सुशांतसिह राजपूत जाऊन आज बरोब्बर एक आठवडा झाला.
तो गेल्यापासून त्याचा विचार, विषय नाही असा एकही दिवस गेला नाही. सतत वाटायचं काहीतरी लिहायला हवंय. आतून वाटतं, लिहावसं. खरं काय लिहावं? कळत नव्हतं. काहीतरी कधीतरी बाहेर येणार याची कल्पना होतीच. पण ते कधी येईल याची वाट पाहाणं इतकंच हाती असतं आपल्या. कमाल आहे पहा.. तो गेल्यावर बरोब्बर आठवड्याने मला लिहावं वाटावं?
बरं. ते जाऊ द्या. तुम्हाला कळलं की नाही?
राखी सावंतला दृष्टांत झालाय. त्यात सुशांत आला होता म्हणे तिच्या स्वप्नात. आणि म्हणाला, की तुझ्याच पोटी जन्माला येईन मी. एक ही बातमी. आणि दुसरी.. सुशांतवर सिनेमा येतोय. कोण काढणार.. कोण दिग्दर्शित कऱणार हा मुद्दा इथे नाही. म्हणजे, तो जाऊन आठवडा उलटायच्या आत त्याने दृष्टांत दिला आहे. आणि त्याच्यावर सिनेमा येतो आहे.
..
आता क्रोनोलॉजी समजून घेऊया.
तो गेल्या गेल्या कसे मेसेज फिरले?
पहिल्यांदा वेदनेचे.. धक्क्याचे. आरआयपीवाले. मग आले तू असं का केलंस.. ते वाले. त्यानंतर आले इमोशनलवाले. म्हणजे, मनात असेल ते बोला. मी आहे.. हे असलेवाले मेसेज. हे येतायत तोवर सुशांतला कसं एकटं पाडलं गेलं होतंवाले मेसेज. मग त्यानंतर सुरू झाला आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला. आधी अभिनव कश्यप.. मग सोनू निगम.. जिया खानची आई.. मग कंगना रनोट.. नेपोटिझम.. आऊटसायडरचे वाद... दरम्यानच्या काळात त्याची अफेअर्स.. त्याच्या जुन्या मैत्रिणी.. नुकतीच आत्महत्या केलेली त्याची पीए दिशा सॅलियनचं जाणं.. डिप्रेशन.. आणि बरंच काही.
आता हे सगळं बरंच मागं पडलं आहे.
या गेल्या एका आठवड्याने केवळ बॉलिवूडलाच नव्हे तर माणसाला उघडं पाडलं आहे. त्याच्या नंतरच्या फोटोंपासून तो कसा नशाबाज होता इथपर्यंत अनेक कहाण्या ऑलरेडी सांगून झाल्या आहेत. आता त्यात आपण नको जाऊया.
सुशांतच्या आत्महत्येला किंवा जी घटना घडली ती आत्महत्या नसून सिस्टिमचा बळी आहे हे भासवण्याचा प्रयत्न सुरूआहे. तो चूक बरोबर यात आत्ता जाण्यात अर्थ नाही. कारण तो या ब्लॉगचा मुद्दा नाही.
..
तुन्हाला माहितीये, आपल्याकडे रिएलिटी शोज लागतात. गाण्याचे.. नाचाचे.. अगदी जे कोणतेही असोत. तिथे भाग घ्यायला स्पर्धक आला की त्याच्याकडून एक करार करून घेतला जातो. त्यात बऱ्याच अटी शर्ती असतात. त्यात छुपं असं काहीही नसतं. त्यात अर्थात गाण्याच्या रिएलिटी शोला हे जास्त लागू होतं. तर त्यात एक महत्वाची अट किंवा नियम असा असतो की जर तुम्ही त्या स्पर्धेचे विजेते झाला तर पुढचे किमान दीड ते तीन वर्षं तुम्ही संबंधित चॅनलसोबतच असाल. कुठे गायचं.. काय गायचं.. किती गायचं हे सगळं चॅनल ठरवतं. त्या कार्यक्रमाचं मानधनही किती घ्यायचं हेही ही सिस्टिम ठरवते. त्या मानधनाच्या किती टक्के विजेत्या गायकाला मिळणार हेही आधीच सांगितलेलं असतं. यात कोणतीही फसवाफसवी नसते. पण हा त्या कार्यक्रमाचा भाग असतो. त्या बदल्यात चॅनलने तुम्हाला नाव दिलेलं असतं. चेहरा दिला असतो. वगैऱे वगैरे.
..
सिनेमातही हे असतं. अर्थात हिंदीत जास्त. नव्या कलाकारासोबत काम करताना संबंधित कंपन्या करार करतात. मुलामध्ये वा मुलीमध्ये टॅलेंट असतं म्हणूनच त्याला करारबद्ध केलं जातं हे खरं असलं तरी कंपनी एका अर्थाने रिस्क घेत असतेच. आता उलट्या बाजूने विचार केला तर उमेदवार म्हणेल, की अशा कंपन्या काही उपकार करत नाहीत. टॅलेंट आहे म्हणूनच तर करार करतायत. असं कुणालाही वाटू शकतं. पण यात एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा.. इथे बॉलिवूडमध्ये असलेली नव्या कलाकारांची मागणी आणि भारतभरातून बॉलिवूडमध्ये येणाऱ्या नव्या टॅलेंटचा पुरवठा मुबलक आहे. पण मोठे बॅनर किती? हाताच्या बोटावर मोजता येतील इतके. याचा फायदा घेतला जातो. अत्यंत कमी किमतीत उत्तम टॅलेंट हेरलं जातं. त्याच्यासोबत करार केला जातो आणि त्याला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न होतो.
आता हे सगळीकडे आहे. टीआरपीमध्ये क्रमांक एकवर असलेल्या मनोरंजन क्षेत्रातल्या चॅनलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पगार इतर चॅनलपेक्षा कमी असतो. कारण त्या बदल्यात चॅनलमध्ये काम करण्याचं प्रेस्टिज तुम्हाला मिळणार असतं. तुमचा बायोडेटा मजबूत होणार असतो. या सगळ्या टर्म कंपन्या लक्षात घेत असतात. अर्थात उमेदवारही यापासून अनभिज्ञ नसतो. हेच समीकरण बॉलिवूडला लागू आहे.
सुशांतने आत्महत्या करणं दुर्दैवीच आहे. पण त्याची कारणं शोधताना सरधोपट पद्धतीने विचार होणं जरा धोक्याचं आहे. इथे जेवढी माणसं तेवढे व्यवहार होतात. उदाहरणार्थ, सुशांतसोबत यशराजचा जो करार असेल तोच यशराज आयुषमान खुरानासोबत करेल असं नाही. आयुषमानसोबत होणारा करार आणि राजकुमार रावसोबतचा करार हा वेगळा असेल. आता तो कोणत्या निकषांवर झाला.. का केला हे केवळ ती कंपनी आणि उमेदवार यांनाच माहीत असतो. यातला एक फॅक्टर अत्यंत महत्वाचा असतो तो म्हणजे वेळ. तो करार जेव्हा केव्हा केला असेल तेव्हा उमेदवार आणि कंपनी कोणत्या स्तरावर आहेत यालाही मह्त्व असतंच. कारण बॉलिवूडमध्ये तख्ता पलटने देर नही लगती. इकडे एक नफ्यातला सिनेमा आला की सगळी गणितं बदलतात. अशावेळी सुशांतचं यशराजसोबत काय झगडा झाला होता.. तो रियाला यशराजसोबत काम करू नको असं का म्हणत होता.. याची कारण त्या त्या माणसांनाच ठाऊक असतात. ती सहसा बाहेर येत नाहीत, कारण करार झालेला असतो.
सुशांतच्या जाण्यानंतर नेपोटिझमचाही मुद्दा चर्चेत आला. अर्थात हा नवा मुद्दा नाही. जिथे जिथे माणूस आहे, तिथे तिथे नेपोटिझम असणार आहे. प्रत्येत पेशात ते आहे. आपल्या कुटुंबियांना, नातलगांना संधी देण्यात प्राधान्य दिलं जातं. बॉलिवूडही त्याला अपवाद नाही. पण असं असूनही अक्षयकुमार, शाहरूख खान यांच्यासारखी मंडळी तगली आणि कित्येक स्टार्सची पोरं रसातळाला गेली. आजच्या जामान्यात अनेक नावं आहेतच की कामं करणारी. विकी कौशल, आयुषमान खुराना, राजकुमार राव, नवाजुद्दिन सिद्दीकी अशी ही सगळी मंडळी रणवीर सिंग, रणबीर कपूर, वरून धवन यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताहेत. मग याचं काय करायचं? इंडस्ट्रीमध्ये काम करायला आल्यानंतर कोण कसं आहे याची कल्पना उमेदवाराला पहिल्या दोन वर्षात येते. त्या त्या कंपनीत होणारे करार.. तिथल्या अटी.. तिथली शिस्त याची पूर्ण माहीती स्ट्रगलर्सना असते. सुशांतही अशा स्ट्रगलमधून आला होता. बालाजीसारख्या हाऊसमधून टीव्ही मालिका करून मुलगा सिनेक्षेत्रात स्थिरावला होता.
मग काय झालं असेल?
त्याला खरंच कॉर्नर केलं गेलं असेल? जर हे खरं होतं तर कंगना, स्वरा भास्कर, रिचा चड्ढा, राजकुमार राव आदी आउटसायडरसोबत त्याचं नसेल का बोलणं झालं? केवळ दोन प्रॉडक्शन हाऊसेसशी पटत नाही.. म्हणून इंडस्ट्रीतूनच एग्झिट घ्यावी वाटणं.. हे कारण असू शकतं? सुशांत अशी माघार घेणाऱ्यातला नव्हता असं त्याच्या मुलाखती पाहताना जाणवतं. अभ्यासू, वाचनवेडा.. आकाशाचं वेड असलेला हुशार मुलगा.. विचार करून या क्षेत्रात येतो आणि अल्पावधीत आपलं स्थान बळकट करतो. येस.. अल्पावधीच की. वयाच्या ३४ व्या वर्षी उत्तम सिनेमे हाताशी धरून.. वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये झळकून झालं होतं या मुलाचं. दिलजित दोसांझने इन्स्टावर शेअर केलेला फोटो पाहिलात का ? त्यात अमिताभ बच्चन यांच्यासोबत गप्पा मारणाऱ्या तरूण कलाकारांत सुशांत होता. सोबत रणबीर, दिलजित आदी निवडक लोकही होते. त्याचं बॉलिवूडमधलं स्थान हे असं दखलपात्र होतं. मग.. का झालं असेल असं?
कंगना रनोट जो मुद्दा मांडते आहे, त्याकडेही जाऊ. कंगना फायटर आहे यात शंका नाही. पण तिने जावेद अख्तर यांचा संदर्भ देऊन जे काही खुलासे केले त्यावर ती म्हणतेय म्हणून विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे? बरं.. असं समजून चालू की अख्तर तसं म्हणालेही असतील. पण त्याच्या अलिकडे पलिकडे त्यांच्यात काय बोलणं झालं.. त्यांच्या बोलण्याचा टोन काय होता.. ते असं म्हटल्यावर कंगनाची काय प्रतिक्रिया होती.. हे सगळं त्यात येतं. सतत माध्यमांना दोष देताना कंगनाही तेवढंच सांगते आहे जेवढं तिला सांगायचं आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. अर्थात हे प्रकरण चार वर्षापूर्वीचं आहे. ह्रतिक आणि कंगनाच्या अफेअरची जी इमेल्स समोर आली त्यानंतर ते वाढलं. मग त्यात कोर्ट आलं.. मीडिया आला. ह्रतिक-कंगनामधलं नातं हे व्यक्तिगत होतं. त्या दोघांनाच त्या दोघांदरम्यान कुठे जुळलं आणि कुठे फाटलं हे माहीती असणारं आहे. तीच गत जावेद अख्तर यांच्यातल्या तिच्या संवादाची. अगदीच इतकं होतं, तर जावेद अख्तर यांनी आत्महत्येचा मुद्दा मांडल्यानंतर लगेचंच मीडियाकडे जाण्याचं धारिष्ट्य कंगनाने का दाखवलं नाही, हा प्रश्न पडतोच. तेव्हा इतर मुद्दे घेऊन ती माध्यमांकडे जात होतीच.
तुमच्या येतंय का लक्षात?
या सर्व बाबी या व्यक्तिगत असतात. संबंधित दोघांमध्ये काय झालं आहे हे त्या दोघांनाच माहीत असतं. त्यानंतर जो तो आपल्याला हवी ती बाजू लोकांसमोर मांडतो. सुलतान सिनेमात कंगनाला येण्यासाठी यशराजने आग्रह धरला असेलही. मग पुढे काय? कंगनाला नव्हता करायचा सिनेमा तर तिने केला नाहीच. इथे प्रत्येक व्यवसायाची एक रीत ठरलेली आहे. जिथे बड्या कंपन्या येतात तिथे करार येतात. जिथे करार येतात तिथे उमेदवार जेव्हा त्या करारावर सही करतो तिथे त्याला ते मान्य असतात. आता तुम्ही जर त्याचं उल्लंघन केलंत तर कायदेशीर लढाई सुरू होणं हा त्या सिस्टिमचा भाग असतो. तुम्हाला शक्य असेल तर लढाई लढा.. अन्यथा सोडा. सुशांतसारख्या शेकडो तरूणाईला याची कल्पना असते. तरीही ही मंडळी त्यावर स्वाक्षरी करतात... कारण, त्यांना त्यापुढची स्वप्नं दिसत असतात.
आपल्यासाठी सत्य इतकंच आहे की सुशांत गेला. त्याला जावंसं वाटलं. याची कारणं अनेक असू शकतात. नैराश्य कशाहीमुळं येऊ शकतं. त्याच्या माजी पीएने आत्महत्या केली म्हणून नैराश्य येऊ शकतं. किंवा सध्याच्या प्रेयसीसोबत व्यापारात पैसा गुंतवल्यामुळंही काही दबाव येऊ शकतो. मुद्दा इतकाच आहे की हाताशी नेम, फेम, मनी सगळं असूनही आलेला स्ट्रेस तुम्हाला मॅनेज करता का आला नाही? माहीत नाही.
वयाच्या 34व्या वर्षी बांद्र्यात फ्लॅट.. उत्तम सिनेमे हाताशी.. अनेक अफेअर्स करूनही कशाचाही शिक्का न बसवून घेतलेला मुलगा. इतकं करून तरूणाईचं अमाप प्रेम त्याला मिळत होतंच. वयाच्या 34 व्या वर्षी आणखी काय हवं होतं? त्याने केलेले सिनेमे थिएटरवर न लागता ओटीटीवर लागणं हे त्याचं कारण असेल? या निर्णयाने तो खचला असेल? माहीत नाही.
गुरूजी इथे नैराश्य प्रत्येकाला आहे. जसं ते बॉलिवूडमध्ये नाव कमवायला आलेल्या नवोदित स्ट्रगलरला येतं तसंच ते अमिताभ बच्चनचा मुलगा असल्यामुळे अभिषेक बच्चनलाही येतं. तिघांचं समसमान काम असूनही जिंदगी मिलेगी ना दोबारा.. सारख्या सिनेमात ह्रतिकला सर्व पुरस्कारात बेस्ट हिरो नामांकन मिळाल्याबद्दल अभय देओलही त्याने फ्रस्ट्रेट होतो तर सलग चार हिट देऊन पाचव्या सिनेमाच आपल्या प्रतिस्पर्धी नायिकेला घेतल्यामुळे डिप्रेस झालेल्या नायिका आहेच बॉलिवूडमध्ये. पण तसं असूनही काळाच्या उरावर बसता यायला हवंच की. आणि नसेल हवी तशी वेळ तर जरा सबुरीने घ्यायला हवं. एम.एस धोनीमधलाच संवाद आहे नं. जोवर तुला हवा तसा बॉल येत नाही तोवर टिक करत रहा. त्या बॉलची वाट पाहायची. त्या वाट पाहण्यात विकेट फेकायची नाही. तसंच आहे की हे. हे सगळं लिहित असताना मला खरंच आतून वाटत राहतं की त्याने थोडी कळ आणखी सोसायला हवी होती. चांगला मुलगा गेला.
त्याने हे पाऊल उचलायला नको होतं हीच खरी अंतिम भावना आहे. आणि त्याने ते पाऊल उचललं हेच सत्य. त्यापलिकडे त्याने का केलं असेल हे सगळे आडाखे आपण भाबडी मंडळी आपआपल्या कुवतीनुसार मांडत बसतो.
आज तो जाऊन एक आठवडा उलटत नाही, तर राखीला म्हणे त्याने दृष्टांत दिला. तिच्याच पोटी जन्माला येणार म्हणे तो. आणि दुसरीकडे त्याच्यावर सिनेमा काढायची तयारीही जोरावर आहे.
आता काय म्हणाल याला?
अति झालं अन हसू आलं.. हा असा प्रकार झालाय.
..
माझा एक इंडस्ट्रीतला जवळच्या मित्राला सुशांतचं जाणं हे त्याने घेतलेली समाधी वाटते... असं असेल? माहीत नाही.
जाणाऱ्या माणसाने कोणालाही काहीही न सांगता एग्झिट घेतलीय हो. त्याने एग्झिट घेतलीय हेच अंतिम सत्य आहे. तिकडे कश्यप म्हणतो, सलमानने मला त्रास दिला. सोनू म्हणतोय एक गाणं नऊ नऊ गायकांकडून गाऊन घेतो सलमान. इकडे कंगना म्हणते, सलमान ट्रीटमेंट देत नाही नीट. वगैरे वगैरे.. तरीही विचार करा.. अभिनव कश्यपचा पहिला दबंग येऊन किती वर्षं झाली? तो करतोच आहे काम. सलमान अनेक गायकांकडून गाऊन घेत असला तरी त्याच्याकडे तेवढे गायक इतकी वर्षं गाऊन जातातच. शिवाय, सोनूचंही बहिष्कृत असून त्याने आपली उत्तम चूल मांडून ठेवली आहे. इकडे कंगना नेपोटिझमचे वाभाडे काढत असताना पदरात पडलेले सिनेमे चोख करते आहेच. इथे प्रत्येकजण कधीतरी नैराश्यात जात असतो. यांची ही गत तर त्या स्वरा भास्कर, अनुराग कश्यप, अनुराग सिन्हा, रिचा चड्ढा यांनी काय करावं?
तुम्हाला आलेला स्ट्रेस कसा जाईल.. किंवा तो कसा घालवता येईल हे फक्त तुम्हालाच माहीत असतं. तो स्ट्रेस रिलीज करता आला नाही की अत्यंत वेदनादायी घटना घडतात... जी सुशांतबाबत घडली.
मला खरंच असं आतून वाटतं.. की चुकला यार सुशांत.
मला असं आणखी किती काळ वाटत राहणार आहे.. देव जाणे.
BLOG | आत्महत्येनंतर एका आठवड्याने...
सौमित्र पोटे, एबीपी माझा
Updated at:
22 Jun 2020 03:39 PM (IST)
तुम्हाला आलेला स्ट्रेस कसा जाईल.. किंवा तो कसा घालवता येईल हे फक्त तुम्हालाच माहीत असतं. तो स्ट्रेस रिलीज करता आला नाही की अत्यंत वेदनादायी घटना घडतात... जी सुशांतबाबत घडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -