खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा. (मार्क 10)
1. मराठा मोर्चा आणि मी
2. भारतीय सैनिक आणि मी
3. ओला दुष्काळ, सुका दुष्काळ
4. माझे आवडते पंतप्रधान
5. माझा नावडता छंद
उत्तर - माझे आवडते पंतप्रधान
अर्थात मोदीच..! आपले नरेंद्र मोदी मला खूप आवडतात. ते माझे आवडते पंतप्रधान आहेत. याआधीचे पंतप्रधान आयुष्यात जेवढं बोलले नसतील आणि फिरले नसतील तितके मोदी सर फिरलेत आणि बोललेत सुद्धा. त्यांनी जग पाहिलंय. पृथ्वी गोल आहे. पण तरी जगाच्या पाठीवर असे काही ठराविकच कोपरे आहेत, ज्या कोपऱ्यांना मोदींचा पदस्पर्श झालेला नाही.
मोदी माझ्या बाबांपेक्षाही हुश्शार आहेत. म्हणजे आधी मला असं वाटायचं की माझे बाबाच तेवढे हुश्शार आहेत. आणि मोठं झाल्यावर प्रत्येक मुलगा आपला बाप कसा मूर्ख आहे हे सिद्ध करत सुटतो.. तर असो... विषय हा आहे की मोदी माझ्या बाबांपेक्षाही धूर्त आहेत. धूर्त आणि हुश्शार या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगवेगळा असतो, हे तुम्हाला माहित आहे ना? एनीवे.
म्हणजे माझे बाबा की नै.. आई भांडायला लागली की तिला बोलण्यात असं काही गुंतवून टाकतात की आई भांडणाचा मुद्दाच विसरुन जाते. मोदी सरांनी संसार केलेना नाही.. यावरही माझा विश्वास बसत नाही कधीकधी. कारण संसार न करताही विषयांतर करण्याची जी किमया मोदींनी साधलीये ती निव्वळ लाजवाब. मला त्यांच्या या गुणांचं फारच कौतुक आहे. देशाचे जवान मारले जात होते. सीमेवर तणाव होता. पाकिस्तानकडून वेळोवेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं होत. रात्र वैऱ्याची होती. अशाच एका वैऱ्याच्या रात्री 'प्रहार' सिनेमातला नाना पाटेकर मोदींच्या स्वप्नात आला. मोदी खडबडून जागे झाले आणि तेव्हाच त्यांनी हिंदुस्थानचा दुश्मन शेजारी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला. काळोख्या अंधारात भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या चिंधड्या उडवल्या.. सूर्योदय झाला आणि बातम्यांमध्ये मोदींचा जयकार झाला. वनी आनंद. भुवनी आनंद. आनंदीआनंद वनभुवनी.. मोदी देशाचे हिरो झाले. पण अशातही भारतातील काही जण मोदींचा विरोध करतच होते. मुंगीसारखी ही माणसं मोदींसारख्या हत्तीला धमकावू पाहत होती. पण किळसवाण्या टीका करणाऱ्या मुंग्यांना हत्ती बधणार नव्हता. तो चालत राहिला.. अखंडपणे. ऐटीत आणि डौलात.
पुढे टीडीएस भरणारा भारतीय रस्त्यावर उतरला. कारण होतं मराठा आरक्षणाचं. ड्रोनाचार्य या आरक्षणावर नजर ठेवून होते. रस्ते भगव्या रंगाने माखले होते. तरुण म्हणून नका, विद्यार्थी म्हणू नका, शेतकरी म्हणू नका, कष्टकरी म्हणू नका, उद्योगपती म्हणू नका, राजकारणी म्हणू नका, बाई म्हणू नका, ताई म्हणू नका, काही म्हणू नका! ...झाडून सगळेजण आरक्षणच्या मुद्द्यावरुन गपगुपान मूकमोर्चे काढत होते.
दोन्ही सरकारवरचा दबाव वाढत चालला होता. मुंबईतली बाईक रॅली पाहून मराठ्यांची फौज भारी पडणार, असं कुणालाही वाटलं असतं. अशा नाजूक परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदींना कोण आठवले माहितीए? मलाही नाही माहीत.
ग्रेग चॅपेल असावेत. अहो ग्रेग चॅपेल. टीम इंडियाचे वादग्रस्त क्रिकेट कोच. ते काय करायचे माहित्येत? कोणालाही वन डाऊन बॅटिंग करायला पाठवायचे. एकदा एका मॅचमध्ये चॅपेल यांनी इरफान पठाणला तिसऱ्या नंबरवर पाठवला. पठान खत्तरनाक खेळला. आपण मॅच जिंकलो. दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी ढोणीला पाठवला. ढोणीने पण कमाल केली. मग तिसऱ्या मॅचमध्ये त्यांनी जो नेहमीचा वन डाऊन प्लेअर होता.. त्याला पाठवला आणि गोची झाली. मग चॅपेलच्या नावाने लोकं शिव्या द्यायला लागले आणि नंतर त्यांची हकालपट्टी झाली. असो. विषय नरेंद्र मोदी आहे. आपल्याला त्यांचं कौतुकए.
देशातला सगळा भ्रष्टाचार मोदींना संपवायचाय. काळ्या पैशाचा बंदोबस्त करायचाय. त्या धर्तीवर त्यांनी पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदी आणली. मोदींनी हा निर्णय घेत दोन नंबरचा पैसा वापरणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक केला.
सह्याद्री, समुद्र आणि नरेंद्र मोदी यांनी एकवटून मांडलेला स्वातंत्र्यसंग्राम विजयी झाला.... भ्रष्टाचार विरहीत स्वराज्य आता साकार होणार....हे ऐकून लेकीसुना संतसज्जन गाईवासरं सारे सारे आनंदले.... हे राज्य व्हावे हि तो श्रींचीच इच्छा होती.... संतांच्या स्वप्नांचा कल्पवृक्ष मोहरला.... वनी आनंद .. भुवनी आनंद .. आनंदी आनंद वनभुवनी ... आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा मोदींच्या जयजयकारानं आसमंत दुमदुमला. या निर्णयामुळे लोकांनी स्वतःकडच्या पाचशेच्या नोटापण काळ्या असतील या भितीनं बँकेकडे धाव घेतली. ज्यांनी कधी लालबागच्या राजाच्या लाईनमध्ये अर्ध्या तासाच्या वर लाईन लावली नव्हती ते चार चार तास देशासाठी लाईनमध्ये उभे राहून देशाच्या कार्यात हातभार लावू लागले.
वर्तमानपत्र म्हणू नका, वृत्तवाहिन्या म्हणू नका, रेडिओ म्हणू नका, इंटरनेट म्हणू नका.. झी मराठीच्या मालिकांमधले लोकंही "थोडा त्रास होईल पण जखम भरुन येईल", असं भावनिक आवाहन करु लागले आणि सर्वजण शिस्तीत, एकामागे एक जराही का-कू न करता पैसे बदलून घेण्याच्या राष्ट्रकार्याला जोमाने लागले. या सगळ्यात मोदी कुठे जिंकले किंवा हरले नाहीत... मोदी मोठेच आहेत आणि मोठेच राहणार.
ते महिन्यातले जास्तीत जास्त दिवस फ्रंन्ट पेजवर असतात..!
तुम्हाला एक गोष्ट कळतेय का..? नोटबंदीच्या बाबीमुळे मराठा आरक्षणाच्या बातम्या कशा पटदिशी गायब झाल्या ते?
अजून एक गोष्ट.. अॅट्रोसिटीच्या चर्चा हद्दपार झाल्या ते..?
त्याहीपेक्षा अजून एक गोष्ट लक्षात आलीय का..? की आगामी निवडणुकांसाठी होणारं राजकारणं काहीसं ब्लर झालंय... आणि लोकं फक्त आणि फक्त नोटांकडे पाहू लागलेत.. नोटांना लिडींग फ्रॉम द फ्रंट न्यूजचा दर्जा देताना, मोदींनी हा निर्णय घेत आपण नायक सिनेमातले शिवाजी राव आहोत.. तर नोटा बदलण्याचं काम म्हणजे देशसेवा असल्याचं भासवण्यातही मोदी सरकार यशस्वी झालं. त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन.
मोदी जेव्हा दोन्ही हात उंचावून 'मित्रोंssssss'.. असं म्हणतात तेव्हा त्यांचे किती मित्र असतील याचा अंदाजच केलेला बरा. असो.
मोदींचं कौतुक करायला शब्द कमी पडतील आणि एवढ्या एकाच प्रश्नाचं उत्तर लिहीत बसलो तर मला मार्क कमी पडतील. त्यामुळे माझ्या लेखणीच्या भावनांना आवर घालतो. इथेच थांबतो.
#जय हिंद. #जय महाराष्ट्र. #हर हर महादेव. #जय भवानी. #जय शिवाजी. #एकनोटलाखनोट
माझे आवडते पंतप्रधान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Nov 2016 07:57 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -