The Presidents Cake Movie Review: इराण (Iran) आणि इराक (Iraq) हे दोन्ही देश 90 च्या दशकात एकमेकांविरोधात उभे ठाकले. दोन्ही देशाचा धर्म एकच, पण पंथ वेगवेगळा. त्यातून सुरु झालेल्या संघर्षाने जगाला सद्दाम हुसैनसारखा खुख्खार हुकुमशहा समजला. त्याआधी 40-45 वर्षांपूर्वी जगाने हिटलर पाहिला होता. दुसऱ्या महायुध्दानंतर जग दोन भागात विभागलं गेलं. रशिया आणि अमेरिका... या दोन्ही महासत्तांनी जगातल्या गरीब राष्ट्रांवर आपली मक्तेदारी सांगायला सुरुवात केली. थेट युद्ध नाही तर कोल्डवारच्या नावाखाली एक-एक देश आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाला. यातून लिबीयातला गदाफी, इराकमधला सद्दाम हुसैनसारखे क्रुरकर्मा तयार झाले. या लोकांनी आपल्याच देशातल्या लोकांचे फार हार केले. फुकाचा राष्ट्रवाद तयार केला, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि तेलाच्या जोरावर हे लोक महासत्तांना थेट आव्हान द्यायला लागले. खरं म्हटलं तर जे पिकलं ते उगवलं. महासत्तांनीच यांना जन्माला घातलं. गदाफी आणि सद्दामसारख्या हुकुमशहांनी विलासी राज्य केलं. आपल्या इशाऱ्यावर देशवासींयांना नाचवलं. जनतेचं काहीही होवो, आपण आपलं मज्जा करायची अशी या हुकुमशहांची विलासी प्रवृती होती. तिकडे सद्दामच्या कट्टर दुश्मन असलेल्या इराणमध्ये खोमेनींनी धार्मिक उठाव केला आणि त्या देशातले नागरीक ही गरिबी आणि लाचारीच्या खायीत लोटले गेले.
त्या-त्या देशातल्या फिल्ममेकर्सनं या अशा राजवटींमध्ये सामान्य जनतेचं नक्की काय हाल झाले? हे चांगलं टिपलंय. इराणच्या माजिद माजिदीचा 'चिल्ड्रेन ऑफ हेवन' (1997) आणि त्यानंतर जवळपास 30 वर्षांनी आलेला इराकच्या हासन हादीचा 'द प्रेसिंडेंट्स केक' (2025) या सिनेमांमध्ये हे पाहायला मिळतंय. देव, देश आणि धर्मासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या या दोन्ही दुश्मन देशांमधल्या नागरीकांचे नक्की काय हाल झाले हे दिसतं. दुश्मन देशामध्ये बनलेल्या या दोन्ही सिनेमांमध्ये सामाजिक संघर्ष, दहशत आणि युद्धा व्यतिरिक्त एक समान दुवा आहे. तिथल्या लहान मुलांची निरागसता. ती एक जागतिक भावना आहे. त्या वयात धर्म, जात, पात, युद्ध असं काही समजत नाही. गरीबी समजते आणि अल्लडपण जपताना, कठीण परिस्थितीतही नवी उमेदीची गोष्ट दोन्ही सिनेमांमध्ये आहे.
'चिल्ड्रेन ऑफ हेवन'(1997) सिनेमात छोट्या साराचे बूट अलीकडून हरवतात आणि मग गरीब भावा-बहिणीचं ते सिक्रेट बनतं. 'द प्रेसिंडेंट्स केक' (2025) सिनेमातल्या लामियावर सद्दाम हुसैनच्या वाढदिवसाचा केक बनवण्याची जबाबदारी आलीय. 1990 च्या सुरुवातीला राष्ट्र संघानं इराकवर आर्थिक बंधनं घातली. यामुळं तिथं प्रचंड गरीबी वाढली. लोकांचे खाण्याचे वांदे झाले. असं असतानाही आपला वाढदिवस साजरा करण्याचा फर्मान सद्दामनं सोडलं आहे. प्रत्येक नागरिकाला तो सेलिब्रेट करायचा आहे. सरकारी आदेशामुळं शाळेत आता सद्दामचा वाढदिवस साजरा होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला काही ना काही टास्क आहे. लामियावर केक बनवण्याची जबाबदारी आली आहे. तिचे वडील युद्धात वारले, तिच्या मित्राचे वडील अपंग झालेत. घरात फक्त आजी आणि हिंदी नावाचा लामियाचा फेवरेट कोंबडा आहे. आता केकचं साहित्य मिळवण्यासाठी लामिया आजीसोबत शहरात जातेय. तिथं केक बनवण्यासाठी पिठापासून, अंडी आणि साखर शोधतेय. हे साहित्य शोधताना जे जे लामियाच्या बाबतीत जे जे काही होतं त्यावर हादीचा 'द प्रेसिडेंट्स केक' (2025) हा सिनेमा बेतलेला आहे.
केक बनवण्याची लामियाची ही प्रक्रिया अतिशय बिकट आहे. गरीबीमुळं साहित्य घेण्यासाठी तिच्याकडे पैसे नाहीत. पण केकची जबाबदारी आपल्यावर आलेय, त्यामुळं आपल्याला तो बनवावाच लागेल असं निरागस टास्क घेऊन ती साहित्य शोधतेय. सद्दामच्या राजकिय पॉलीसीमुळं या देशातल्या नागरिकांचे जे काय हाल झाले ते 'द प्रेसिडेंट्स केक' (2025) पाहताना प्रेक्षकांना जाणवतं. तिला ते काहीही कळत नाही. सद्दाम हुकूमशहा आहे, म्हणजे नक्की काय करतो? हे पण तिला माहीत नाही. तिला हे माहितेय की, त्याच्या बर्थडेला केक बनवायचाय, त्यासाठी लागणारं साहित्य तिच्याकडे नाही आणि ते मिळवण्यासाठी तिचा सर्व आटापिटा संपूर्ण सिनेमाभर सुरू आहे.
'चिल्ड्रेन ऑफ हेवन' (1997) मध्ये सारा आणि अली बुटासाठी शहरभर धावत असतात. शहरातल्या कुठल्याच माणसाचं त्याच्या या परिस्थितीकडे लक्ष नसतं. 'द प्रेसिडेंट्स केक' (2025)मध्ये ही लामिया पीठ, साखर आणि अंड्यासाठी शहरभर भटकत असते. तिचा वर्गमित्र तिच्यासोबत असतो. तेही धावत असतात, एक एक दिव्य पार करत असतात पण शहरातल्या कुणाकडे त्यांच्या या स्ट्रगलकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कारण संपूर्ण शहरच अशा बिकट परिस्थितीतून जात आहे. मोजकी चांगली माणसं भेटतात, मदतीचा हात देतात. पण ती फक्त बोटावर मोजण्याइतकीच. शहर अस्वस्थ आहे, तिथली माणसं अस्वस्थ आहेत.
दोन्ही सिनेमात लहान मुलांच्या माध्यमातून एका देशात घडणाऱ्या घडामोडीं स्पष्ट दाखवण्यात आलाय. युध्दात मशगुल असलेल्या राज्यकर्त्यांना सर्वसामान्य जनतेचे काय हाल होतायत हे पाहण्यात रस नाही. त्यांना त्यांचं राज्य करायचं, अशा परिस्थितीत लामियाची निरागसता प्रेक्षकांना खिळवून ठेवते. केक करणं हे माझं कर्तव्य आहे, मला दिलेली जबाबदारी आहे. ते तिचं टार्गेट आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करते. त्या कामात तिची मदत करतो. सिनेमाभर ती साहित्याच्या शोधात फिरते. जेव्हा सिनेमा संपतो तेव्हा शाळेवर बाँम्ब हल्ला होतो. वर्गात धुळीचं साम्राज्य होतं. या धुळीत पण लामिया आणि तिचा मित्र नव्या खेळाच्या गोष्टी करत असतं.
खरंच लहान मुलं निरागस असतात, त्यांना युद्ध धर्म यातलं काहाही कळत नाही. या दुश्मन राष्ट्रातल्या निरागस मुलांचं काय करायचं? ते आपआपल्या देशाची गोष्ट सांगतात. ही निरागसता भयंकर डिस्टर्बिंग आहे.