काल झालेल्या एस आर एच विरुद्ध एल एस जी सामन्यात पाहायला मिळाला तो नवाबी थाट. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय हा हैदराबाद कडे असलेली फलंदाजी आणि त्यांची आक्रमकता पाहता धाडसी होता.पण पक्का गृहपाठ करून आलेल्या पंत ने तो निर्णय घेतला. निळा रंग पाहिल्यावर अंगी असलेल्या आक्रमतेत अजून भर घालून खेळणारा हेड सुरवातीपासून इम्प्रोवाईज करून खेळला. ६ व्या नाट्यमय षटकात त्याचा उंच उडालेला झेल निकोलस ने सोडला. लखनऊ आणि निकोलस या दोघांच्या नशिबाने हेड पुढच्या षटकात बाद झाला. अन्यथा निकोलस ला गोयंका साहेबांनी चांगलेच धारेवर धरले असते. हेड बाद झाल्यावर हैदराबाद संघ काही छोट्या छोट्या केमिओच्या मदतीने फक्त १९० धावांची मजल मारू शकला. यात पंत ने शार्दुल आणि प्रिन्स यादव चा छान वापर करून घेतला.
अनसोल्ड शार्दुल किती किमती आहे हे त्याने आज आपल्या गोलंदाजीत दाखवून दिले. दिनेश लाड यांचा हा लाडका विद्यार्थी जेव्हा जेव्हा समर्पण देण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा तो पूर्ण समर्पण देतो. रणजीतील अफलातून कामगिरी नंतर त्याला लखनऊ ने आपल्या संघात घेतले. आणि तिथे झहीर नावाचा जवाहिऱ्या होताच. शार्दुल ठाकूर याने या आधीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (२०/२१)आणि त्या नंतर इंग्लंड येथील दौऱ्यात आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजी यात सातत्य पूर्ण कामगिरी केली. पण तरी सुद्धा तो भारतीय संघाबाहेर का? हा प्रश्न पडतोच. आजच्या सामन्यात त्याने फार हुशारीने गोलंदाजी केली. अभिषेक शर्माला त्याने एका आखूड टप्प्याच्या चेंडूवर फसविले आणि त्यानंतर आलेल्या ईशान ला एका लेग ग्लांसच्या मोहात पाडले.सांघिक १९ व्या षटकात त्याने फक्त तीन धावा दिल्या आणि एकूण ३४ यावरून त्याने केलेली गोलंदाजी लक्ष्यात येते. १९१ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या लखनऊच्या संघाला मिचेल मार्श आणि निकोलस पुरण याने आक्रमक सुरुवात करून दिली. केवळ ४१ चेंडूत १०० धावांची भागीदारी करून या दोघांनी हा सामना १० व्या षटकात लखनऊच्या बाजूने झुकविला. केवळ २६ चेंडूत ७० धावा ठोकून काढणारा निकोलस आज जुना कॅरेबियन वाटला. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक संझगिरी एकदा म्हणाले होते की वर्षानुवर्ष भोगलेल्या गुलामीचे व्रण जे कॅरिबियन लोकांच्या मनावर आहेत तेच व्रण आपल्या बॅट ने क्रिकेटच्या मैदानावर ते प्रतिस्पर्धी संघावर उठवितात. याची सुरुवात विव रिचर्ड्स ने केली होती आणि त्याच आक्रमकतेची पालखी आत्ताच्या घडीला निकोलस पुरण वाहतो आहे ती सुद्धा शैलीदार फटक्यांनी. आपल्या पायांची कमीत कमी हालचाल करून त्याने मारलेले ऑन साईडला फटके हे त्यांच्यामधील गुणवत्तेची साक्ष देतात. त्याच्यासारखा मोठा फलंदाज फक्त 20-20 फॉर्मेट पुरताच मर्यादित राहिला ही मात्र दुर्दैवाची गोष्ट. आजचा सामना जिंकून लखनऊच्या संघाने गुणतालिकेत आपले खाते उघडले.. आणि आपले संघ मालक गोइंका यांच्या चेहऱ्यावर हसू आणले. त्यांचे हे हसू किती मोलाचे आहे. हे पंत ला चांगलेच माहीत आहे...आणि ते कायम राहवे यासाठी त्याची कामगिरी सुद्धा महत्वाची आहे. कारण गोयंका साहेब आपल्या शिस्तीचा बडगा मॉनिटरला दाखवितातच...