शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे जाहीर सभांमधून किंवा पत्रकार परिषदेतून जशा डरकाळ्या फोडत असतात तशाच डरकाळ्या ते विधिमंडळात फोडतील आणि सरकारला जगणे नकोसे करतील असे वाटत होते. या अधिवेशनात विधान परिषदेत उद्धव ठाकरे जनतेच्या प्रश्नावर सरकारला कोंडीत पकडतील असेही वाटत होते. पण…. पण उद्धव ठाकरे कुठेही दिसले नाहीत.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे काल अखेर सूप वाजले. अर्थसंकल्पाची सुरुवात कबरीने झाली आणि दिशा घेत घेत ती कामरापर्यंत पोहोचली. पण या सर्व कालावधीत विरोधी पक्ष कुठेच दिसला नाही. पायऱ्यांवर आंदोलन आणि कॅमेऱ्यासमोर बाईट देणाऱ्या बोलघेवड्या नेत्यांनी सभागृहात सरकारला धारेवर धरल्याचे चित्रच दिसले नाही. याबाबत विरोधी पक्षांच्या काही आमदारांशी बोलणे केले असता सरकार आम्हाला बोलूच देत नसल्याची टेप वाजवली. सभागृहात आम्हाला बोलू दिले जात नाही म्हणून आम्हाला बाहेर बोलावे लागते असेही या आमदारांनी सांगितले. पण सभागृहात जे बोलले जाते ते ऑन रेकॉर्ड असते आणि त्याचा खूप मोठा परिणाम सरकार आणि सरकारी अधिकाऱ्यांवर होत असतो. एखाद्या समस्येवर चर्चा झाली आणि त्यात काही मार्ग निघाला तर तो अधिकाऱ्यांना पूर्ण करावाच लागतो. बाहेर बाईट देऊन काहीही होत नसते. मीडियावर दिवसभर चर्चा होते पण त्याचे फलित निघत नाही. केवळ मीडियावर दिसण्याच्या लालसेपोटीच मग कोणी हातात बेड्या घालून येतो तर कधी हातात भला मोठा दगड घेऊन येतो. याचा सामान्य जनतेच्या प्रश्नांची काय संबंध हे त्यांना सांगताच येत नाही.
आमदारांचे जाऊ द्या, पण ज्यांना मुंबईकर, मराठी माणूस, राज्यातील शेतकरी, दलित आणि अन्य जनतेची काळजी आहे असे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरी सभागृहात विशेष काही चर्चा केल्याचे आठवत का? मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे विधान परिषदेचे आमदार झाले, त्यांच्या आमदारकीची मुदत १६ मे २०२६ पर्यंत आहे.मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आमदारकीचाही राजनामा देत असल्याचे जाहीर केले होते, पण नंतर काय झाले कोणास ठाऊक त्यांनी राजीनामा दिलाच नाही. राजीनामा न देऊन विधिमंडळात ते सरकारला सळो की पळो करून सोडतील असा भाबडा आशावाद त्यावेळी वाटत होते. पण मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर २०२२ मधील नागपूरमध्ये झालेल्या अधिवेशनात उद्धव ठाकरे सभागृहात एकनाथ शिंदेंना फाडून खातील त्यांना मान वर करायला जागा देणार नाहीत असे वाटत होते. त्यातच महापुरुषांचा अपमान आणि कर्नाटक सीमा वादही जोरात सुरु झाला होता त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारला सोड़णार नाहीत असे म्हटले जात होते आणि यासाठी नागपूरमध्ये माहौलही तयार झाला होता.
पण पण काय झाले? उद्धव ठाकरे नागपूरला आले, विधिमंडळात मांडण्याचे विषय त्यांनी रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन मांडले आणि मुंबईला रवाना झाले. त्यानंतर त्यांनी अधिवेशनाकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यानंतर आतापर्यंत म्हणजे काल संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात एकही लक्षवेधी उपस्थित केली नाही किंवा एकही तारांकित प्रश्न उपस्थित केला नाही. कोणत्याही चर्चेतही ते सहभागी झाले नाहीत. आमदार असल्याने ते विधिमंडळात येतात सही करतात, मीडिया स्टॅन्डवर बाईट देतात आणि निघून जातात.
अधिवेशनादरम्यान नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. आदित्य यांना वाचवावे म्हणून उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना दोन वेळा फोन केल्याचेही म्हटले. यावेळी उद्धव आणि आदित्य विधिमंडळात होते, सभागृहातही दिशा सालियानचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. उद्धव ठाकरे नितेश राणेंचे म्हणणे खोडून काढतील किंवा आदित्य ठाकरे याबाबत काही बोलतील असे वाटत होते पण दोघांनाही या विषयावर मत मांडणे टाळले. खरे तर हे दोघेही मीडिया स्टॅन्डवर आपले विषय मांडत असतात मग इतका मोठा आरोप होत असताना दोघेही गप्प का राहिले हा प्रश्न अनेकांच्या मनात येत होता.
माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे जनतेच्या विविध प्रश्नांवर फडणवीस सरकारला खिंडीत पकडतील असे वाटत होते पण शेतकरी आत्महत्या असो, पीक विमा असो किंवा मुंबईतील रस्त्यांचा विषय असो उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत. असाच प्रकार विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरूनही घडला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विरोधी पक्षनेतेपदाचे पत्र देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने फारच विलंब लावला. पत्र देईपर्यंत भास्कर जाधव चिंतीत होते. आणि खासगीत बोलताना ते वेगळ्या भाषेत चिंता व्यक्तही करून दाखवत होते. पत्रकारितेचा एक नियम असल्याने खासगीतील चर्चा बाहेर येऊ द्यायची नसते म्हणून त्याबाबत जास्त काही बोलणे योग्य ठरणार नाही. अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या संमतीने भास्कर जाधवांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल नार्वेकरांकडे दिले, पण त्याचा म्हणावा तसा पाठपुरावा उद्धव ठाकरेंनी केला नाही. खरे तर त्यांनी यावर सरकारला जाब विचारून हल्ले करायला पाहिजे होते, पण तसे काही झाले नाही. मीडिया स्टॅन्डवरही त्यांनी हा मुद्दा प्रखरतेने मांडला नाही. काँग्रेसमधील आमदारांनी दिलेल्या माहितीनुसार या अधिवेशनात विरोधी पक्षनेता निवडला जाणारच नव्हता हे सगळ्यांना ठाऊक होते, मात्र भास्कर जाधवांना खुश करण्यासाठी त्यांच्या नावाचे पत्र देण्यात आले. काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात विरोधी पक्षनेतेपदासाठी वेगळेच नाव होते असे सांगितले जात आहे. खरे खोटे उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार यांनाच ठाऊक आहे. या चार आठवड्याच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे फार कमी वेळा सभागृहात आले, विधिमंडळात त्यांचा जास्तीत जास्त वेळ अंबादास दानवे यांच्या कार्यालयातच बसण्यात गेला. तेथेच ते पत्रकारांशी गप्पा मारत. मीडिया स्टॅन्डवर येऊ बोलण्यासही त्यांना आवडत नाही. त्यामुळे ते फक्त बाईट देतात.
पत्रकार परिषदेत सरकारवर तुटून पडणारे उद्धव ठाकरे सभागृहात सरकारवर कधी तुटून पडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. ३० जूनपासून मुंबईत सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तरी उद्धव ठाकरे त्यांचे हे रूप दाखवतात की, फक्त सहीपुरते विधिमंडळात येतात ते पाहावे लागेल.