तो 'सीन' असतो. 'लाईट.. कॅमेरा... अँन्ड अँक्शन' असा आवाज होतो... अन तो 'सीन' सुरू होऊन जातो. इरफान खान दरवाजा वाजवतो. 'हा' दरवाजा उघडायला जातो. मात्र, आपला चेहरा दिसावा म्हणून तो अर्ध्यापेक्षा जास्त चेहरा बाहेर काढतो. "कट...कट... कट... अरे, यार आपको आधा ही चेहरा बताने को बोला गया है, वैसा ही करना है'... पुढच्या 'टेक'मध्ये सीन 'ओके' होतो. फक्त सात सेकंदांचा हा 'सीन' असतो...

इरफान खानसोबत एक 'सीन' करायला मिळाल्यानंतरही 'तो' मात्र पार खचून गेलेला असतो. कारण, 'त्या' सीनमधून त्याची ओळख पडद्याला होऊ नये अशा पद्धतीची ती भूमिका... तो त्या दिवशी मुंबईतल्या आपल्या रूमवर परततो... पहिल्याच दिवशी आलेल्या या अनुभवानं त्या रात्री 'तो' खुप बेचैन होऊन जातो. हे क्षेत्र आपलं नाही. आपण दुसरं काही तरी करावं, असे अनेक विचार त्याच्या मनात रात्रभरात येऊन जातात. 'त्या' आलेल्या अनुभवानं रात्रभर त्याच्या डोळ्यांतलं पाणी आटत नाही. याच दिवशी तो मनाशी खुणगाठ बांधतो की, माझ्या मेहनतीनं एक दिवस ही 'मायानगरी'च मला 'हिरो'ची ओळख देईल, सलाम करेल... अन हो, त्याच्या मेहनतीनं बांधलेली ही खुणगाठ प्रत्यक्षात उतरलीय. तीन तासांच्या संपूर्ण चित्रपटाचा 'नायक' म्हणून त्यानं गेल्या दशकभरात स्वत:ला सिद्ध केलंय.

'ज्या'ला फक्त अर्ध्या चेहराचा सात सेकंदांचा रोल मिळाला होताय, त्याला आज अनेक चित्रपटांचा मुख्य नायक म्हणून चित्रपटस्रुष्टी आणि सिनेरसिकांनी डोक्यावर घेतलंय... मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांतील त्याच्या कामाचं कौतुकही केलंय. संघर्ष, निष्ठा, समर्पण आणि सचोटीतून कोणत्याही गॉडफादरशिवाय 'त्या'नं चित्रपट क्षेत्रात आपल्या यशाचा नवा अध्याय लिहिलाय... 'रिल लाईफ'मधला हा 'रियल हिरो' म्हणजेच अमित्रियान पाटील.

8 फेब्रुवारीला त्याची मुख्य भूमिका असलेला 'आसूड' हा मराठी चित्रपट मराठी सिनेरसिकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातील अमित्रियाननं समर्थपणे पेललेल्या 'शिवाजी पाटील' या भूमिकेनं अख्ख्या मराठी मनावर गारूड घालायला सुरूवात केली आहे. "आता रडायचं नाही, तर लढायचं" असं म्हणत एका शेतकऱ्याच्या शिकलेल्या मुलांमध्ये एका नव्या लढाईसाठी ऊर्जा पेरणारी ही भूमिका... भ्रष्ट व्यवस्थेविरूद्धचं बंड पुकारणारा 'शिवाजी पाटील' अमित्रियाननं या चित्रपटातून मोठ्या समर्थपणे मांडला आहे. सात सेकंदांच्या त्या शॉर्ट फिल्मपासून 'आसूड'मधल्या शिवाजी पाटीलपर्यंतचा अमित्रियानचा प्रवास एक संघर्ष आणि यशाचं वर्तुळ पुर्ण करणारा आहे. हा प्रवास त्याला एक माणुस, एक अभिनेता, समाजाला नवा विचार, नवी दिशा देणारा तरूण म्हणून सम्रूद्ध करणारा आहे.

अमित्रियान हा मुळचा अकोल्याचा. त्याचा जन्म, बालपण, जडण-घडण, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सारं अकोल्याच्या मातीतच पूर्ण झालंय. अमित्रियानचा 'अकोला ते बाँलिवूड' अन् 'अमित ठोकळ ते अमित्रियान पाटील' असा संपूर्ण प्रवास अगदी सहज झाला का?... निश्चितच नाही. हा प्रवास अनेक खाच-खळगे, संघर्ष आणि आपल्या ध्येय्याप्रती समर्पित अशा एका ध्येयवेड्या तरूणाचा होता.

अमितचं कुटूंब मुळचं वाशीम जिल्ह्यातील रिठद गावचं. या शेतकरी कुटूंबानं नेहमीच शिक्षणाचा ध्यास आणि वसा कायम प्राणपणानं जगला आणि जपलाही. अमितचे वडील प्रा.मधुकर ठोकळ अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागात प्राध्यापक. आई आशा या गृहिणी. त्यांना अमित आणि संदिप अशी दोन मुलं. प्रा. मधुकर ठोकळ यांनी नेहमीच मुलांच्या शिक्षण, कलेसोबतच त्यांच्या आवडी-निवडींनाही मोठ्या ताकदीनं जपलं अन त्यांना प्रोत्साहनही दिलं. म्हणूनच आपला मुलगा प्राध्यापक, इंजिनीयर बनावा असं वाटत असतांना त्यांनी त्यांची स्वप्नं कधीच मुलगा अमितवर लादली नाहीत. बालपणापासूनच कला क्षेत्राची आवड असणाऱ्या अमितला त्यांनी गिटार, हार्मोनियम आणि संगीताचे क्लास लावून दिले.

पुढे शालेय शिक्षणासाठी अमितनं अकोल्याच्या हिंदूज्ञानपीठ शाळेत प्रवेश घेतला. या शाळेत चौथ्या वर्गात असतांना अमितनं पहिल्यांदा एका नाटकात काम केलं. हे त्याचं कलेच्या रंगमंचावरचं पहिलं पदार्पण होतं. मात्र, पुढच्या काळात अमितला नाटकांची क्रेझ कधीच वाटली नाही. कारण, नाटकांत काम करतांना तालमी करुन एकच एक भूमिका, तोच तो पणा जगण्याचा त्याच्या स्वभाव आणि व्यक्तीमत्वाला पटत नव्हता. छोटा अमित जेंव्हा एखाद्या उद्योगपतीला पहायचा, एखादा कामगार पाहायचा, एखादा शेतकरी पाहायचा, एखाद्या ट्रक ड्रायव्हरला पाहायचा..... त्याला त्यावेळी वाटायचं, आपणंही अगदी असंच व्हावं... अगदी यांच्यासारखंच... कदाचित भविष्यातील प्रत्येक भूमिकेत शिरायचं बाळकडू त्याला बालपणातील याच गोष्टींमूळं मिळालं असावं.

पुढे बारावीनंतर अमितनं अकोल्यातील बाभूळगावच्या शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र, अमितला आता त्याचं खरं ध्येय खुणावत होतं. अभिनय, जाहिरात, चित्रपट या विषयांवर तो मित्रांसोबत तासनतास चर्चा करायचा. तेंव्हा त्याच्या मित्रांना त्याचं हे खुळ अजब वाटायचं, तो दीडशहाणा वाटायचा. त्यातूनच त्याला अनेकदा मित्र, नातेवाईक, शिक्षकांचे टोमणेही सहन करावे लागले. पुढे त्याचं इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण झालं.

आता त्याला त्याच्या आवडीची क्षितीजं खुणावत होती. त्यानं आपल्या स्वप्नांच्या पंखांना भरारी घेण्याचं बळ देण्यासाठी मायानगरी मुंबई गाठली. येथे त्यानं आपल्या आवडीच्या 'अँडव्हर्टायजिंग अँड पब्लिक रिलेशन' या पोस्ट ग्रँज्यूएशन अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. हा अभ्यासक्रम त्याच्यासाठी आपलं ध्येय असणाऱ्या चित्रपट क्षेत्राकडे जाण्याचा दरवाजा किलकिला करणारा होता.

अतिशय देखणा, चुणचुणीत आणि चॉकलेटी हिरो असणाऱ्या अमितला आता अनेक जाहिराती आणि सिरियल्समध्ये रोलसाठी विचारणा होऊ लागली. मात्र, सिरियल्समधल्या अतिरंजीतपणात त्याला स्वत:तील नैसर्गिक अभिनय गुदमरण्याची शक्यता वाटायची. त्यामुळे सिरियल्सपासून तो अद्यापपर्यंत दूरच राहिला आहे.

हे सारं करतांना त्याच्यातील अमित ठोकळला आता नवी ओळख मिळाली होती. ही ओळख होतीय 'अमित्रियान पाटील' या नव्या नावाची... अमितचा 'अमित्रियान' झाला होता. अमित्रियान हा देशातील नव्या पिढीचं, नव्या विचारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुणाईचं प्रतिक आहे. तो नव्या पिढीचा आश्वासक आणि सुंदर चेहरा आहे.

मुंबईत जवळपास पाच-सहा वर्षांच्या संघर्षानंतर या मायानगरीनं त्याला यशाच्या नव्या संधी दिल्यात. या संधी त्याच्यातील कलाकाराला, त्याच्या अभिनयाला नवी ओळख देणाऱ्या होत्या. बालपणापासून त्यानं पाहिलेलं 'हिरो' होण्याचं स्वप्नं प्रत्यक्षात उतरवणारं वर्ष होतं 2010. यावर्षी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात घेतलेल्या भूमिकेवर एक हिंदी चित्रपट आला. त्याचं नाव होतं '332, मुंबई टू इंडिया'... या चित्रपटातील बंडखोर उत्तर भारतीय पात्र असणाऱ्या 'राहूल राज' या तरुणाची भूमिका अमित्रियाननं साकारली. हा चित्रपट आपटला. परंतू, यातील अमित्रियानच्या कसदार आणि संवेदनशील अभिनयाला सिनेसृष्टीनं मोठी दाद दिलीय. अमित्रियानच्या या चित्रपटातील अभिनयाची चर्चा व्हायला लागली. या चित्रपटानं एक सुंदर चेहऱ्याचा संवेदनशील नायक या निमित्तानं चित्रपटसृष्टीला दिला.

यानंतर अमित्रियाननं कधी मागे वळून पाहिलंच नाही. 2012 मध्ये आलेल्या दिग्दर्शक संग्रामसिंह गायकवाडांच्या 'मन्या, दि वंडरबॉय' या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. ग्रामीण भागातील मन्याचा एका यशस्वी अँथलिटपर्यंतचा संघर्ष अमित्रियाननं आपल्या कसदार अभिनयातून लोकांसमोर उभा केला. अमितचा 'मन्या' हा पहिलाच मराठी चित्रपट. त्याच्या या चित्रपटातील भूमिकेचं मराठी सिनेजगतात मोठं कौतूकही झालं.

2013 हे वर्ष तर त्याच्या आयुष्यातलं अविस्मरणीय असं वर्ष. हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक ब्लॉक ब्लस्टर चित्रपट देणाऱ्या रामगोपाल वर्मानं अमित्रियानलं एक रोलसाठी आँफर केली. रामूच्या 'सत्या 2' या चित्रपटातील 'नारा' हे पात्र अमित्रियाननं आपल्या अभिनयानं जीवंत केलं. रामूच्या चित्रपटात काम करायला मिळावं, हे बॉलिवूडमधल्या प्रत्येक कलाकाराचं स्वप्नं असतं. अमित्रियाननं हे स्वप्नं आपल्या समर्थ अभिनयाच्या बळावर लवकरच प्रत्यक्षात उतरवलं होतं.

पुढे 2016 मध्ये मराठीत आलेल्या 'राजवाडे अँड सन्स' या चित्रपटात तीन पिढ्यांमधील विचार-आचारांचा संघर्ष मांडण्यात आला होताय. अतुल कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी आणि सचिन खेडेकर यांच्यासारख्या दिग्गज कलांकारांसोबत यातील 'विक्रम' राजवाडेची भूमिका मोठी भाव खाऊन गेली. विक्रमच्या रूपानं महाराष्ट्राला एक नव्या रुपातला अमित्रियान पाहायला मिळाला. शालेय जीवनात प्रत्येक भूमिकेत स्वत:ला पाहणारा 'अमित' पुढे 'अमित्रियान' म्हणून प्रत्येक भूमिकेला ताकदीनं न्याय देत गेला. 'बाँईज 2' मधील त्याची भूमिकाही हटके होती, नव्या पिढीशी नातं सांगणारी.

'आसूड' हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतला सर्वार्थानं वेगळा चित्रपट आहे. तो ज्या मातीत जन्मला, खेळला, बागडला, शिकला त्या अकोल्याच्या मातीतून आलेला हा चित्रपट. डॉ. दीपक मोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा चित्रपट युवा दिग्दर्शक प्रा. निलेश जळमकरांनी दिग्दर्शित केला आहे. अमित्रियान यात साकारत असलेलं 'शिवाजी पाटील' हे पात्र त्यानं बालपणापासून या मातीतला असल्यानं सर्वत्र पाहिलंय, अनुभवलंय. लहान असतांना वडिलांसोबत रिठद गावच्या शेतात जात असल्यानं त्याची नाळ कायमच शेती-मातीसोबत जुळलेली आहे. त्याच्या सहज-सुंदर आणि जीवंत अभिनयातून त्यानं साकारलेला 'शिवाजी पाटील' हा त्याच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरणार यात शंकाच नाही.

'वादळाची दे गती पण, भान ध्येयाचे असु दे', असे एका प्रार्थनेचे शब्द आहेत. चंदेरी दुनियेच्या लखलखाटात असतांनाही अमित्रियान आजही कायम जमिनीवर असतो. तो सहज मित्रांना भेटतो, नातेवाईकांना भेटतो अन् अकोल्याच्या मातीत आल्यावर इथलाच म्हणून रमतोही. ' 'मन्या, दि वंडरबॉय' चित्रपटात एक दृष्य आहे. मन्याचा प्रशिक्षक मन्या हरल्यानंतर त्याला हाकलवून लावतो. तेव्हा तिथे उपस्थित असलेला एकजण 'मन्या'ला म्हणतो, "पोरा, एक दिवस फकस्त तुझाच असेल".... अमित्रियान, नक्कीच... एक दिवस नक्की तुझाच असेल.... तुझ्या भावी वाटचालीकरिता आभाळभर शुभेच्छा!