२००५ फ्रेंच ओपन फायनल - विजेत्या नदालचं वय १९, प्रतिस्पर्धी प्युएर्टाचं वय २७


२००६ फ्रेंच ओपन फायनल - विजेत्या नदालचं वय २०, प्रतिस्पर्धी फेडररचं वय २५


२०१० विम्बल्डन फायनल – विजेत्या नदालचं वय – २४ प्रतिस्पर्धी बर्डिचचं वय – २५


२०१४ फ्रेंच ओपन फायनल – विजेत्या नदालचं वय – २८, प्रतिस्पर्धी ज्योकोविचचं वय – २७


२०२२ – ऑस्ट्रेलियन ओपन फायनल – विजेत्या नदालचं वय – ३५, प्रतिस्पर्धी मेदवेदेवचं वय – २५


नदाल १७ वर्षे टेनिस विश्व कसं व्यापून राहिलाय हेच ही आकडेवारी सिद्ध करते.


म्हणजे बघा ना.. पहिल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाला २००५ मध्ये त्याने गवसणी घातली तेव्हा तो १९ वर्षीय युवा खेळाडू होता. तर प्रतिस्पर्धी प्युएर्टा २७ वर्षांचा.. दुसरी ग्रँड स्लॅम जिंकली त्यावर्षी २००६ मध्ये त्यावेळचा प्रतिस्पर्धी २५ वर्षीय किंग फेडरर तर २०२२ मध्ये त्याने विक्रमी २१ वा तुरा आपल्या शिरपेचात खोवला तेव्हा प्रतिस्पर्धी युवा मेदवेदेव अवघा २५ वर्षीय आणि नदालचं वय ३५.


म्हणजेच करिअरच्या सुरुवातीला आठ वर्षांनी मोठ्या प्रतिस्पर्ध्यावर मात तर करिअर १७ वर्षांची झाल्यावर १० वर्षांनी युवा असलेल्या टेनिसपटूचा पराभव. या स्पर्धेत फेडरर आणि ज्योकोविच खेळत नव्हते, ही बाजू जरी नदालच्या काहीशी पथ्यावर पडली असली तरी त्याने केलेल्या झुंजार खेळाचं मोल कमी होत नाही. कारण, त्याच्यापेक्षा तरुण खेळाडूशी नदालने फायनलमध्ये तब्बल साडेपाच तास फाईट केली आणि आणखी एक ट्रॉफी आपल्या कलेक्शनमध्ये आणलीच.


स्टॅमिना, फिटनेस, मानसिक कणखरता यांची परमोच्च कसोटी पाहणाऱ्यांपैकी एक खेळ अर्थात टेनिस.


फायनलमध्ये नदाल दोन सेट डाऊन होता. त्याही स्थितीत कमबॅक करायला तुम्हाला बर्फाची लादी नव्हे तर पर्वतच डोक्यावर घेऊन खेळावं लागतं. याच स्पर्धेत क्वार्टर फायनलमध्येही नदाल पाच सेट्स खेळला होता. म्हणजे एका आठवड्यात दुसरी फाईव्ह सेटर थ्रिलिंग मॅच, तीही नॉकआऊट.


टेनिसमध्ये हे दमछाक करणारं आहे. अर्थात ज्या ग्रँड स्लॅममध्ये म्हणजे क्ले-कोर्टवर जिथे तुमच्या स्टॅमिना आणि फिटनेसची सर्वात जास्त कसोटी घेतली जाते तिथे नदालने १३ वेळा विजेतेपदाचा मुकुट मिरवलाय. तिथेही त्याने प्युएर्टा, फेडरर, ज्योकोविच, सॉडरलिंग, डेव्हिड फेरर, स्टॅन वावरिन्का अशा वेगळ्या शैलीच्या आणि वेगळ्या जनरेशनच्या टेनिसपटूंना धूळ चारलीय. त्याचा हा परफॉर्मन्स अविश्वसनीय आहे.


डावा पाय, गुडघा, हाताचं कोपर, पाठ अशा अनेक दुखापतींनी त्याला घेरलं. तरीही त्यातून तो सहीसलामत बाहेर पडला. दोन सेट डाऊन मॅचमधून तो ज्या सफाईने बाहेर पडतो तसाच. दुखापती हा जरी खेळाडूच्या कारकीर्दीचा अविभाज्य भाग असल्या तरी टेनिससारख्या वैयक्तिक खेळात या दुखापती तुमचं शरीर आणि कधी कधी तुमचं मनही पोखरुन टाकतात. या दुखापतींमधून मुसंडी मारणं सोपं नसतं. त्यात गेल्या वर्षी त्याला कोरोनानेही गाठलं. त्या कोरोनावरही मात करत तो ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उतरला.


“I learned during my career to enjoy suffering.” हे त्याचं वाक्य असो किंवा


If you don't lose, you cannot enjoy the victories. So I have to accept both things.


किंवा


“The thing, when you are down two sets to love, is to stay calm, even though it’s hard.”


खेळाडू घडत असताना खास करुन चॅम्पियन खेळाडू घडत असतानाची साक्ष देणारी ही नुसती वाक्य नाहीयेत. हा नदालच्या लढाऊ व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे. त्याच्यातला ग्रँड चॅम्पियन दाखवणारा. काही व्यक्तींसाठी age is just a number असं म्हटलं जातं. टेनिस विश्वात नदालला तसंच म्हणावं लागेल.


फेडरर, नदाल आणि ज्योकोविच या त्रिकूटाने वर्ष २००० पासून टेनिस विश्व डॉमिनेट केलं. त्यांनी या खेळाचा दर्जा उंचावला, वेगळे मापदंड निर्माण केले. तिघांमध्ये मिळून आता ६१ ग्रँड स्लॅम विजेतेपदं आहेत. ज्यात नदाल २१ विजेतेपदांसह या शिखरावर आहे. दोन दशकं टेनिसविश्वातील त्याच्या साम्राज्याने त्याला सार्वकालिक महान खेळाडूंच्या पंक्तीत केव्हाच बसवलंय. जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या त्रिसूत्रीची त्याने धरलेली कास केवळ टेनिसपटूंनाच नव्हे तर एव्हरी कॉमन मॅन आणि त्याच्या कॉमन फॅनलाही प्रेरणादायी आहे.