गिफ्टेड... चित्रपटाच्या नावातच काहीतरी नवीन असल्याचं वाटतं. एप्रिल 2017 ला मार्क वेब या दिग्दर्शकानं नियमित कथानकांना थोडे बाजुला सारत एका नव्या आणि सत्य घटनेवर आधारित 'गिफ्टेड'चं शिवधनुष्य उचललं.

गिफ्टेडमध्ये मार्क वेबच्याच ‘फाइव्ह हण्ड्रेड डेज ऑफ समर’ची आठवण करुन देणारे अनेक सीन्स आहेत. असामान्य गणिती कौशल्य जन्मजातच लाभलेल्या चिमुकलीवर हा चित्रपट आधारित आहे. तसं असलं तरी हा चित्रपट आजच्या पालक आणि बालकांमधील वाढत दुराव्याविषयी नक्कीच भाष्य करतो.

आई-वडिल गमावलेल्या सात वर्षांच्या मॅरी म्हणजेच मॅकाना ग्रेस आणि तिच्या मामाचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. मॅरीच्या शाळेच्या पहिल्या दिवसापासून चित्रपटाची सुरुवात होते. गणितात  असलेल्या कौशल्यामुळे तिला शाळेत जाण्याची इच्छा नसते, पण मामा फ्रॅन्क म्हणजेच ख्रिस इव्हान मात्र मॅरीला शाळेत जाण्याची सक्ती करतो. मॅरीने तिच्या वयाच्या मुलांमध्ये मिसळून साधारण आयुष्य जगण्याची अपेक्षा मामाला असते.



मॅरी शाळेच्या पहिल्याच दिवशी गणितातील अवघड कोड्यांना सहज सोडवून दाखवते. बोनी म्हणजेच जेनी स्लेट ही तिची शिक्षिका तिच्या उत्तरांनी प्रभावित होते. ती मुख्याध्यापिकेच्या मदतीने फ्रॅन्कला बोलावून मॅरीला मोठ्या शाळेत घालण्याचा आग्रह करते. मात्र त्याला फ्रॅन्क नकार देतो आणि इथेच कहाणीला मिळतो पहिला आणि मोठा टर्न... मुख्याध्यापिका मॅरीच्या आजीला शोधून काढते आणि मॅरी आणि फ्रॅन्कचा सुगावा लागल्यानंतर आजी मॅरीच्या ताब्यासाठी कोर्टात दावा करते.

बरं आता चित्रपटात आजी आणि मामामध्ये मॅरीच्या ताब्यासाठी संघर्ष सुरु होतो... तसं असलं तरी चित्रपटातील मॅरी, तिचा मामा, शेजारीण रॉबर्टा आणि एक डोळ्याचा मांजर याच्यातील नात्यांना तितक्याच सुंदरतेने दाखवण्यात आले आहे.... फ्रॅन्क आणि मॅरीची शिक्षिका बोनी यांच्यातील नातं यांच्यात सुरु झालेले नाते...कुठेच कहाणीची लिंक तुटल्याचे दिसत नाही...

चित्रटातील एक सीन आवर्जून लिहीतो... आपल्या वडिलांनी आपल्याला शोधण्याचा प्रयत्न का केला नाही हे कळल्यामुळे मॅरी रडत असते.. तिचा मामा तिला मनवण्याचा प्रयत्न करतो पण ती ऐकत नाही... मग तो तिला आणि शेजारीण रॉबर्टाला एका हॉस्पिटलमध्ये नेतो.. तिथेही तिचे प्रश्न सुरुच असतात..तर मामा तिला वाट पाहायला सांगतो...जवळपास 6-7 तास वाट पाहिल्यानंतर झोपलेल्या मॅरीला मामा उठवतो आणि समोर पाहायला सांगतो.. बरं हा पूर्ण सीन सुरु असताना आपल्याला वाटते की फ्रॅन्कनं मॅरीला तिच्या वडिलांकडे नेल्याचे भासते पण तो तिला खरा आनंद दाखवण्यासाठी नेतो. ते पुढे कळते. जेव्हा तो मॅरीला उठवतो तेव्हा एक डॉक्टर ऑपरेशन थिएटरबाहेर येऊन एका कुटुंबाला मुलगा झाल्याची माहिती देतो..तेव्हा त्या कुटुंबियांचा आनंद पाहून मॅरी आपल्या वडीलांना पूर्णपणे विसरून जाते..



आपल्याकडे आणि जगात सगळीकडेच लहान मुलांमधील एखाद्या गोष्टीचं आकर्षण लक्षात आल्यानंतर पालकांनी नेमकं काय करावे...आपल्या पाल्यांवर अपेक्षांची ओझी लादून त्यांचे बालपण हिरावले तर जात नाही ना याची काळजी घेतली पाहिजे... कुटुंब आणि शाळा या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या कौतुकांच्या माऱ्यात आपल्याची खरी गरज ओळण्याची गरज असते..आणि ते कसे ओळखावे याचा उत्तम नमुना आहे...गिफ्टेड...