प्रति,
मा. मुख्यमंत्री महोदय,
मा. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष
मा. एमडी साहेब, एसटी महामंडळ
मुंबई, महाराष्ट्र


अर्जदार :- सर्वांची लाडकी, लालपरी, हिरकणी, यशवंती, शिवनेरी, शिवशाही, अनेकरुपी, माझ्या कामगारांची लक्ष्मी,
(तुमची, आमची, आपली सर्वांची एसटी )

विषय:- माझे वय झाले म्हणून मलाही सवलत मिळणे बाबत...

महोदय,

वरील विषयास अनुसरुन विनंती करते की, ज्येष्ठ नागरिक 65 वय झाले म्हणून 50 टक्के सवलत, दिव्यांगांना 75 टक्के सवलत, शाळेतील मुलांना सहल, परीक्षा, सुटी, पास सवलत, पुरस्कार प्राप्त लोकांना शंभर टक्के सवलत, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना प्रवासात सवलत,
साहेब सर्वांना सवलत आहे.... पण साहेब मग सवलत मला का नाही ?

माझे वय 1 जून 2019 रोजी 71 वर्षे पूर्ण झाले आहे. तसे पाहता मीही ज्येष्ठ नागरिक आहे. मग ज्येष्ठ नागरिक सवलत मला का नाही?
साहेब, मी पूर्ण खिळखिळी झाली आहे, त्यामुळे मी नेहमी आजारी असल्यामुळे मला अपंगत्व आले आहे. मग अपंग सवलत मला का नाही ?

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे तिन्ही ऋतु मी अंगावर घेते. नेहमी या दुष्काळाची झळ माझ्या मुलांना, माझे चालक, वाहक, यांत्रिक यांनाही बसते. मग दुष्काळी सवलत मला का नाही ?

इतरांच्या बाबतीत विचार करता तसा जरा माझा व माझ्या कुटुंबाचाही विचार करा. मला सर्वात जास्त सवलतीची गरज आहे. कारण सर्वांना सवलत माझ्यामुळे आहे. पण मग साहेब, सवलत मला का नाही?  हा मला पडलेला ज्वलंत प्रश्न आहे.

साहेब, वरील विषयाचा विचार करता माझ्या वयाचा व माझ्या मुलांच्या कष्टाचा विचार करता, मला 17 सवलती नको, मला फक्त आणि फक्त एकच सवलत दया. मला शासकीय घोषित करून माझे विलीनीकरण करून घ्या.

आपले खूप उपकार होतील साहेब, नाही बघवत हों मला माझ्या मुलांचे हाल. रस्त्यावर होणारी अमानुष मारहाण. त्यांचे कष्ट, त्यांच्या परिवाराचा त्याग, त्यामुळेच त्यांची आई या नात्याने तुमच्याकडे साकडं घालते साहेब. माझ्या पत्राचा विचार करून माझे विलीनीकरण करून मला ही सवलत द्यावी. ही आपणांस नम्र, कळकळीची विनंती. माझी मागणी आपण पूर्ण कराल ही अपेक्षा.

कळावे !

आपलीच नव्हे तर, सर्व महाराष्ट्राची विशेषतः ग्रामीण भागाची लाडकी

लालपरी अर्थात एसटी