जगात अकल्पित घटनांचा ओघ सुरु आहे अगदी अनादी काळापासून. पृथ्वीच्या काना-कोपऱ्यात अनेकदा अचंबित करणाऱ्या, अविश्वसनीय घटना घडत असतात. काही गोष्टींवर विश्वास बसतो तर काहींवर नाही. काही प्रश्नांची उत्तरं मिळतात काहींची मिळतच नाहीत. अशाच अनाकलनीय घटनांची मालिका एका बेटावर घडत गेली आणि ते बेट आता एक हॅान्टेड ट्युरिस्ट डेस्टिनेशन बनून राहिलंय...!! मेक्सिकोपासून 17 किलोमीटर "ला इस्ला डे ला म्युनेकस". या बेटावर रात्रीच्या वेळी टाप नाही कोणाची इथे थांबण्याची, कारण आहे त्या बेटावर लटकणाऱ्या हजारो भयानक बाहुल्या...!! खरं तर लहान मुलांच्या बाहुल्या दिसायला गोंडस असणाऱ्या पण इथे मात्र परिस्थिती निराळी.
या बाहुल्या इथे आल्या कशा याची एक पार्श्वभूमी आहे आणि एक गूढही. 1950 साली या बेटाच्या शेजारच्या बेटावर राहणारा डॅान ज्युलियन बरेरा हा भाजी विक्रेता या बेटावर दिवसभरचा आपला उद्योग उरकल्यावर फिरायला येत असे. तसं त्यावेळी या बेटावर कोणीही राहत नसे हाच त्या बेटाचा मालक होता. एक दिवस एक कुटुंब या बेटावर फिरायला येतं, एक जोडपं आपल्या मुलीला घेऊन या बेटावर फिरायला येतं. फिरत असताना आपल्या आई-बापाची नजर चुकवून ती चिमुरडी मुलगी पाण्याच्या जवळ जाते, पाण्यात पडते आणि तिचा मृत्यू होतो. ज्युलियनलाही या गोष्टीची माहिती होते.
काही दिवस उलटतात. ज्युलियन नेहमीप्रमाणे त्या बेटावर फेरफटका मारायला येत असतो. एक दिवस जिथे ती मुलगी बुडालेली असते त्याठिकाणी त्याला एका मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू येतो. रडत असताना ती मुलगी मला माझी बाहूली पाहिजे असं म्हणत असते. ज्युलियन त्या दिशेला जायला लागतो, पाहतो तो एक बाहुली त्याठिकाणी पडलेली असते.
तो ती बाहुली उचलतो त्या मुलीची ती बाहुली आहे असं समजून ती बाहुली याच स्पाँटवर राहू दे असं त्याच्या मनात येतं आणि तो ती बाहुली तिथेच एका झाडाला लटकवतो आणि निघून जातो. २-३ दिवसांनी पुन्हा त्या ठिकाणी येतो, पाहतो तर आणखी एक बाहुली पाण्याशेजारी पडलेली त्याला दिसते. अचंबित झालेला ज्युलियन ती बाहुलीही उचलतो आणि झाडाला लटकवतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी ज्युलियन येतो तेव्हा आणखी एक बाहुली त्याला त्याठिकाणी पडलेली आढळते. पुन्हा तीही बाहुली तो उचलतो आणि इतर दोन बाहुल्यांच्या शेजारच्या फांदीवर लटकवतो. त्यानंतर जेव्हा जेव्हा ज्युलियन या स्पाँटवर येई त्या त्या वेळी त्याला एक बाहुली त्य़ा स्पाँटवर पडलेली दिसे. पुन्हा तो ती इतर बाहुल्यांच्याबरोबर झाडाच्या फांदीला लटकवत असे.
हा सिलसिला असाच चालत राहिला, कित्येक दिवस आणि महिने. शेजारी असलेलं ते झाड बाहुल्यांनी भरुन गेलं, त्याच्या शेजारचं झाड भरलं, त्याच्या शेजारचं भरलं आणखी एक भरलं, आणखी झाडं बाहुल्यांनी भरली गेली, भरतच गेली. मिळालेली एकन् एक बाहुली ज्युलियन लटकवत गेला संख्या वाढत गेली बेट बाहुल्यांनी भरत गेलं. मधून अधून ज्युलियनला बाहुल्यांच्या रडण्य़ाचा- हसण्याचा आवाज आला असं म्हणटलं जातं.
दिवस उलटत असताना एक दिवस एका लोकल चँनेलचा एक फिल्म मेकर त्या बेटावर येतो आणि बेटावर असलेल्या बाहुल्या पाहून अचंबित होतो. तो आणि त्याची टीम तिथे राहते, सर्व पाहते ती टीम तिथून सर्व शूट करुन गेल्यानंतर मात्र मीडियात सर्व गोष्टी येतात आणि एकच कल्लोळ माजतो. लोक दूर दूर वरुन या बेटाला पाहण्यासाठी येऊ लागतात.
त्यानंतर आणखी एका घटनेनं सर्वजण हादरतात, २००१ साली ज्युलियन जिथे ती लहान मुलगी पाण्यात बुडून मृत पावलेली असते तिथे मृत अवस्थेत आढळून येतो. याचीही मोठी बातमी होते. असं म्हणतात आजही या बेटावर त्या ठिकाणी बाहुली सापडते, ती परत कोणीतरी झाडावर लटकवतं. पर्यटन स्थळ होऊन राहिलेल्या त्या बेटावर रात्री मात्र कोणीही राहात नाही. काही लोकांनी थांबून रिसर्च करण्याचा प्रयत्न केला पण विचित्र घटनांमुळे निघून आले. बाहुल्यांचा रडण्याचा, हसण्याचा आणि एकमेकांशी बोलण्याचा आवाज काही जणांनी दिवसाही ऐकला आणि रात्री तिथे थांबण्याचं डेअरिंग करणाऱ्या लोकांनाही. आज "ला इस्ला डे ला म्युनेकस" हे अख्खं बेट बाहुल्यांनी भरुन गेलंय, लाखो भयावह बाहुल्या तिथे झुलताना दिसतात त्या तिथे कशा आल्या या प्रश्नाला बरोबर घेऊन.