रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण, ओली निसरडी खेळपट्टी, वाढलेलं गवत आणि  ठिकठिकाणी चिखलाने माखलेली आऊटफिल्ड ही आहेत क्रिकेट विश्वातल्या एका आगळ्या  वेगळ्या स्पर्धेची वैशिष्टे. ही स्पर्धा आहे पावसाळी मोसमात खेळवली जाणारी जगातील एकमेव अशी मुंबई क्रिकेट असोसिएशनची कांगा लीग क्रिकेट स्पर्धा.


मुंबई ही भारतातील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. याच मुंबईने आजवर अनेक खेळाडू भारताला दिलेत. किंबहुना मुंबईच्या खेळाडूंशिवाय भारतीय टीम पूर्णच होऊ शकत नाही असा भारतीय क्रिकेट मधील एक मोठा समज आहे. आतापर्यंत अनेक मुंबईकर खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केल आहे. यात सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रवी शास्त्री,संदीप पाटील, वासीम जाफर, जहीर खान, अजित आगरकर, रोहित शर्मा, अजिंक्य राहणे या रथीमहारथींचा समावेश आहे. मुंबईतून असे उत्तमोत्तम खेळाडू देशाला लाभतायत याचं मुख्य कारण म्हणजे मुंबईतलं स्थानिक क्रिकेट.

मुंबईतील क्रिकेट हंगाम सुरू होतो तो ऐन पावसाळ्यात म्हणजेच जुलै महिन्यात. कांगा लीग ही मोसमातील पहिली स्पर्धा. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पहिले अध्यक्ष डॉ. एच. डी. कांगा यांच्या नावाने ही स्पर्धा 1948 पासून खेळवली जाते.

कसे आहे कांगा लीग स्पर्धेचे स्वरूप...?

सर्वसाधारणपणे जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी या स्पर्धेतील सामने पार पडतात.

लीग पद्धतीने चालणार्‍या या स्पर्धेत ए बी सी डी इ एफ जी असे 7 गट असतात.

प्रत्येक गटात 14 संघ असे एकूण 98 संघ या स्पर्धेत भाग घेतात.

गटातील प्रत्येक संघास 13 सामने खेळावे लागतात.

सर्वात शेवटी सर्वाधिक गुणांच्या आधारावर प्रत्येक गटातील विजेत्याची निवड केली जाते.

कांगा लीग स्पर्धेवेळी मुंबईत एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 49 सामने खेळवले जातात. हे  सामने मुंबईतील आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान, माटुंग्यातील दडकर मैदान, शिवाजी पार्क, मरीन लाईन्स वरील जिमखाने, विरार आणि पालघर येथील मैदानांवर पार पडतात.

प्रतिकूल परिस्थितित होणार्‍या या सामन्यांमध्ये खेळाडूंचा अक्षरशः कस लागतो. ओल्या  खेळपट्टीवर खेळताना भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल होते. त्यामुळे बहुतांशी सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहते आणि फार कमी धावसंखेचे सामने बघायला मिळतात. कांगा लीगच्या इतिहासात आतापर्यंत 4 गोलंदाजानी   एकाच डावामध्ये 10 गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. मुंबईचे माजी वेगवान गोलंदाज विठ्ठल पाटील यांनी कांगा लीगमध्ये सर्वाधिक 759 गाडी बाद केले आहेत. तर 1948 पासून 2002 पर्यन्त सलग  55 वर्ष प्रत्येक कांगा लीग स्पर्धेत खेळून माजी कसोटीपटू माधव आपटे आपटे यांनी 5046 धावा कुटल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे हे दोन्ही विक्रम आजही अबाधित आहेत. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी जॉन ब्राइट या क्रिकेट  क्लब कडून पहिल्यांदा या स्पर्धेत खेळाला  होता.

तर  अशी  ही आगळी  वेगळी  क्रिकेट स्पर्धा  यावर्षी  9 जुलै ते 1 ऑक्टोबर  या कालावधीत होत आहे. खर तर मुंबई  क्रिकेट  असोसिएशन वर्षभरात अनेक क्रिकेट स्पर्धांचं  आयोजन  करते. पण कांगा लीग चे  महत्व  आणि वेगळेपण  पूर्वीइतकच आजही  टिकून  आहे.