स्थळ : मुंबईतील एका कुठल्याशा दुर्गोत्सव मंडळाचा भला मोठा मंडप... वेळ झाल्यानं गरबा संपलेला असतो. त्यामूळे मंडपातील गर्दी बरीच ओसरलेली असते. काही कार्यकर्ते दिवसभराच्या धावपळीने पार  थकून गेलेले असतात. तर काहीजण थकव्यामूळे काहीसे पेंगुळलेले... तर एका कोपऱ्यात काही कार्यकर्त्यांची 'हिशेब' करीत मोठ्ठ्यानं 'राजकीय' चर्चा सुरू असते... यासर्व गोष्टींमुळे मंडप काहीसा शांत असतो. इकडे देवीच्या आराशीसमोर मोठी समई अगदी प्रखरतेनं तेवत असते. तितक्यात सिंहावर बसलेली आदिशक्तीची मुर्ती आपलं वाहन असलेल्या सिंहाला बोलायला सुरूवात करते...


आदिशक्ती (सिंहाला) : बाळा!, यावर्षीचं नवरात्र चांगलंच दणक्यात आहे रे. 'मंदी'तही एव्हढी 'चांदी' कशी रे... मंडपातले हे 'भाई', 'दादा', साहेबांचे मोठमोठ्ठे होर्डींग्ज-कटआऊट्स जास्तच दिसतायेत यावेळी... अन गरबा-दांडियातला तो आवाज... कान अगदी बधीर झालेत माझे... अन हो यावेळी गरब्यातल्या गाण्यासोबतच 'हाँ, मै भी चौकीदार हूँ', 'जात-धर्म अन गोत्र आमची...', तूमच्या राजाला साथ द्या', 'राष्ट्रवादी पून्हा' अशी गाणी वाजतायेत रे...


सिंह (आदिशक्तीला) : माते!, महाराष्ट्रात निवडणुकीचा 'गोंधळ' अन मतांचा 'जागर' सुरू झाला आहे. निवडणुक आहे महाराष्ट्रात येत्या 21 तारखेला...


आदिशक्ती (सिंहाला) : अच्छा!... बाळा!, चल ना मग. आपण महाराष्ट्राचा एक फेरफटका मारून येऊयात. तसंही या 'आवाज' अन 'बेशिस्ती'नं अगदी कावलीय मी. चल, पाहूयात तरी महाराष्ट्राच्या राजकीय 'शक्तीपीठां'वर काय चाललंय ते?... चल!, निघुयात आपण....


सिंह : बरं, माते!... चल निघुयात...


(मंडपातून सिंहावर विराजमान 'आदिशक्ती' बाहेर पडते. 'स्वारी' सर्वात आधी जाते मंत्रालयाच्या दारावर...)


आदिशक्ती (सिंहाला) : बाळा!, हे काय म्हणतात ते आहे ना रे!... महाराष्ट्राच्या 'लोकशाहीचा मानबिंदू' वगैरे वगैरे...


सिंह (आदिशक्तीला) : माते!, याला 'मंत्रालय' म्हणतात की!...


आदिशक्ती (सिंहाला) : अरे हो!, विसरलेच होते मी नाव... हल्ली नवरात्र असल्यानं मंडपातले 'लयी'त म्हटलेले 'मंत्र'च आठवतात... पण का रे बाळा!, हे एव्हढं शांत कसं?. हे तर रात्री अंधार पडला तर जास्तच गजबजतं ना.... काय म्हणतात त्या फायलींचा 'खेळ' अन त्यासाठीचा 'मेळ' रात्रीच चालतो म्हणतात येथे... येथल्या खुर्च्याही फार 'नशिबा'च्या अन 'महागड्या' असतात बाबा रे... जाऊ दे माझ्या बाळा... तू लहान आहेस. तूला नाही समजणार यातलं...


(सिंह निरागसपणे मान हलवत हलकाच स्मित करतो...)


सिंह (आदिशक्तीला) : माते!, येथील वातावरण जरी सध्या 'थंड' असलं तरी येथे येण्यासाठी... येथे 'तोरण' बांधण्यासाठी, येथे वेगवेगळ्या रंगाचा झेंडा फडकवण्यासाठी राज्यातलं वातावरण चांगलंच 'गरम' झालंय सध्या. हे मंत्रालय आता आपल्या 'नव्या' मालकाची वाट पाहत आहे.


आदिशक्ती (सिंहाला) : बरं-बरं. चल लवकर पुढच्या 'शक्तीपीठा'वर...


(सिंह आता आपल्या चालण्याचा वेग थोडा वाढवतो... इतक्यात एका भल्यामोठ्या बंगल्यातून मोठ्यानं 'गोंधळा'चा आवाज कानी पडतो... जसा-जसा तो बंगला जवळ येऊ लागतो तसा-तसा संबळ-तुणतुण्याचा आवाज जास्तच जोर धरू लागतो... आदिशक्ती बंगल्याच्या जवळ जाते तेंव्हा त्यावर 'वर्षा' असं ठळक नाव दिसतं... बंगल्याच्या अंगणात 'गोंधळ' अगदी रंगात आलेला असतो. देवेंद्रभौ, अमृता वहिनी, छोटी दिविजा अन आई सरिता 'गोंधळा'च्या भक्तीरसात अगदी तल्लीन झालेले असतात.)....


गोंधळाच गाणं :

तुळजापुरची भवानी तू गोंधळा ये,

कोल्हापुरची महालक्ष्मी तू गोंधळा ये,

माहूरगडनिवासिनी रेणुके तू गोंधळा ये

कार्लानिवासीनी तू गोंधळा ये...


दिल्लीच्या नरेंद्रा तू गोंधळा ये

गांधीनगरच्या अमितभाई तू गोंधळा ये

नागपुरच्या नितीनभौ तू गोंधळा ये

कोल्हापूरच्या 'दादा' तू गोंधळा ये

जामनेरच्या 'भाऊ' तू गोंधळा ये

जालन्याच्या 'दाजी' तू गोंधळा ये

गोंधळा ये 'आई' गोंधळा ये

गोंधळा ये 'भाई' गोंधळा ये....


आदिशक्ती (सिंहाला) : बाळा!, हा कसला 'जागर' आहे रे. पहिल्यांदाच ऐकतोय... 'आई'सोबत 'भाईं'ची भक्त अन गजर... चाललंय काय हे?.


सिंह (आदिशक्तीला) : माते!, याला लोकशाहीचा, राजकारणाचा 'गोंधळ' म्हणतात. अलिकडे राजकारणताही 'चालीसा', 'स्तोत्र', अन 'गोंधळ'ही आलेत. राजकारण मे चलता है यह सब, माते!....


आदिशक्ती (काहीशा रागानेच) : हो माहित आहे मला... असतं माझं लक्ष सर्वीकडे...


(तितक्यात देवेंद्रभौला अमृतावहिनी काही तरी सांगत असतात....)


अमृतावहिनी (देवेंद्रभौना) : अहो!, हे बघा... तूमच्या 'शपथविधी'साठी अनेक डिझायनर्सकडून 'डिझाईन्स' मागवल्यात मी 'सुट' अन 'कुर्त्यां'च्या... मी आपल्या नागपुरातल्या विवेक रानडेंनाही सांगितलंय तूमच्यासाठी काहीतरी 'हटके' शिवायला. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणातले सर्वाधिक 'ग्लॅमरस मॉडेल' तूम्हीच आहात. अन हो, तूमचा 'डायट प्लान' बरोबर 'फॉलो' कराल. मी सोबत 'तहान' लाडू, 'भूक' लाडू पण देते... प्रचारसभांच्या मधात तेही खात जाल...


देवेंद्रभौ (अमृता वहिनींना) : अगं हो!, सगळं 'फॉलो' करतो तू सांगितलेलं... आता पुढचे पंधरा दिवस महाराष्ट्रभर मला राजकीय 'गोंधळ' घालायचाय... अन हो!, ते विकासाचं 'तुणतुणं' अन आवाजाचा 'संबळ' ठेवशील बरं माझ्या गाडीत... त्याचं खुप 'काम' आहे आता या 'गोंधळा'त.


आदिशक्ती (सिंहाला) : चल रे लवकर येथून... त्यांना गडबड आहे सकाळी नव्या वाटाघाटीसाठी तयार होण्याची... आपल्यालाही लवकर पोहोचायचंय आपल्या मंडपात...


सिहं : बरं माते!...


(पुढे 'स्वारी' वांद्र्यातल्या 'कला'नगरकडे निघते... 'मातोश्री'च्या द्वारावर 'वारी' येऊन ठेपते.)


आदिशक्ती (सिंहाला) : अरे थांब!. हे तर 'मातोश्री' दिसतंय. बाळासाहेब असतांना मी बरेचदा यायची येथे. माझा अगदी लेकरासारखा जीव होता त्यांच्यावर... चल आत जाऊयात तरी... पाहूयात बाळासाहेबांच्या 'मातोश्री'चा 'हाल'-हवाल.....


(आदिशक्तीची 'स्वारी' मातोश्रीच्या आतमध्ये जाते. सगळीकडी एकच गडबड-गोंधळ असतो... कुणी उमेदवारी मिळाल्याच्या आनंदात. तर कुणी कापल्याच्या दु:खात... काहींच्या हातावर 'शिवबंधन' बांधल्याचा आनंद. तर कुठे बंडखोर-नाराजांचा गोंगाट... इतक्यात सर्व ताफा वरळीच्या दिशेने वेगानं निघत असतो... तितक्यात चॅनलवाल्यांची गर्दी पाहून उद्धव ठाकरेंचा ताफा थांबतो)...


उद्धव ठाकरे (माध्यमांना बोलतांना) : आज मी आदित्यला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या पदरात घालतोय. त्याला सांभाळून घ्या. अन हो मुख्यमंत्री 'माझा'च म्हणजेच शिवसेनेचाच होणार. मी केलेली 'महायुती' ही महाराष्ट्राच्या 'भल्या'साठी, विकासासाठी अन हो हिंदुत्वासाठीच आहे. आजही 'कमी' जागा घेऊनही आम्हीच मोठे भाऊ आहोत... जय महाराष्ट्र!...


(तितक्यात मागून जोरानं घोषणा होते.... 'आव्वाज कुणाचा$$$$$'....)


आदिशक्ती (सिंहाला) : बाळा!, ते बोललेत हा एखाद्या पिक्चरचा डायलॉग आहे का रे.... हल्ली बरेचदा ऐकलंय... चल, पुढे जाऊयात....


सिंह (आदिशक्तीला) : माते!, हे सारं पाहून-ऐकून थोडी थकली असशील. डोकं गरगरत असेल. चल, बाजूलाच 'संविधान बंगल्या'वर जाऊयात... थोडं चहा-पाणी घेऊयात... कविताही ऐकूयात मस्त  रामदासांच्या....


आदिशक्ती : बरं!!, ठिक आहे.


(आदिशक्ती अन सिंह 'संविधान बंगल्या'वर पोहोचतात... दिवाणखान्यात आठवलेसाहेब, सिमावहिनी, कार्यकर्ते अन पदाधिकारी बसलेले असतात...)


आठवले (कार्यकर्त्यांना) :

अब महाराष्ट्र के राजनिती मे

बड गया है मेरा कद

क्युकी मोदीजी ने दिया है

मुझे केंद्रीय मंत्रीपद....


महाराष्ट्र मे मिल्या है मुझे

पाच-छह सिटा

अब मेरे डोके का

टेंशनही मिटा...


सिंह (आदिशक्तीला) : माते!, मज्जा येतीय ना कविता ऐकून...


आदिशक्ती (सिंहाला-काहीशा त्रासिक आवाजात) : मी यांना लवकरच साहित्य संमेलनाचं अध्यक्ष होण्याचा आशिर्वाद देते. चल लवकर आता येथून...


सिंह : माते!, आपण थोडं शिवाजी पार्काकडे फेरफटका मारूयात... तुला वाटलंच तर 'कृष्णकुंज'वर काय 'राज'कारण सुरू आहे ते पाहूयात....


('आदिशक्ती' अन 'सिंह' कृष्णकुंजवर पोहोचतात... तेथे राजसाहेब अन पक्षाचे नेते 'गहन' चर्चेत गुंतलेले असतात... काहीजण म्हणतात, 'साहेब, आपण लढलोच' पाहिजे... तर काही म्हणतात, "नको साहेब, इव्हीएम'मूळे आपलं 'इंजिन' धावणार नाही.)


राजसाहेब (नेत्यांना-नेहमीच्या स्टाईलने चष्मा वर सरकवत) : हे बघा!... निवडणुका लढायचा सध्या माझा खरं तर 'मुड' नाही... आपलं 'इंजिन' असं एकदमच 'आघाडी' घेऊ शकणार नाही. अन हो!, त्या इव्हीएमविरोधात आयोग, सोनिया गांधी, पवारसाहेब, ममतादिदी कुणीच ठोस भूमिका घ्यायला तयार नाही... तूम्ही म्हणता तर मी दररोज पाच उमेदवार जाहीर करेन. अर्ज भरेपर्यंत जेव्हढे होतील तेव्हढेच लढूयात... हे घ्या ' एबी फॉर्म'चा गठ्ठा अन वाटा ज्याला लागेल त्याला... चला, मी येतो!... अन हो!, सभांसाठी 'व्हिडीओ' आणा गोळा करून... 'लाव रे तो व्हिडीओ'साठी....


(येथे कोणताच उत्साह दिसत नसल्यानं स्वारी 'दादर'कडे आपला मोर्चा वळवते... 'बाबासाहेब'  नावाच्या क्रांतीसुर्याचं निवास असणाऱ्या 'राजगृहा'बाहेर मोठी गर्दी असते... यात आतापर्यंत न दिसलेले  वेगवेगळे वंचित, गरीब लोक दिसतात. बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकर त्यांच्यासमोर बोलत असतात.)


बाळासाहेब (कार्यकर्त्यांसमोर भाषणात) : हे बघा!, आपल्याला कुणी 'ए टीम' म्हणो की 'बी टीम'... मी वंचितांना सत्तेत बसवल्याशिवाय राहणार नाही... काँग्रेसनं आमच्याशी आघाडी करायची असेल तर त्यांचे सर्व उमेदवार आमच्या 'चिन्हा'वर लढवावेत. मी काँग्रेसला दोन दिवसांचा वेळ देतो. त्यानंतर आपण स्वबळावर महाराष्ट्राच्या विधानसभेवर आपला झेंडा फडकवूया....


(आदिशक्तीला ते चिन्हाचं 'गणित' लक्षात येत नाही... डोक्याला जास्त ताण न देता ते पुढच्या प्रवासाला निघतात... पोहोचतात थेट बारामतीतील 'गोविंदबागे'त.... पवारसाहेब, अजितदादा,सुप्रियाताई, पवार घराण्यातले नवे 'दादा' रोहीत, खासदार कोल्हे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड असे. सर्वजण असतात... राज्यभरातून मोठी गर्दी येथे जमलेली असते... राष्ट्रवादीचं 'पॉवर हाऊस' पवारसाहेबांचा उत्साह एकदम ओसंडून वाहत असतो)...


आदिशक्ती (सिंहाला) : अरे यांच्या पक्षातून एव्हढं 'आऊटगोईंग' असतांनाही एव्हढी गर्दी कशी?...


सिंह : माते!, अगं नेते गेलेत, राजे गेलेत... परंतू, मावळे तिथंच आहेत..


(तितक्यात पवारसाहेब बोलायला सुरूवात करतात.)


पवारसाहेब : रात्र वैऱ्याची आहे. परंतू, मी हारलेलो नाही. माझं वय काय घेऊन बसलात. तो फक्त आकडा आहे माझ्यासाठी... ऐंशीमध्ये सहाच आमदार राहिलेे होते माझ्याजवळ... पुढच्याच निवडणुकीत 'सहा'चे 'साठ' केलेत. राजे जाऊ दे, मोहिते, पिचड, पद्मसिंह जाऊ दे की, आणखी कुणी. मी सर्वांचा 'हिशेेब' करणार आहे. चला, कामाला लागुयात... अन हो!, अजित..... यापुढे मला न विचारताच कोणता निर्णय घेऊन 'आऊट ऑफ कव्हरेज' जाऊ नकोस....


(तितक्यात जोरदार घोषणाबाजी होते... अन 'राष्ट्रवादी पून्हा' गाण्याचा दणदणाट सुरू होतो... आदिशक्ती पवार नावाच्या 'पॉवर'ला लढण्यासाठी आशिर्वाद देत पुढे निघते...)


('स्वारी' पुढे कणकवलीच्या वरवडे भागातील 'श्री. गणेश' निवासस्थानात पोहोचते... दिवाणखान्यात नारायण राणेसाहेब, निलमवहिनी, डॉ. निलेश आणि नितेश बसलेले असतात. त्यांच्यात राजकारणाावर गहन चर्चा सुरू असते.)


राणे साहेब (खास 'मालवणी'त निलेश आणि नितेशला) : भावा आता काय कराया? काय तो मुहूर्त लागना मरे.. कधी येतलो तो मुहूर्त? आपलो स्वाभिमान विसर्जित करूचो आसा मा? भाजप फक्कत काय ती फुडली तारीखच दिऊक लागलो. आपलो स्वाभिमान मा.. असा कसा चलतला? आता ह्याच बघ काँग्रेसातसून बाहेर पडलंय तेच्या आधीय शिवसेना सोडलीच होती नाय.. ती पण कशी? एकदम स्वाभिमानानं! तस्सोच स्वाभिमान राखत भाजपात जाऊचा आसा. नित्या वाईच जरा थंड घेत चल,5 कळला? आता तुका भाजप बनूचा आसा नाय.. वाईच कशी ती कळ काढ. इलोच बघ शीएमचो फोन. दितंत शे दिसता बघ आजचीच तारीख! श्या श्या श्या.. मिस कॉल मरे.. हयच्या नेटवर्क फुडे शानपान नाय बघ!...


आदिशक्ती (सिंहाला) : बाळा!, चल येथून लवकर... त्यांना 'स्वाभिमाना'साठी आशीर्वाद देते मी... पण, ही 'मालवणी' भाषा लई दमदार अन सुंदर आहे रे. अगदी इथल्या निसर्गासारखीच...


सिंह : बरं!, चल, पुढे जावूयात खान्देशात... मुक्ताईच्या गावात...


('स्वारी' थेट मुक्ताईनगरातल्या 'नाथा'च्या 'मुक्ताई' निवासस्थानी येते.... येथे नाथाभाऊंभोवती कार्यकर्त्यांचा प्रचंड गराडा... नाथाभाऊंच्या चेहऱ्यावर मोठा ताण असतो.... घराबाहेरून अनेक 'मराठी चॅनल'चं 'लाईव्ह' सुरू असतं... आदिशक्ती अन तिचा सिंह हे सारं 'महाभारत' पाहत असतात... संतप्त कार्यकर्ते नाथाभाऊंना 'निर्णय' घेण्यासाठी विणवणी करीत असतात...)


नाथाभाऊ (संतप्त कार्यकर्त्यांना) : हे बघा!, हा पक्ष मी बांधलाय महाराष्ट्रात रामभाऊ म्हाळगी, वसंतराव  भागवत, उत्तमराव पाटील, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेच्या साथीनं... कोथळीसारख्या गावातल्या या कार्यकर्त्यानं हा पक्ष खान्देशात, महाराष्ट्रात पोहोचवलाय. ४० वर्षांपासून काटे तुडवत त्याच मार्गावर आज 'कमळ' फुलांचा सडा पसरवलाय... मार खाल्ला, लाठ्या-काठ्या खाल्ल्यात पण पक्ष सोडला नाही. अन आज माझी अवस्था काय... मला सभागृहात चौथ्या रांगेत बसवता... कोल्हापुरात व्यासपीठावर एका कोपऱ्यात बसवता. आयुष्याच्या संध्याकाळी सन्मानानं निरोप देण्याऐवजी माझं नाव जाहीर न करत मला ' गॅस'वर ठेवता... मुलीला तिकीट देत बाप-मुलीच्या नात्याचं तुम्ही मला संपवण्यासाठी हत्यार करता!... हे आई मुक्ताई!, माझं काय चुकलं.... माझा काय गुन्हा गं... कुणी सांगेल का खरंच?...


(नाथाभाऊंच्या आसमंत भेदणाऱ्या आवाजानं आदिशक्तीही अगदी नि:शब्द होते. भरलेल्या डोळ्यांनी आदिशक्ती अन सिंह पुढच्या प्रवासाला निघतात. थेट पोहोचतात नांदेडला गोदातीरी...)


आदिशक्ती (सिंहाला) : थेट अशोकरावांच्या घरी चल... माहीत आहे ना शिवाजीनगरमध्ये आहेय 'शांतीनिलयम' बंगला...


(आदिशक्ती 'शांतीनिलयम'ला पोहोचते. घरात अशोकराव, अमिताभाभी, जया आणि श्रीजया बसलेल्या असतात. अमिताभाभी हाताने कोणता तरी कापड शिवत असतात...)


अशोकराव (अमिताभाभींना) : अगं काय शिवतेय गं हे... बराचवेळ जाईल ते शिवण्यात...


अमिताभाभी : अहो!, ही आपल्या घरची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली 'काँग्रेस' चादर आहे. फारच फाटलीय. मोठं मोठी 'भोकं' पडलीय चादरीला...


अशोकराव : अगं!, 'भोकं' तर अख्ख्या राजकीय नशिबालाच पडलीत आपल्या... लोकं राजकीय 'आदर्श' म्हणून पहायचे आपल्याकडे. पण, आता सारं बदललंय. नांदेडकरांनी तर लोकसभेला मलाच आस्मान दाखवायचा 'प्रताप' केलाय. नांदेडच्या राजकीय 'चिखला'त 'कमळ' कसं उगवलं ते समजलंच नाही... जाऊ दे आता... आता चादरीची 'भोकं' शिवण्यात वेळ घालवणं काही कामाचं नाही... आपल्याला आता 'भोकर'कडे लक्ष द्यावे लागेल. चला सर्वजण आता भोकर जिंकायला.


(आदिशक्ती 'सिंहा'ला म्हणते, आता आपणही चला नागपुरच्या 'गडा'वर...अरे म्हणजेच 'गडकरी वाड्या'वर.... आदिशक्ती नागपुरातील महाल भागातल्या 'गडकरी वाड्या'वर पोहोचते... वाड्याच्या ओसरीत गडकरी त्यांचा 'पी.ए.'शी काही तरी बोलत असतात... )


गडकरी (पी.ए.ला) : हे पाय बे!... मला उद्या पाच सभा घ्याच्या हायेत.... हे आकडे बरोबर अन चांगल्या अक्षरात लिऊन ठेव माह्यावाल्या डायरीत... मले विदर्भात जास्तीत जागा आणाच्या हायेत... म्या शब्द देल्ला वर... विदर्भातून कमयफुलाचा मोठा हार मुंबईले पाठवतो निकालानंतर... लिह माया भाषणाचे मुद्दे.... चार लाख कोटींचे महाराष्ट्रात रस्ते.... राज्यात पन्नास हजार कोटींची मेट्रो... दहा हजार कोटींचे उड्डाणपूल.... अन हो आपलं ते 'इथेनॉल' निर्मितीचं बी लिऊन ठेव... अन हाव बे ते केसांपासून 'अमिनो याशीड' बनवायच्या उद्योगाचा मुद्दा बी लिऊन ठेव.... पाय आता उद्याच्या सभेत माये आकडे अन लोकायच्या टाया....


(गडकरींचं बोलणं ऐकून 'पी.ए.' ही टाळ्या वाजवायला लागतो. अन आकडे ऐकून 'सिंह'ही टाळ्या वाजवणार तोच...)


आदिशक्ती (काहीशा रागाने) : बाळा!, फारच भारावलास रे... सांग बरं चार लाख कोटींवर किती शुन्य असतात... अन महाराष्ट्रातल्या रस्त्यांना रस्ते म्हणायचं का रे?.... चल माझं डोकं भणभणायला लागलंय. निघुयात थेट मुंबईतल्या आपल्या मंडपात दिवस उजाडायची वेळ होत आहे आता....


(आदिशक्ती आपल्या मुक्कामाकडे निघते. महाराष्ट्रभर फिरून राजकीय 'शक्तीस्थळांवरच्या 'महाभारता'नं दोघांच्याही डोक्याचा पार भूगा झालेला असतो... तितक्यात अंधारात एक अतिशय कृष आकृती त्यांना दिसते... आदिशक्ती 'सिंहा'ला थांबायला सांगते...)


आदिशक्ती (त्या माणसाला) : बाळा!, तू कोण आहेस... तू इतका अशक्त का झालास रे!... पार खंगून गेलाय तू... (आपल्याजवळचं पाणी पाजत).... काय झालं बाळा तूला?.... का दमलास इतका?...


'तो' : अरे!... तू तर साक्षात 'आदिशक्ती' आहेस.. माते नवरात्रात तूझं दर्शन झाल्यानं धन्य झालो मी!... पण, माते त्या 'सिंहा'ला थोडं दूर ठेव ना... मला भिती वाटतेय त्याची... मग अगदी सारं सांगतो....


(आदिशक्ती इशाऱ्यानंच सिंहाला थोडं दूर थांबायला  सांगते.)


'तो' : आई!... मी 'कॉमन मॅन' आहे... माझी किंमत शुन्य आहे गं येथे... मोठ्या हिंमतीनं शेती पिकवतो... कधी 'अस्मानी' संकट येतं. तर, कधी 'सुल्तानी'... सरकार शेतमालाला साधा 'हमीभाव' देत नाही माझ्या... भाव नसला तरी माल बेभाव विकावा लागतो व्यापाऱ्याला... त्यातही दलाल लुटतात अन व्यवस्थाही... 'माल' व्यापाऱ्यांच्या घरात. अन आमच्या आयुष्याचं कायमचं 'म्हातेरं'... सरकार भाव वाढवतं तेंव्हा सारा फायदा व्यापारी अन दलालांनाच... सरकारच्या नोटबंदी, जीएसटीनंही आम्ही भिकेला लागलो. सरकारची कर्जमाफी तर आमच्या बांधावरही पोहोचली नाही.... आता निवडणुका आल्यात... राजकारण्यांच्या आश्वासनांनी मन भरून येतं अगदी, आई!... आमचं अख्खं आयुष्यचं स्वप्नं पाहणं अन रंगवण्यात जातं गं.... एकदा बटन दाबलं की संपलं सारं.... मग हे ओळखतंही नाहीत पुढची पाच वर्ष.... आता पंधरा दिवस 'आगे बढो'.... 'तुम्हारे साथ है' म्हणत गर्दी वाढविण्यासाठी 'रोज'गार मिळतो... आयुष्याची दिवाळी म्हणजे पाच वर्षांतले हेच '१५' दिवस असतात... बरं निघतो आई!... सकाळीच लवकर उठून प्रचाराला निघायचं आहे... दिवसभर घोषणा देत बोंबलायचं आहे.... निघतो बरं आई!.... आणि हो!, यांचं लक्षं नसलं तरी तूझं असू दे बरं... असाच प्रेम अन आशीर्वाद असु दे... निघतो...


(अंधारात कॉमन मॅन' झपझप पाऊले टाकत निघून जातो. आदिशक्ती तो दिसेनासा होईपर्यंत त्याच्या पाठमोर्‍या प्रतिकृतीकडे तशीच बघत राहते.....)


सिंह (आदिशक्तीला भानावर आणत) : माते!, चल आपल्याला निघायचं आहे. सकाळपासूनच मंडपात भाविकांसोबत अनेक 'भावी' आमदारांना आशीर्वाद द्यावे लागणार आहेत...


आदिशक्ती (डबडबलेल्या डोळ्यांनी) : अरे बाळा!, 'कॉमन मॅन'चं हे दु:ख पाहिल्यानंतर खरंच परत त्या मखरात बसायची इच्छा नाही रे.... आता परत 'रणचंडीके'चं रूप घेत पुन्हा एकदा भ्रष्टाचार, भूक, भय अन माजलेल्या लाचारीच्या राक्षसांचा संहार करावा वाटतोय.... मला वाटतं ती वेळ अगदी जवळ आलीय आता... चल, निघुयात....


(झुंजूमूंजू झालेलं असतं... देवीच्या भक्तीगीतांनी मंडप मांगल्याच्या वातावरणानं पार भारून गेलेला असतो. देवी आपल्या सिंहावर बसत मंडपातल्या मखरात परत विराजमान होतेय.)