१९९९ ते २००७... हा तोच काळ आहे ज्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच संघाचा दबदबा होता. तो संघ होता ऑस्ट्रेलिया.


त्या आठ वर्षात ऑस्ट्रेलियानं सलग तीन वन डे विश्वचषक जिंकले. आणि त्यात संघातल्या प्रत्येकाचा मोलाचा वाटा होता. आणि त्यातलच एक नाव होतं. अँड्र्यू सायमंड्स.


भरदार शरीरयष्टी, थोडासा रागीट चेहरा आणि आक्रमक अंदाज... ऑस्ट्रेलियन क्रिकेटरमधले सगळे गुण सायमंड्समध्ये खच्चून भरले होते. कांगारूंच्या या शिलेदारानं आपल्या कामगिरीनं अनेक मैदानं गाजवली. अनेकवेळा संघाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढलं. ऑस्ट्रेलियाचा तो एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून गणला गेला.


१० नोव्हेंबर १९९८ साली सायमंड्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून त्यानं तिन्ही फॉरमॅट्समध्ये मिळून २३८ सामन्यात सायमंड्सनं ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या खात्यात ६ हजार ८८७ धावा, आठ शतकं आणि ४२ अर्धशतकं जमा आहेत. तर गोलंदाजीत १३५ विकेट्स.


२००३ आणि २००७ साली ऑस्ट्रेलियानं जिंकलेल्या दोन्ही विश्वचषक स्पर्धांमध्ये सायमंड्सचं मोठं योगदान होतं. २००३ सालच्या विश्वचषकात त्यानं पाकिस्तानविरुद्ध केलेली १४३ धावांची खेळी ही सायमंड्सच्या आजवरच्या सर्वोत्तम खेळींपैकी एक होती. २००६-०७ची अॅशेस मालिका जिंकून देण्यातही सायमंड्सचा सिंहाचा वाटा होता. आयपीएलमध्येही २००९ सालचा विजेता ठरलेल्या डेक्कन चार्जस संघात सायमंड्सचा समावेश होता.


पण सायमंड्सच्या कामगिरीइतकीच त्याची कारकीर्द वादांमुळे सतत चर्चेत राहिली. सायमंड्स आणि हरभजन सिंग यांच्यातला वाद तर क्रिकेटविश्वातला सर्वात मोठा वाद म्हणून ओळखला गेला. २००८ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या त्या मंकीगेट प्रकरणामुळे क्रिकेटविश्वात एक मोठं वादळ उठलं होतं.


पण सायमंड्स-हरभजनमधल्या या वादासह संघसहकारी मायकल क्लार्कसोबतचे मतभेद, दारु प्यायल्यानं संघातून डच्चू, पबमध्ये मारहाण, टीम मिटिंग सोडून मासेमारीला जाणं अशा अनेक वादग्रस्त कारणांमुळे सायमंड्स चर्चेत राहिला.


अँड्र्यू सायमंड्सची वैयक्तिक आयुष्याची कहाणीही वेगळी आहे. सायमंड्सचा जन्म ९ जून १९७५ चा. इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये तो जन्माला आला. पण तो तीन महिन्याचा असताना एका ऑस्ट्रेलियन दाम्पत्यानं त्याला दत्तक घेतलं. बास्केटबॉल स्टार लेरॉय लॉगिनसारखा दिसतो म्हणून 'रॉय' हे सायमंड्सचं टोपण नाव पडलं.
लहानपणी सायमंड्स क्रिकेट आणि टेबल टेनिस दोन्हींमध्ये सरस होता. पण वडिलांनी सायमंड्समधलं क्रिकेटचं कौशल्य पाहून त्याला वॉन्डरर्स क्रिकेट क्लबमध्ये दाखल केलं. पुढे १९९४ साली तो ऑस्ट्रेलियाच्या अंडर नाईन्टिन संघातून खेळला.


२००९ साली सायमंड्स अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आणि २०१२ मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीनंतर समालोचक म्हणून त्यानं क्रीडा वाहिन्यांसाठी काम केलं.


पण हाच सायमंड्स आज अशी एकाएकी एक्झिट घेईल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. भारतात रविवारची सकाळ क्रिकेटविश्वासाठी एक वाईट बातमी घेऊन उजाडली. अँड्र्यू सायमंड्सच्या अपघाती निधनाची. वयाच्या अवघ्या ४६व्या वर्षी त्याचं जाणं सर्वांच्याच जिव्हारी लागणारं ठरलं.


गेल्या दोन महिन्यात क्रिकेट जगतानं तीन तीन ऑस्ट्रेलियन दिग्गज गमावले. रॉड मार्श... मग शेन वॉर्न आणि आता अँड्रयू सायमंड्स.