दी! ड! शे! ए क शे पन्नास.
एक पाच शून्य.
इतकी वर्ष ब्रिटिशांनी आपल्या देशावर.. भारतावर.. हिंदुस्थानावर.. नव्हे इंडियावर राज्य केलं. जुलूम बिलूम केला. पारतंत्र्यात ठेवलं. देशाच्या तिजोऱ्या लुटल्या. आपल्यावर.. भारतावर.. हिंदुस्थानावर नव्हे इंडियावर अत्याचार केले.
मग प्रत्येक भारतीय पेटून उठला. ब्रिटिशांविरुद्ध लढला. काहींनी प्राणांची आहुती दिली. काहींनी रक्ताचं पाणी केलं. देशात स्वातंत्र्यसंग्रामाची लढाई सुरु झाली. अखेर दीडशे वर्षांनी आपण ब्रिटिशांना हाकलवून लावलं.
वुई इंडियन्स..वुई प्राऊड ऑफ अवर नेशन...
नाही त्याचं झालं असं, की काल एक ब्रिटिश बॅन्ड आला होता. बॅन्डचं नाव होतं कोल्डप्ले. मुंबईत त्यांच्या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. तास दोन तास या बॅन्डनं परफॉर्म केलं. परफॉर्म करताना त्यांच्या वाद्यांना भारताचे झेंडे फडफडत होते. खांद्यावर हिंदुस्थानाचा.. भारताचा.. नव्हे इंडियाचा झेंडा घेऊन ते परफॉर्म करत राहिले.. जमेल तशा उच्चारात या बॅन्डमधल्या ब्रिटिश तरुण गायकानं वंदे मातरम् चा नाराही दिला. माँ तुझे सलाम म्हणणारा.. कोल्डप्ले आणि क्रिस मार्टीन भारतमातेचा पुत्र झाला.

कॉन्सर्टला तोबा गर्दी. मलबार हिल, पेडर रोड, बँडस्टँड, कार्टर रोड, वाळकेश्वर यांच्यासह मुंबईतल्या तळागाळातल्या दर्दी माणसांनी कोल्डप्ले ऐकायला गर्दी केली. हात उंचावून कोल्डप्लेच्या स्वरांना साद दिली. मनापासून दाद दिली. तल्लीन झाली. भारावून गेली.
फंडा सगळा कोल्डप्लेचा.
कोल्डप्ले. एक म्युझिक रॉक बँड. जगप्रसिद्ध. एकदम फेमस. जगभरात यांचे शोज होतात. भरपूर पैसे घेत असेल ना हा बँड? त्यांचे यु-ट्यूब व्हिडियो बघा नं.. कसले भव्यदिव्य वगैरे आहेत ते.
या कोल्डप्लेमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान व्हिडिओ कान्फरन्सिंगद्वारे बोलतात. सीएमपण शो ला जातात. व्यासपीठ राजकीय नसण्याचा इथंही फायदा घेतला की काय?
बरं, कोल्डप्लेला झाडून सगळे दिग्गज मात्तबर सेलिब्रिटी हजेरी लावतात. हा एक चॅरिटी कॉन्सर्ट असतो बरं का. आणि चॅरिटी शोची तिकीटं काही टॅक्स फ्री मराठी सिनेमांच्या तिकीटांएवढी नसतात काही..! तर असो!
लाखो-हजारांच्या घरात असलेली तिकीटं काढून लोकं कोल्डप्ले ऐकायला जातात.. ही जादू घडते कशी? कुठून आला हा कोल्डप्ले..? असे काही मूर्ख प्रश्न इंग्रजी गाणी न ऐकणाऱ्या प्रेक्षकवर्गाला पडतात.
पण अशातही.. कुणीतरी ब्रिटीश रॉक बॅन्ड भारताचा झेंडा खांद्यावर घेऊन.. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत.. भारतीयांसमोर गातो काय आणि त्यांचे शब्द आपण भारतीय गुणगुणतो काय.. त्याला आपलंसं करुन घेतो काय.. ही केवढी मोठी आणि ग्रेट गोष्टंय.
कोल्डप्ले.. थंड खेळ!!
वुई इंडियन्स..वुई प्राऊड ऑफ अवर नेशन...
आपली भारतीय संस्कृती आपल्याला प्रेम करायला शिकवते. आपली हिंदुस्थानी संस्कृती आपल्याला विवेक शिकवते. आपली इंडियन संस्कृती आपल्या दातृत्व शिकवते.
लाखो लोक जिओच्या फुकट इंटरनेटवरुन कोल्डप्लेचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहत असतात. ते कोल्डप्ले फॉलो करतात. तेव्हा त्यांनी कोल्डप्लेला आपलंसं केलेलं असतं. त्यांनी क्रिस मार्टीनला स्वीकारलेलं असतं. एका गायकाशी त्यांची नाळ जोडलेली असते. कलाकारालाचं मोठेपण मान्य केलेलं असतं.
पण कोण आहे तरी कोण हा क्रिस मार्टीन? पाकिस्तानी कलाकारांना विरोध आणि दीडशे वर्ष भारतावर राज्य केलेल्या ब्रिटिश रॉक बँडला मात्र ग्रँड वेलकम! .. मुद्दा भरकटतोय का? ..एनीवे इग्नोर!
.. हा ब्रिटिश बॅन्ड असूनसुद्धा लोकं कॉल्डप्लेला आपलंसं करतात ही ग्रेट गोष्ट तर आहेच.. पण त्याचा शो भारतात होणं ही ऐतिहासिक आणि भाजप सरकारच्या काळात घडलेली अतुलनीय आणि उल्लेखनीय अशी बाब नाही का?
कोल्डप्ले कॉन्सर्टला बीकेसीमध्ये दिलेल्या जागेवरना वाद झाला. कार्य़क्रम संपला आणि जाता जाता अजून एक वाद झाला. या क्रिस मार्टीनने म्हणे खिशात झेंडा कोंबला... भारताचा.. हिंदुस्थानाचा.. नव्हे इंडियाचा! त्यावरुन राहुल गांधींना आला राग. राष्ट्रध्वजाचा अपमान वगैरे झाला औ.
ही बातमी होती.. आता हा ब्रिटिश तरुण आपल्या भारताचा झेंडा घेऊन वंदे मातरमची घोषण देतो.. याबद्दल त्याचं कौतुक करायचं?.. की खिशात कोंबला म्हणून त्याची टीका करायची?
या क्रिस मार्टीनला ऐकायला ऐवढी सगळी माणसं लाखों-हजारोंची तिकीटं काढून येतात.. ती काय मूर्ख असतात?
.. आपल्या देशात राष्ट्रध्वजाचा मान राखण्याचे वेगळे कायदे, नियम, अटी वगैरे असं सगळं असतं.. ते पाळलं गेलंच पाहिज्येल औ. देशप्रेम वगैरे सगळं आधी. त्यानंतर बाकीचं सगळं.. मग तिथे कुणीही का असेना...
बरं अमेरिकेचे, इंग्लंडचे झेंडे असलेल्या टोप्या, रुपाल, टी शर्ट, जीन्स पॅन्ट, किंवा अगदी हल्लीच्या बरमोडा.. उर्फ बॉक्सर घालणारी माणसं, राष्ट्रध्वजाच्या अवमान करत नसतील का..? बरं ते ही जाऊदेत.. चे गव्हेरा आणि बॉब मार्ले यांचे चेहरे असणारे टी शर्ट आणि चपला वापरणारी पिढी या दोघांचं मोठेपण मान्य करत असेल?
उद्या भरपूर थंडी पडली.. आणि कपडा म्हणून राष्ट्रध्वजाचा फ़क्त एकच तुकडा शिल्लक राहिला... अशात एक नागडं पोरगं थंडीनं कुडकुडलं जरी.. तरी आपण तो राष्ट्रध्वज उंचावर फडकवून त्याला सलाम कसा ठोकायचा.. हेच त्या नागड्या पोराला शिकवायलं हवं की नको?
..वुई इंडियन्स.. वुई प्राऊड ऑफ अवर नेशन...
नाही मी तर म्हणतो की.. आहे तरी कोण हा क्रिस मार्टन? का त्याला ऐकलं पाहिज्य़ेल आपण?
३९ वर्षाचा हा ब्रिटिश तरुण. इंग्लंडमधल्या कुठल्यातरी व्हाईटस्टोन नावाच्या छोट्याशा भागातून आलेला. १९९८ साली यानं कोल्डप्ले नावाच्या एका म्युझिक रॉक बॅन्डची स्थापना केली. म्हणजे १९९८ ते २०१६.. अठरा वर्ष झाली कोल्डप्लेला. हा क्रिस.. इंग्रजीत कविता लिहीतो.. त्यांना चाली लावतो.. आणि गातो.. सोबत त्याचे अजून तिघे गडी असतात. एक ड्रम वाजवतो.. दोघे गिटार वाजवतात... एवढंच काय ते याचं कसब का?
बरं.. असं काय ग्रेट लिहीलंय या पठ्ठ्यानं की सगळ्या जगानं याला डोक्यावर घ्यावं? सध्याच्या घडीला एक नंबरचा बँड अशी कोल्डप्लेची ओळखंय. ती कशामुळे? आपल्या इंडियात अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये याची गाणी असतात. असं काय सांगतो काय हा..?
क्रिस मार्टीन प्रेम करायला सांगतो. प्रेम द्यायला सांगतो. अंहिसेपासून दूर जाऊ.. असा काहीसा आशय त्याच्या प्रत्येक कवितेत.. गाण्यात.. असतो. वेदनेची व्याख्या त्याच्या सुरात, चालीत, लयीत वाहत राहते. बरं इंग्रजी कविता म्हणजे काही यमक-बिमक असा काही फंडा नसतो. सरळ वाक्यच्या वाक्य असतात.. थेट.. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड.
तुम्हाला तो लाईफ ऑफ पाय माहितीये का?... त्याच्या ट्रेलरमध्ये या क्रिस मार्टीनचं गाणं वापरलंय. पॅराडाईस हे त्या गाण्याचं नाव... विक्रमी खप होणारं म्युझिक म्हणून ८ कोटीपेक्षा जास्त विक्रम कोल्डप्लेनं मोडीत काढलेत, असं विकीपीडिया सांगतं. खरं-खोटं इंटरनेट जाणे!
बरं ते सगळं जरी इग्नोर केलं.. तरी देखील क्रिस मार्टीन आणि त्याची टीम आणि त्यांच्या बँडची यूट्यबवरची किंवा वेबसाईटवरची व्हूअरशिप बघता.. ते किती मोठे आहेत, याची प्रचिती येईल.
‘जी कला सत्याकडे घेऊन जात नाही, ती तुम्हाला मुक्ती देऊ शकत नाही’, असं शाहीर संभाजी भगत म्हणतात. यावर १ टक्का जरी विश्वार ठेवला तरी कोल्डप्लेचं मोठेपण मान्य करावंच लागतं. कोल्डप्लेची गाणी खोटी कहाणी सांगत नाहीत..फसवे दावे करत नाहीत.
हा क्रिस मार्टीन दुसरा तिसरा कुणी नाही.. आपल्या अमर शेख, शाहिर साबळे, अण्णाभाऊ साठे, वगैरे कॅटेगिरीतलाच आहे. लोकं त्याला फॉलो करतात.. कारण लोकं त्याच्याशी स्वतःला रिलेट करु शकताएत..इतकंच.
बाकी, ब्रिटिश आहे म्हटला की नाकं मुरडणारे भारतीय आजही काही कमी नाहीयेत. पण क्रिस मार्टीन त्याला अपवाद आहे. काही वेळासाठी क्रिसवर टीका करण्याचा प्रयत्न ही झाला. पण काही गोष्टींना इग्नोर कसं करायचं.. हे त्यानं स्वतःच त्याच्या एका गाण्यात लिहून ठेवलंय... एकदा वाचा... जमल्यास क्रिस मार्टीन आणि कोल्डप्ले ऐका.. कदाचित तो तुम्हाला आवडू शकतो.
नाहीच आवडला तर शांताबाई आहेच की.. ती पण आपलीच आहे. चकरा नखरा-नखरा चकरा.
बाय द वे काल एक जोक फिरत होत.. क्रिस मार्टिन ‘या कोळीवाड्याची शान’ गाणार होता म्हणे...पण वेळ कमी पडली!
बायदवे मला खात्रीए क्रिस.. तू इग्नोर करशील त्या सगळ्यांना ज्यांनी तुला त्रास दिलाय.. क्रिस म्हणतो..
You said I'm gonna buy this place and burn it down
I'm gonna put it six feet underground
You said I'm gonna buy this place and watch it fall
Stand here beside me baby in the crumbling walls
Oh I'm gonna buy this place and start a fire
Stand here until I fill all your hearts desires
Because I'm gonna buy this place and see it burn
And do back the things it did to you in return
- क्रिस मार्टीन, कोल्डप्ले बॅन्ड