एरवी १४ मार्च आला की साधारण आदल्या दिवशी आमीरच्या घरी पत्रकार परिषद असणार असल्याचे मेसेज फिरतात. पण यंदाचं वर्ष त्याला अपवाद होतं. कारण एकतर आमीर तिकडे जोधपूरला ठग्ज ऑफ हिंदोस्थानचं शूट करत होता. त्यामुळे एका दिवसासाठी तो येईल असं वाटत नव्हतं. त्यात तिकडे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीच्या बातम्या आल्या आणि एकूणच आमीर, बच्चन, ठग्ज ऑफ.. आणि जोधपूर हे वातावरण जरा तणावपूर्ण बनलं. त्याचवेळी दरवर्षी प्रमाणे यंदा आमीरच्या बर्थ डे पत्रकार परिषदेचे मेसेज आले नाही. त्यामुळे यावेळी आमीर भेटणार नाही, अशी खात्री संपूर्ण मनोरंजनसृष्टीला होती. पण..

पण १४ मार्चला दुपारी १२ वाजता अचानक आमीर मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याच्या बातम्या फिरल्या आणि एकच उधाण आलं. अगदी अमिताभ यांच्या तब्येतीपासून पार पद्मावतपर्यंत सगळे प्रश्न आमीरला विचारता येणार म्हणून तमाम पत्रकारांचे पाय बांद्र्याच्या कार्टर रोडवरच्या फ्रिडा २ या अपार्टमेंटकडे वळले. व्यक्तिश: मी आमीरला सिनेमाच्या निमित्ताने दोन-तीनदा भेटलो आहे. पण त्याच्या घरी जायची माझी पहिलीच वेळ. ठरल्याप्रमाणे दीड वाजता आमीर पत्रकार परिषद घेणार होता. आम्ही वेळेत पोचलो खरे. पण फ्रिडा २ च्या भव्य गेटमधून आत गेल्यावर खालीच पार्किंगमध्ये टेबल मांडण्यात आलं होतं आणि टेबलसमोर जवळपास ४० पत्रकार चक्क मांडी घालून बसले होते आणि त्या पलिकडे साधारण तितकेच कॅमेरे स्टॅन्डला अडकले होते. तिथे थांबण्यात पॉइंट नव्हता. कारण आमीर तिथे जे बोलणार होता ते कॅमेरा टिपणार होताच. मला आमीरच्या अनौपचारिक गप्पा हव्या होत्या.



ही सगळी गर्दी सोडून मी तिथल्या पीआरला मी आल्याचं लक्षात आणून दिलं. त्याने तडक मला लिफ्टमधून सहाव्या मजल्यावर नेलं. आता सहाव्या मजल्यावर का? तर त्या मजल्यावर त्याचं ऑफिस आहे. तिथे लिफ्ट उघडल्यावर आत एक फर्निश्ड ऑफिस असल्याचं मला जाणवलं. छोटं रिसेप्शन. त्यावर दोन बाउंन्सर बसलेले. एका पीआरने मला थोडं पुढे नेऊन एका हॉलमध्ये नेलं. डोअर-टू-डोअर ग्रे कारपेट. संपूर्ण भिंतींना पांढरा रंग. त्या भव्य खोलीच्या चार कोपऱ्यांमध्ये मोठाले स्पीकर्स लावलेले. एका कोपऱ्यात ट्रेडमिल आणि खोलीतून आत शिरल्यावर समोर दिसत राहतो तो अथांग समुद्र. मग शेजारी एक सोफा, समोर टीव्ही आणि उरलेल्या भागात आलेल्यांसाठी मऊशार सोफ्यांचा चौकोन केलेला. तिथे दोन पत्रकार येऊन बसले होते. मी लगेच माझी पुढची जागा पकडली. त्यावेळी वाजले होते दोन.

जनरली वेळ पाळणारा आमीर दोन वाजले तरी आला नव्हता. चौकशी केल्यावर कळलं तो जोधपूरवरून मुंबईत लँड झाला आहे आणि तो कोणत्याही क्षणी येईल. इतक्यात तळमजल्यावर आरडाओरडा झाला. आमीर आल्याची खूण होती ती. पुढे सगळी शांतता. आमीर खाली मीडियाशी  बोलत होता आणि आम्ही सहाव्या मजल्यावर ते आपआपल्या मोबाईलवर पाहात होतो. बाईट संपला. त्यावेळी पावणे तीन- तीन झाले असावेत. आता आमीर आपल्याला भेटणार या कल्पनेनं छान वाटू लागलं होतं, तोवर पीआरकडून निरोप आला की आमीर आता वर किरण आणि आझादसोबत जेवत आहे. ते १५ मिनिटांत खाली येतील.  झालं... प्रतीक्षा आणखी वाढली.



खायला खूप काही..पण खातो कोण?

आमीरला यायला पंधरा मिनिटं आहेत हे कळल्यानंतर त्याच्या पीआर टीमने सर्व पत्रकारांना खाण्यासाठी खाऊ आणला होता. मुख्य हॉलच्या अलिकडच्या तुलनेने छोट्या खोलीत तो बुफे मांडण्यात आला होता. सॅंडविच, वेफर्स, ढोकळा इथपासून खूप काही होतं खायला. खायचा आग्रह होत होता. पण उठणार कोण? आपण उठलो आणि आपली जागा गेली तर? ही भावना त्यातल्या अनेकांची होती. मग काहींनी आपल्या पर्स ठेवून, सॅक ठेवून या आग्रहाला मान दिला. बाकी इतरत्र गप्पांचे फड रंगले होतेच.

अखेर १५ मिनिटांत आमीर आला. सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत त्याने खुर्चीवर दोन्ही पाय बुटासकट वर घेत मांडी ठोकली आणि बोलता झाला. पण या अनौपचारिक गप्पा सुरु होण्यापूर्वी आपल्याला चार वाजता आझादला टेनिससाठी सोडायला जायचं असल्याचं त्याने सांगितलं. आता आमच्याकडे वेळ होता तो जेमतेम २०-३० मिनिटांचा. कोणी काही बोलणार इतक्यात त्याच्याकडून प्रश्न आला.. तुम्हाला फोटो हवाय..?  सगळ्यांचाच होकार होता.

'तो यार एकेक कर के सब निकालोगे. तो उसमेही २० मिनिट जाएंगे. देन.. मै आपका सेल्फी निकालता हूं.' असं म्हणत आरजे आलोकचा फोन घेऊन त्याने पद्धतशीर सेल्फी काढले आणि चर्चेला सुरूवात झाली.

आता मघाशी सांगितल्याप्रमाणे ही सगळी चर्चा अनौपचारिक होती. त्यामुळे त्याचा तपशील कुठेही द्यायचा नाही अशी त्याची अट होती. परिणामी नेमकी चर्चा झाली काय, ते नाही सांगता यायचं. पण काही प्रश्न थेट, तीव्र होते. तर काही सोपे, कौंटुंबिक होते.

प्रत्येकाच्या प्रश्नाला आमीर हसत उत्तर देत होता. अगदी आझाद आणि किरणने काय भेट दिली इथपासून चीनमध्ये ‘दंगल’ने कसा मोठा व्यवसाय केला इथपर्यंत आणि मराठीत सिनेमा निर्मिती करण्यापासून वेबसीरिजपर्यंत बऱ्याच विषयांवर तो बोलला.

खरंतर आमीरला त्याच्या फ्लॅटवर जाऊन भेटण्याची आणि त्याच्या वाढदिवशी अशी माझी पहिलीच वेळ. त्यामुळे हा सगळा माझ्यासाठी नवा आणि गमतीदार प्रकार होता. त्याच्या या तीसेक मिनिटांमध्ये मला आमीर नेमका कसा वाटला याचा विचार मी सतत करत होतो.

कसा आहे आमीर?

आमीर चतुर आहे. मीडियासमोर त्यातही ओपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही पातळ्यांवर काय बोलायचं हे त्याला कळतं. खरंतर त्याचा वाढदिवशी ही पत्रकार परिषद होती. त्यामुळे त्याला विचारण्यात येणारे प्रश्न हे त्याच्या जगण्याशी, आयुष्याशी, कुटुंबाशी निगडित असायला हवे होते. पण ठग्ज ऑफने या गप्पा हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. अर्थात या भेटीत काही इतर प्रश्नही आले. आमीरने कोणतेही प्रश्न टाळले नाहीत. अनौपचारिक गप्पांमध्येही आपण काही थेट विधान केलं तर त्याची बातमी होणार आहे, हे तो ज्यावेळी बोलून दाखवतो त्यावेळी नेमकं काय आणि किती बोलायचं हे त्याने आधीच ठरवलेलं असतं. या सगळ्या मीटिंग चालू असताना, बरोब्बर चार वाजता त्याच्या पीएने त्याला आझादला सोडायला जायची आठवण करुन दिली आणि आमीर उठला. त्याने पुन्हा शुभेच्छा स्वीकारल्या आणि तो निघाला.



सगळं आवरुन मी पुन्हा लिफ्टने  लगेच खाली आलो. फ्रिडा २ च्या भल्या मोठ्या गेटमधून बाहेर आल्यावर त्याच्या चाहत्यांची गर्दी होतीच. फार नाही पण साधारण ५० एक मंडळी होती तिथे. त्या गेटमधून बाहेर येईपर्यंत दुसरं गेट उघडलं. त्यातून एक ५१ नंबरची एसयूव्ही बाहेर आली. एकच जल्लोष झाला आमीर भाई.. आमीर भाई.. आमीरने गाडीतूनच त्यांना अभिवादन केलं. शुभेच्छांचा स्वीकार करत त्याची गाडी निघाली ती आझादच्या टेनिस कोर्टकडे.